बेकायदा फलक लावणा-यांवर गुन्हे दाखल करावेत ...आप.

पालिकेचे अनेक कर्मचारी आणि अधिकारी यांचे बेकायदा जाहिरात फलकांकडे दुर्लक्ष


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे महापालिका क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी रस्त्यावर व चौकात बेकायदा जाहिरात फलक लावल्याचे दिसून येते. महापालिका मात्र त्याच्यावर कारवाई करताना दिसून येत नाही किंवा कारवाई केली तर ती काही ठराविक लोकांवर केली जाते आणि अनेक लोकांना झुकते माप दिले जाते. अशा बेकायदा जाहिरात फलकामुळे शहर विद्रूप होते आणि पालिकेचे उत्पन्नही बुडते. तरीही पालिकेचे अनेक कर्मचारी आणि अधिकारी बेकायदा जाहिरात फलकांकडे दुर्लक्ष करतात. अर्थात असे दुर्लक्ष करण्याचीही किंमत पालिकेचे कर्मचारी आणि अधिकारी वसूल करत असावेत. विशेषत: पालिकेचे अधिकारी काही राजकीय पक्षांच्या जाहीरात फलकांवर कारवाई करताना पक्षपात करतात. त्यामुळेच अशा फलकांवर कारवाई होत नाही. बेकायदा फलकांसंदर्भात माननीय उच्च न्यायालयाने अनेकदा सर्व महापालिकांना ताकीद दिली आहे. तसेच असे फलक काढून टाकण्याचे आणि ते लावणार्‍यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. बेकायदा फलकावर कारवाई न करणे हा न्यायालयीन आदेशाचा अवमान आहे.


मा. उच्च न्यायालयाने अनेक जनहित याचिकांवर निर्णय देताना पुढील प्रमाणे आदेश दिले आहेत.

1.    बेकायदा जाहिरात फलकांमुळे 'स्वच्छ, सुंदर परिसर आणि वातावरण' ह्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन होते.

2.    सर्व बेकायदा  फलक, प्लेक्स, जाहिराती इ. त्वरीत काढून टाकाव्यात आणि संबंधीत  व्यक्तींविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करावी.

3.    बरेचसे फलक हे राजकीय कार्यकर्त्यांचे असतात. त्यांच्या नेत्यांची त्यांच्यावर मेहेरनजर व्हावी म्हणून असे फलक लावलेले असतात, सबब अश्या कार्यकर्त्यांविरुद्धच बेकायदेशीर फलक उभारले म्हणून कारवाई करावी.

4.    बेकायदा फलकांमुळे शहराचे विद्रुपीकरण तर होतेच पण खूपवेळा वाहतुकीचे सिग्नल्स देखील अडले जातात आणि  त्यामुळे वाहतुकीस अडथळा होतो.

5.    बेकायदा फलकामुळे महानगरपालिकांचे आर्थिक नुकसान देखील होते आणि म्हणून असे फलक उभारणाऱ्यांकडूनच दंडाची  तसेच फलक उतरवण्याच्या खर्चाची वसुली करावी.

6.    महानगरपालिकांनी बेकायदा फलकांवर कारवाई करण्यासाठी पुरेश्या भरारी पथकांची उभारणी करावी.

   या आदेशांची पुण्यात अंमलबजावणी होताना दिसत नाही. म्हणून आम्ही पुणे महापालिका हद्दीतील अनेक बेकायदा फलकांचे फोटो आपल्याकडे पाठवत आहोत. या सर्वांवर महापालिकेने कायदेशीर कारवाई केली पाहिजे. या सर्व फलकांचे मालक किंवा ते उभारणारे यांच्यावर एक आठवड्याच्या आत कारवाई करून संबधितांवर गुन्हे दाखल न केल्यास नाईलाजाने आम्हाला पुढील कायदेशीर पावले उचलावी लागतील आणि त्याची जबाबदारी संपूर्णपणे आपल्यावर राहील याची नोंद घ्यावी.



Post a Comment

Previous Post Next Post