समाज कल्याण कार्यालयात गौरी पोवार 'कार्यालयीन सहाय्यक' पदावर रुजू.
कोल्हापूर : (जिमाका) : तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार व सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांच्या पुढाकाराने जिल्हयात विविध उपक्रम घेण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने सहाय्यक आयुक्त कार्यालय व कै. अंकुशराव लांडगे शैक्षणिक व सामाजिक ट्रस्ट, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने २ तृतीयपंथीय व्यक्तींना सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, कोल्हापूर कार्यालयात 'कार्यालयीन सहाय्यक' म्हणून नियुक्ती दिली आहे. आज दि. 1 जुलै रोजी समाजकल्याण कार्यालयात त्या हजर झाल्या आहेत. तर जोया दिन्नी या तृतीयपंथी देखील दोन दिवसात रुजू होणार आहेत, अशी माहिती समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी दिली आहे.
तृतीयपंथीयांच्या हक्काचे संरक्षण व कल्याण योजनेअंतर्गत शासन निर्णयान्वये जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या जिल्हा निवारण समितीच्या मान्यतेने तृतीयपंथी व्यक्तींच्या कल्याणाच्या प्रयोजनासाठी विविध उपक्रम समाज कल्याण कार्यालयाच्या वतीने राबविण्यात येतात. तृतीयपंथीयांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच व्यवसाय व कौशल्य विकासाबाबत शासन प्रयत्न करत आहे.
या नाविन्यपूर्ण निर्णयामुळे समाजात नवी क्रांती घडून समाजातील या दुर्लक्षित घटकाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलण्यास सुरुवात होईल, तसेच इतरत्र त्यांना सन्मानाची वागणूक मिळण्याच्या दृष्टिने हे प्रयत्न नक्कीच सार्थकी होतील. या समाज घटकाचे शासनामार्फत मुलभूत अधिकारांचे संरक्षण करून त्यांना विकासाची समान संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, असे मत समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी समाज कल्याण कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.