सहकारी गृहरचना संस्थांमधील क्लब हाऊस मध्ये मतदान केंद्राची गरज....

सहकारी गृहरचना संस्थांमधील क्लब हाऊस मध्ये मतदान केंद्राची गरज.... 


प्रेस मीडिया लाईव्ह :

डॉ. तुषार निवृत्ती निकाळजे.

पुणे : भारतामध्ये साधारणतः  १० लाख ३८  हजार मतदान केंद्रे असतात. दिवसेंदिवस वाढत असलेली  लोकसंख्या हा आपल्या देशापुढे एक मोठा प्रश्न आहे. याच बरोबर मतदारांची संख्या देखील वाढत आहे. त्या अनुषंगाने मतदान केंद्रे  कमी पडत आहेत. काही प्रशासकीय अडचणींमुळे अपुरा शासकीय कर्मचारी वर्ग हा एक प्रश्न आहे. बऱ्याच वेळा आहे त्या मतदान केंद्रावर ज्यादा मतदार वर्ग केले जातात. त्यामुळे निवडणूक कर्मचारी व अधिकारी यांच्यावरील ताण वाढतो व मतदान प्रक्रिया पूर्ण होण्यास अधिक वेळ लागतो. सध्या पुण्याच्या महानगरपालिकेमध्ये  २३  गावांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. या २३  गावांची किमान  मतदारसंख्या २३ ते २५  हजार असू शकते. अशावेळी २५ नवीन मतदान केंद्रे स्थापन करावी  लागतात.  तसेच निवडणूक कर्मचारी व अधिकारी यांचा शोध घ्यावा लागतो व नव्याने नियुक्त करावे लागतात. सध्याच्या सामाजिक अंतराच्या प्रश्नामुळे व गर्दीच्या प्रसंगामुळे वेगळेच प्रश्न उपस्थित होत आहेत. यापूर्वी काही वेळा नाईलाजाने शासनामार्फत दोन ते तीन वर्ष बंद असलेल्या काही शाळांचा मतदान केंद्र म्हणून वापर करावा लागला आहे.  

                 या परिस्थितीवर एक उपायोजना म्हणून सहकारी गृह रचना संस्थेच्या क्लब हाऊस किंवा सांस्कृतिक सभागृहात मतदान केंद्र स्थापन केल्यास उपयोग होऊ शकेल. पुणे शहरात अंदाजे १७ हजार सहकारी गृह रचना संस्था आहेत. किमान दहा हजार सहकारी गृह रचना संस्थेमध्ये (सिंगल बिल्डिंग सोसायटी वगळून) प्रत्येक सोसायटीमध्ये दोन मतदान केंद्र स्थापन करता येऊ शकतात. या मतदान केंद्रावर त्याच सोसायटीमधील नागरिक व मतदार मतदान करू शकतील. यामुळे गर्दी व सामाजिक अंतर या भीतीपोटी सोसायटी बाहेरील मतदान केंद्रावर न जाणारे मतदार सोसायटीमधील मतदान केंद्रावर मतदान करू शकतात. तसेच वृद्ध किंवा वयोवृद्ध,  दिव्यांग हे सहजरित्या मतदान प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात. यामुळे भविष्यात मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता आहे. या विकल्पामुळे इतर मतदान केंद्रावरील मतदारांची संख्या देखील आपोआपच कमी होईल व मतदान प्रक्रिया जलद गतीने कमी वेळेत पार पडू शकेल. परंतु सहकारी गृह रचना संस्थेमध्ये मतदान केंद्र उभे करताना मतदान केंद्राच्या बाहेर निवडणूक आयोगाच्या सूचना चिकटविण्यास अडथळा येईल. कारण सूचना चिकटवल्यामुळे सोसायटीमधील क्लब हाऊसच्या भिंती खराब होऊ शकतात. याला पर्याय म्हणून एकच मोठा सूचनांचा बॅनर प्रवेशद्वारा जवळ लावणे अपेक्षित आहे. यामुळे कागदाचा खर्च वाचू शकेल. ही प्रक्रिया राबविताना सहकारी गृह रचना संस्थेच्या फेडरेशनला व त्यांच्या समित्यांना निवडणूक आयोगाने विश्वासात घेऊन चर्चा करणे आवश्यक आहे. सध्याच्या कोविड १९ (कोरोना) सारख्या सांसर्गिक रोगाच्या पार्श्वभूमीवर सहकारी संस्था देखील सहकार्य करतील अशी अपेक्षा आहे. 

क्रमशः

Post a Comment

Previous Post Next Post