मतदार कार्डसोबत आधार जोडणीसाठी पुढाकार घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन



  कोल्हापूर : (जिमाका): कोणत्याही एकाच मतदार संघातील मतदार यादीत नाव कायम ठेवता यावे या उद्देशाने मतदार कार्ड सोबत आता आधार क्रमांक लिंक केला जाणार आहे. मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांकाची जोडणी करून घेण्यासाठी 1 ऑगस्ट 2022 पासून मोठया संख्येने पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे. 

            मतदार नमुना फॉर्म क्र. 6 ब व्दारे आधार क्रमांक सादर करू शकतात. आधार क्रमांक सादर करणे हे मतदारांच्यावतीने ऐच्छिक आहे. नमुना फॉर्म क्र. 6 ब BLO यांच्या मार्फतही घरोघरी भेटी देवून गोळा करण्यात येईल. विशेष शिबिराच्या आयोजनामधूनही नमुना फॉर्म क्र. 6 ब गोळा करण्यात येईल. मतदार कार्डसोबत आधार जोडणीसाठी पॅनकार्ड, फोटोसहीत किसान पासबुक, पासपोर्ट, मतदान ओळखपत्र, मनरेगा जॉब कार्ड, आरोग्य स्मार्ट कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, फोटोसहीत पेन्शन कागदपत्रे, केंद्र व राज्य शासन कर्मचा-यांचे ओळखपत्र, सामाजिक न्याय विभागातील ओळखपत्र यापैकी एक पुरावा ग्राह्य धरण्यात येईल. मतदार यादीशी आधार क्रमांकाची जोडणी करणे ऐच्छिक आहे.


  आधार नोंदणी प्रक्रिया पुढीलप्रमाणे - प्रत्येक मतदाराकडून आधार क्रमांक विहीत स्वरूपात व विहीत रितीने मिळविण्यासाठी वैधानिकरित्या मतदार नोंदणी अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आलेले आहेत. 17 जून 2022 च्या अधिसूचनेनुसार 1 एप्रिल 2023 पर्यंत किंवा तत्पूर्वी मतदार यादीत नाव असलेला प्रत्येक व्यक्ती त्याचा आधार क्रमांक नमुना फॉर्म क्र. 6 ब मध्ये भरून देवू शकतो. आवश्यक नमुना फॉर्म क्र.6 ब च्या छापील प्रती मतदारांना उपलब्ध करून देण्यात येईल.

 नमुना फॉर्म क्र. 6 ब भारत निवडणूक आयोगाच्या  eci.gov.in व मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या https://ococlection.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. मतदारांना ऑनलाईन पध्दतीने आधार क्रमांक भरण्यासाठी नमुना फॉर्म क्र.6 ब ERO NET GARUDA NVSP, VHP या माध्यमांवर देखील उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांनी दिली.


Post a Comment

Previous Post Next Post