प्रेस मीडिया लाईव्ह :
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
( ९८ ५०८ ३० २९० )
Prasad.kulkarni65@gmail.com
लोकनेते भाई गणपतराव देशमुख यांचा शनिवार ता.३० जुलै रोजी पहिला स्मृतीदिन. १० ऑगस्ट १९२७ रोजी जन्मलेले भाई गणपतराव देशमुख हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक लढाऊ व कर्मयोगी नेतृत्व होतं. महाराष्ट्राच्या विधानसभेत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून तब्बल अकरा वेळा ते आमदार म्हणून निवडून गेले.महाराष्ट्र सरकारमध्ये विविध खात्यांचे मंत्रीपद, विरोधी पक्षनेतेपद भूषवणारे शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते असलेले भाई गणपतराव देशमुख सर्वार्थाने लोकनेते होते. महाराष्ट्राच्या कष्टकरी, उपेक्षित, वंचित, गरीब घटकांचा तारणहार असलेले एक दिग्गज नेतृत्व आपल्यातून निघून जाऊन आज एक वर्ष झाले.अतिशय साधी राहणी आणि वंचितांच्या विकासाच्या ध्यासाची उच्च विचारसरणी हे त्यांचे वैशिष्ट्य होतं. सक्षम नेतृत्व आपल्या मतदारसंघाचा पर्यायाने जिल्ह्याचा कसा कायापालट करू शकते याचे आदर्श उदाहरण म्हणून त्यांच्याकडे पाहावे लागेल. सलग तीन-चार पिढ्या जनतेतून निवडून जाण्याची असामान्य किमया आबासाहेब करू शकले. याचे कारण फक्त आणि फक्त त्यांची लोकांप्रती असलेली बांधिलकी हेच आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे हे वर्ष आहे. एक लोकप्रतिनिधी म्हणून अर्ध्या शतकाहून अधिक काळ विधानसभेत प्रतिनिधित्व करणाऱ्या भारतातील मोजक्या नेत्यांपैकी ते होते.
आबासाहेब यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातील पेनुर या गावचा. एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या आबासाहेबांचे प्राथमिक शिक्षण पेनुर, माध्यमिक शिक्षण पंढरपुर,तर बीए.एलएलबी चे शिक्षण पुणे येथे झाले. १९४८ मध्ये शेतकरी कामगार पक्षाची स्थापना. त्यावेळी संपूर्ण पेनुर गावच काँग्रेस मधून शेतकरी कामगार पक्षामध्ये गेले.त्या काळात वयाच्या विशीत असणाऱ्या गणपतरावनी गोविंदराव बुरगुटे, एस.एम. पाटील, एल.बी. कुरकुरे ,डॉ. आप्पासाहेब पवार यांच्या सहकार्याने 'शेतकरी कामगार पक्ष विद्यार्थी सभा' स्थापन केली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लढे उभे केले. शेकापक्षाच्या साप्ताहिक ' जनसत्ता ' चा प्रसार आणि प्रचार केला. डाव्या मार्क्सवादी विचारांच्या नेत्यांच्या अभ्यास वर्गाना त्यानी सातत्याने हजेरी लावली. शंकरराव मोरे, केशवराव जेधे,मालिनीताई तुळपुळे,र.के.खाडिलकर, भाऊसाहेब शिरोळे आदी अनेकांच्या विचारांचा व व्यक्तित्वाचा त्यांच्यावर प्रभाव पडला. सांगोला तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाची बांधणी करण्यात आणि समाजकारणात गढून गेले.संयुक्त महाराष्ट्र चळवळीत ते सक्रिय होते.त्यांना तुरुंगवासही घडला. १९५९ साली क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आबासाहेबांनी सांगोल्यात एक दुष्काळ परिषद बोलावली. ती परिषद अतिशय यशस्वी झाली. आणि आबासाहेबांचे नेतृत्व पुढे येऊ लागले.ते वयाच्या पस्तीशीत १९६२ साली आमदार म्हणून निवडून आले.आणि एका वेळचा अपवाद वगळता अर्धशतकाहून अधिक काळ त्या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी झाले.
