कोल्हापूर पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ सातत्यानं वाढ होत आहे.
प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापूर : मागच्या दोन दिवसापासून राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे.अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्यानं पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुंबई आणि उपनगरासह कोकणातील सर्वच जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. कोकणात काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर कोल्हापूरमध्ये देखील पावसाचा जोर वाढत असल्याचं चित्र दिसत आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळं प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांतही पावसानं हजेरी लावली आहे.
दरम्यान, हवामान विभागान दिलेल्या माहितीनुसार पुढच्या 4 ते 5 दिवस राज्यात सर्वदूर पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि इतर काही भागात अती मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
कोकणात मुसळधार
रायगड जिल्ह्यातील पोलादपूर , महाड, माणगाव, पनवेल , पेण , मुरुड तालुक्यातील रहिवाशांचे स्थलांतरण केले आहे. रायगड जिल्ह्यातील 26 गावातील रहिवाशांचे स्थलांतरण केले आहे. रायगड जिल्ह्यातील 1 हजार 716 रहिवाशांचे स्थलांतरण केले आहे. तसेच रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहेत. या मुसळधार पावसामुळं जिल्ह्यातील नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट सध्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळं या घाटातील दरड खाली कोसळली आहे. हा घाट धोकादायक स्थितीत असल्यानं प्रशासनाने योग्य ती खबदारी घेतली आहे.
कोल्हापूरमध्ये जोरदार पाऊस
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसाने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी 25 फूट 8 इंचावर पोहोचली आहे. राजाराम बंधाराही पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाकडून बंधाऱ्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण 15 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. जिल्हा प्रशासनाकडून धोकादायक मार्गावरून वाहतूक करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.