महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड

राज्याच्या इतिहासातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष ठरले आहेत. 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुंबई :  महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी अखेर राहुल नार्वेकर यांची निवड झाली आहे.विधानसभेत मोठ्या गदारोळात मतदान पार पडलं. भाजपकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे राजन साळवी मैदानात होते. या लढतीत नार्वेकर यांनी बाजी मारली. ते राज्याच्या इतिहासातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष ठरले आहेत. शिरगणती केल्यानंतर नार्वेकर यांना बहुमतापेक्षा जास्त 164 मतं मिळाली. तर राजन साळवी यांना 107 मतं मिळाली. समाजवादी पक्ष आणि एआयएमचे आमदार या मतदानात तटस्थ राहिले. एकूण तीन आमदार तटस्थ  राहिले. अशा पद्धतीनं नार्वेकर मोठ्या मतांनी विजयी झाले. आता अध्यक्षांची भूमिका आता महत्वाची असणार आहे. कारण उद्या शिंदे-फडणवीस सरकारची बहुमत चाचणी देखील पार पडणार आहे.    

   

    विधानमंडळावर सासरे आणि जावयांचं 'राज्य

राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्यानं विधानमंडळावर सासरे आणि जावयांचं 'राज्य' असणार आहे. विधानसभेत जावई राहुल नार्वेकर तर विधानपरिषदेत त्यांचे सासरे रामराजे नाईक निंबाळकर हे सध्या विधान परिषदेचे सभापती आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती म्हणून जावई आणि सासरे अशी जोडी पाहायला मिळाली आहे.

राहुल नार्वेकर हे 45 वर्षांचे आहेत. ते विधानसभेचे आजवरचे सर्वात तरूण अध्यक्ष ठरले आहेत. राहुल नार्वेकर हे एकेकाळचे शिवसेनेचे खंदे नेते होते. त्यानंतर ते राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेत होते. आता ते भाजपाचे आमदार आहेत. राहुल नार्वेकर यांना भाजपाने विधानसभा अध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर करत आणखी एक मास्टरस्ट्रोक खेळला आहे. राहुल नार्वेकर हे मुंबईतील कुलाबा मतदार संघाचे आमदार आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post