अपघातात ठार झालेले तिघेही कर्नाटकातील बंगळुरू येथील आहेत
प्रेस मीडिया लाईव्ह :
पेठ वडगाव : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील किणी टोलनाक्याजवळ महामार्गावर नादुरुस्त होऊन थांबलेल्या कंटेनरला पुण्याच्या दिशेने निघालेल्या कारची धडक झाली. याच कारला पाठीमागून ट्रकने जोराची धडक दिल्याने या विचित्र अपघातात कारमधील तिघेजण जागीच ठार झाले. तर एक महिला जखमी झाली आहे. अपघातात ठार झालेले तिघेही कर्नाटकातील बंगळुरू येथील आहेत. हा अपघात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडला.
या धडकेत कारमधील त्रिलोकेश कुमार (वय ४२), संजना माहेश्वरी (वय २७), जिथ्या त्रिलेश (वय २१, सर्व रा. साईकापल्ली मीनाक्षीनगर, कामाक्षीपल्ल्या, बंगळुरू) अशी ठार झालेल्या तिघांची नावे आहेत, तर अरिनी एन. (वय ४१, बसवेश्वर नगर बंगळुरू) या गंभीर जखमी झाल्या आहेत. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील किणी टोलनाक्याजवळ मध्यरात्रीच्या सुमारास महामार्गावर गाडीचा अॅक्स्ल तुटल्याने महामार्गावर आयशर कंटेनर थांबला होता. कंटेनर लावताना कोणतीही दक्षता घेतली नव्हती.
दरम्यान, रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास बंगळुरूहून पुण्याच्या दिशेने निघालेली ही कार या महामार्गावर थांबलेल्या कंटेनरमध्ये घुसली. काही क्षणातच पाठीमागून आलेल्या ट्रकने कारला जोराची धडक दिली. या विचित्र अपघातात तिघे जागीच ठार झाले. हा अपघात इतका भयानक होता की, कारमधील तिघे जागीच ठार झाले आणि त्यांचे मृतदेह बाहेर काढणे अवघड झाले होते.