प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापूर : (जिमाका) : मंकीपॉक्स या विषाणूची लागण झालेल्या देशातून आलेल्या नागरिकांवर व संशयितांवर लक्ष ठेवण्याच्या सुचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या आहेत. या विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असून केरळमध्ये दोन रुग्ण आढळले आहेत. आपल्या परिसरात असे संशयित रुग्ण आढळल्यास नागरिकांनी आरोग्य विभागाला माहिती द्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
मंकीपॉक्स या विषाणूचा संसर्ग झालेल्यांना ६ ते १३ दिवस ताप येतो. जीभ, चेहरा, हात-पायावर पुरळ येतात. दुसऱ्या आठवड्यात पुरळ सुकून त्याचे चट्टे तयार होतात. याशिवाय घसा खवखवणे, खोकला, स्नायूदुखी, डोकेदुखी, थंडी वाजून ताप, लसिकाग्रंथींना सूज अशी लक्षणे दिसून येतात.
या विषाणूचा संसर्ग मध्य व पश्चिम आफ्रिकन देशांमध्ये (कॅमेरून मध्य आफ्रिकन प्रजासत्ताक, कोटे डी आयव्हरी, काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक, गॅबॉन, लायबेरिया, नायजेरिया, प्रजासत्ताक काँगो आणि सिएरा लिओनचा या व्यतिरिक्त यूएसए, यूके बेल्जियम, फ्रान्स, जर्मनी, इटली, नेदरलँड, पोर्तुगाल, स्पेन, स्वीडन, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ऑस्ट्रिया, कॅनरी बेटे इस्रायल आणि स्वित्झर्लंड) जास्त झाला असून तो श्वसनामार्फत पसरतो. गेल्या २१ दिवसात संसर्गित देशांमधून प्रवास करून आलेल्या संशयित रुग्णांवर बारकाईने लक्ष ठेवून त्यांना अलगीकरण कक्षात ठेवून उपचार केले जातील. रिपोर्ट पॉझीटिव्ह आल्यास कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करून पुढे २१ दिवस देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. परदेशातून आलेल्या नागरिकांनी घरीच अलगीकरणात रहावे व लक्षणं आढळल्यास जवळच्या आरोग्य संस्था व साथ कंट्रोल रुमवर संपर्क साधून तातडीने उपचार घ्यावेत.