प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापूर : (जिमाका) : अभय योजनेतील 90 टक्के दंड सवलतीचा लाभ 31 जुलै पर्यत लागू असल्याने जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. तसेच गाव नमुना नंबर 7/12 वरील मुद्रांक शुल्क बोजाच्या नोंदी कमी करुन घ्याव्यात, असे आवाहन जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने यांनी केले आहे.
मुद्रांक शुल्क कमी भरलेल्या रक्कमेवर आकारण्यात येणा-या दंडामध्ये सवलत देण्यासाठी 31 मार्च 2022 पूर्वी ज्या प्रकरणात दंड वसुलीबाबत पक्षकारास/दस्त निष्पादकास किमान एक तरी नोटीस बजावलेली आहे, अशा नोटीस निर्गमित केलेल्या मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय व त्यांचे अधिनस्त असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयातील प्रलंबित प्रकरणातील कमी पडलेल्या मुद्रांक शुल्कावरील दंड सवलतीसाठी ही अभय योजना लागू आहे.
मुद्रांक अधिनियमातील तरतुदीनुसार दस्त निष्पादीत झालेल्या दिनांकापासून कमी भरलेल्या मुद्रांक शुल्क रक्कमेवर दरमहा 2 टक्के (जास्तीत जास्त चौपट ) दंड अनुज्ञेय आहे.
या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये दि. 1 एप्रिल ते 31 जुलै 2022 या कालावधीकरिता दंड सवलत 90 टक्के (दंड रकमेच्या) व दुस-या टप्यामध्ये दिनांक 1 जुलै ते 30 नोव्हेंबर 2022 या कालावधीकरिता दंड सवलत 50 टक्के (दंड रकमेच्या) इतकी सवलत देण्यात येणार आहे. न्यायप्रविष्ट प्रकरणांनाही मुद्रांक शुल्क दंड सवलत अभय योजना लागू राहील, त्यासाठी संबंधितांना न्यायप्रविष्ट प्रकरण बिनशर्त मागे घ्यावे लागेल व तसे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागेल. दि. 1 एप्रिल रोजी किंवा त्यानंतर दाखल होणा-या नवीन प्रकरणांना अभय योजना लागू राहणार नाही, असेही मुद्रांक जिल्हाधिकारी श्री. माने यांनी कळविले आहे.