प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे , दि.२: पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहर व ग्रामीण लगतच्या भागातील सध्या रद्द असलेले, यापुढे रद्द होणारे, राजीनामा दिलेले व लोकसंख्या वाढीमुळे द्यावयाचे तसेच विविध कारणांमुळे भविष्यात द्यावयाचे अशी २२ रास्तभाव दुकाने मंजूर करण्यात येणार आहेत. त्यासाठीचे अर्ज ३१ जुलैपर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत.
रास्तभाव, शिधावाटप दुकान परवाने मंजूर करण्याबाबत राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या ६ जुलै २०१७ शासन निर्णयानुसार हा निर्णय घेतला आहे. या शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या प्राथम्यक्रमानुसार रास्तभाव दुकाने मंजूर करावयाचे आहेत. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या २ फेब्रुवारी २०२२ च्या शासन परिपत्रकानुसार रास्तभाव दुकान मंजूर करण्यासाठी वर्षभराचा सुधारीत सहामाही कालबद्ध कार्यक्रम व कालावधी ठरवून देण्यात आलेला आहे. त्यानुसार पुणे, पिंपरी-चिंचवड व लगतच्या ग्रामीण भागामधील स्वस्त धान्य दुकान परवाने मंजूरीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे.
परिमंडळ 'क' मध्ये पाटील इस्टेट, शिवाजीनगर अशी दोन, परिमंडळ 'ई' मध्ये भारत नगर व शांतीनगर, परिमंडळ 'फ' मध्ये कुदळवाडी गावठाण, भोसरी खालील गव्हाणे वस्ती, तळेगाव खालील सहयोग नगर, रुपीनगर भाग, पिंपरी खालील मासुळकर कॉलनी, अजमेरा वास्तुद्योग कॉलनी, चऱ्होली बुद्रुक गावठाण खालील काळजेवाडी, ताजणेमळा, कोतवालवाडी, पठारे वस्ती, निगडी गावठाण अशी सहा स्वस्त धान्य दुकाने मंजूर करण्यात येणार आहेत.
तसेच परिमंडळ 'ह' मध्ये दत्तवाडी, अप्पर इंदिरानगर, पर्वती दर्शन व पायथा अशी तीन, परिमंडळ 'ज' मध्ये गांधीनगर, भाटनगर, खराळवाडी अशी तीन, परिमंडळ 'ल' मध्ये कोथरूड, परिमंडळ 'म' मध्ये कोंडवे धावडे, खडकवासला, बालाजीनगर, धनकवडी, श्रीरामनगर (स्वतंत्र महसुली गाव, ग्रामपंचायत), कुडजे (स्वतंत्र महसुली गाव, ग्रामपंचायत), खामगाव मावळ अशी सहा याप्रमाणे एकूण २२ स्वस्त धान्य दुकाने मंजूर करण्यात येणार आहेत.
जाहीरनामा ज्या भागासाठी प्रसिध्द केलेला आहे त्याच भागासाठी, क्षेत्रातील ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था, नोंदणीकृत स्वयंसहायता बचत गट, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० अंतर्गत नोंदणीकृत सहकारी संस्था, संस्था नोंदणी अधिनियम अंतर्गत नोंदणी झालेल्या सार्वजनिक संस्था किंवा सार्वजनिक न्यास, महिला स्वयंसहायता बचत गट व महिलांच्या सहकारी संस्था याप्रमाणे प्राथम्यक्रम असून या घटकांनी रास्तभाव दुकानासाठी स्वतंत्र अर्जाद्वारे मागणी करावी.
अर्ज संबंधित परिमंडळ अधिकारी कार्यालयात ५ रुपये किमतीला उपलब्ध होतील. स्वस्त धान्य दुकान परवान्यासाठी प्रसिद्ध केलेला जाहीरनामा प्रत्येक परिमंडळ कार्यालयाचा नोटीस फलक, पुणे व पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेचे प्रभाग अधिकारी कार्यालय, ग्रामपंचायत, तलाठी कार्यालयाचा नोटीस फलक, महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा समन्वय अधिकारी कार्यालय, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयाचा नोटीस फलक येथे प्रसिद्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यातील अटी, शर्ती, कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज ३१ जुलै २०२२ पर्यंत कार्यालयीन वेळेत संबंधित परिमंडळ कार्यालयात सादर करावेत.
शासन निर्णयानुसार इच्छुक संस्था, गट यांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह संबंधीत परिमंडळ अधिकारी यांचे कार्यालयाकडे मुदतीत अर्ज सादर करावेत. मुदतीनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.