नगरपालिकांनी विरंगुळा केंद्र स्थापन करुन अहवाल सादर करावा

30 जूनच्या बैठकीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

प्रेस मीडिया लाईव्ह :

कोल्हापूर, दि. 1 (जिमाका): नगरपालिकांनी दि. 8 जुलै पर्यंत विरंगुळा केंद्राची स्थापन करुन त्याचा अहवाल सहायक आयुक्त कार्यालयास सादर करावा. ग्रामीण भागातील विरंगुळा केंद्र स्थापन करण्याबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आढावा घ्यावा. जातीवाचक नावे बदलण्यासाठीच्या बैठकीमध्ये नगरपालिका, महानगरपालिका व ग्रामीण भागातील गावांची, रस्त्यांची व वस्त्यांची नावे बदलण्यासाठीची प्रक्रिया एका महिन्यात पूर्ण करून अहवाल सादर करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या.


 सहायक आयुक्त समाज कल्याण कोल्हापूर यांच्याकडील ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी जिल्हास्तरावरील समिती, जातीवाचक नावे बदलण्यासाठी समिती, अनु. जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 अंतर्गत नुकसान भरपाई देण्यासाठी जिल्हा दक्षता व सनियंत्रण समिती, दादासाहेब सबळीकरण योजना समिती, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना समिती, वसंतराव नाईक तांडा वस्ती समिती या योजनांबाबत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली दि. 30 जून रोजी बैठका संपन्न झाल्या, त्यावेळी ते बोलत होते.

जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीच्या बैठकीमध्ये पोलीस विभागाने दोषारोप 60 दिवसाच्या आत सादर करावीत व अर्थसहाय्य लागू करतेवेळी गुन्ह्यातील वर्णनानुसार अर्थसहाय लागू करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी दिल्या. 

 दादासाहेब सबळीकरण समितीच्या बैठकीमध्ये कार्यालयास प्राप्त प्रस्तावाच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याबाबत आदेशित करण्यात आले. वसंतराव नाईक तांडा वस्ती योजना समितीच्या बैठकीमध्ये जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील जी गावे लोकसंख्येने मोठी आहेत त्या प्रत्येक तालुक्यातून 10 टक्केच्या प्रमाणात परिपूर्ण पात्र प्रस्ताव सहायक आयुक्त यांच्याकडे सादर करावा. 

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना समितीच्या बैठकीमध्ये जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी व सर्व मुख्याधिकारी नगरपालिका यांना विजाभज समाजातील लोकांना जमीन देण्याबाबत शासन निर्णयातील अटी व शर्तीच्या अधीन राहून योजनेची अंमलबजावणी करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी दिल्या आहेत.


Post a Comment

Previous Post Next Post