आबासाहेबांनी आपल्या पक्षीय विचारधारेशी कधीही तोडजोड केलेली नव्हती.ते बहुतांश काळ विरोधी पक्षाचे राजकारणच करत राहिले.पण राजकारणात निर्माण झालेल्या तत्कालीन परिस्थितीमुळे ते १९७८ च्या पुलोद मंत्रिमंडळात शेतीमंत्री म्हणून कार्यरत होते. आणि १९९९ च्या पुरोगामी लोकशाही आघाडीच्या सरकारात " पणन व रोजगार हमी योजना मंत्री" म्हणून त्यांनी काम केलं.मंत्रीपदी असताना त्यांनी शेती सुधारण्याचे अनेक भरीव कार्यक्रम व योजना आखल्या होत्या. पूर्वीच्या योजनेतील अनेक दोष दूर करून उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्याला नव्या तंत्रज्ञानाची माहिती त्याच्या बांधावरच मिळण्याची व्यवस्था त्यांनी केली. शेतीमालाला किमान किफायतशीर भाव मिळाला पाहिजे यासाठी आबासाहेब १९६२च्या आधीपासून आवाज उठवत राहिले. ऊस,कापूस यासह विविध पिकांच्या बाबत त्यांनी काही मूलभूत भूमिका मांडली. प्रा. डॉ.एन.डी.पाटील यांच्या बरोबरीने आबांनी शेती, शेतकरी,शेतमजूर, शेतमाल,बाजारपेठ आदी क्षेत्रात मोठे काम केले. १९७२ च्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वि.स. पागे यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेली रोजगार हमी योजना ही अतिशय महत्त्वाची योजना होती. या योजनेची अंमलबजावणी करताना काही दोष व अपप्रवृत्ती निर्माण झाल्या होत्या. त्याचे भांडवल करून ही योजना रद्द करण्याचा घाट काही हीतसंबंधी मंडळी घालत होती. त्याला योग्य पद्धतीने अभ्यासपूर्ण व प्रशासनिक कौशल्य दाखवत अबासाहेबानी उत्तर दिले. आणि ही योजना कार्यरत ठेवण्यात मोठी भागीदारी केली.
दुष्काळप्रवण भागातून निवडून येणाऱ्या आबासाहेबांनी शेतीसाठी पाण्याची गरज ओळखली.आपल्या नियोजनामध्ये पाणी प्रश्न अग्रक्रमावर ठेवला. वर्षानुवर्षे ताटकळलेल्या बुद्धेहाळच्या तलावाच्या निर्मिती, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन यासह कृष्णा आणि वारणेचे पाणी माणदेशात आणण्यासाठी विविध योजनांची त्यांनी आखणी केली. लोक आंदोलने उभारून त्या योजना कार्यान्वित करून घेतल्या. त्याचबरोबर केवळ धान्य पिकांवर अवलंबून न राहता आपल्या भागामध्ये चिकू, डाळिंब ,बोर याची शेती करण्याला प्रोत्साहन दिले. आणि फळ लागवडीतून शेतकऱ्यांना समृद्धी मिळवून दिली.
आबासाहेबांनी शेतीबरोबरच परिसराच्या औद्योगिक विकासाकडेही अत्यंत गांभीर्याने लक्ष दिले. सांगोल्यात १९८० साली 'शेतकरी सहकारी सूतगिरणी उभारली. आज वार्षिक शंभर कोटींहून अधिक उलाढाल करणारी ही सूतगिरणी भारतातच नव्हे तर जगातील सहकारातील एक आदर्श सूतगिरणी म्हणून ओळखली जाते. चीन ,बांगलादेश ,इजिप्त, मलेशिया, इंडोनेशिया या देशात येथून सूत निर्यात केले जाते. महाराष्ट्रातील इतर ठिकाणच्या सहकारी सूतगिरण्यांची अवस्था विकलांग होत असताना आबासाहेबांनी स्थापलेली ही सूतगिरणी अतिशय उत्तम काम करत आहे. याचे कारण सहकारातील सर्व दोष टाळण्याला त्यांनी प्राधान्य दिले होते.
माणदेशी सहकारी साखर कारखाना,शेतकरी महिला सहकारी सूतगिरणी त्यांनी उभारली.आबासाहेबांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून आपल्या भागामध्ये शिक्षण संस्थांचे एक जाळे विणले.त्यातून हजारो गोरगरीब कुटुंबातील मुलांना शिक्षणाची कवाडे खुली करून दिली.सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ,शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ यांचा त्यांनी विस्तार केला.
लोकनेते असलेल्या आबांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत ध्येयनिष्ठ व सक्षम कार्यकर्ते, नेते निर्माण केले. ग्रामपंचायत, पंचायत समिती ,जिल्हा परिषद, सहकारी संस्था या ठिकाणी अभ्यासू व ध्येयनिष्ठ कार्यकर्त्यांची एक मजबूत फळी त्यांनी उभी केली.समाजाचा अर्धा घटक असलेल्या महिलांना पुरुषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रात उभे करण्यामध्ये आबासाहेबांनी जाणीवपूर्वक लक्ष दिले. मागास जाती-जमातीतील नेतृत्व पुढे आणले. निस्पृह सामाजिक,राजकीय कार्यकर्त्यांच्या दोन पिढ्या त्यांनी घडवल्या. एका दुष्काळी भागाचे नंदनवन कसे करता येते याचे उदाहरण आबासाहेबांनी आपणा सर्वांपुढे घालून दिले आहे.
आबासाहेबांचा समाजवादी प्रबोधिनीच्या स्थापनेपासून अतिशय जिव्हाळ्याचा संबंध होता.समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक कालवश आचार्य शांतारामबापू गरुड,कालवश प्रा. डॉ. एन. डी. पाटील, शहीद गोविंदराव पानसरे यांच्याशी त्यांचे घट्ट ऋणानुबंध होते. आणि आणि अर्थातच या सर्वांमुळे माझाही १९८५ पासून आबासाहेबांची जवळचा ऋणानुबंध तयार झाला होता. समाजवादी प्रबोधिनीच्या अनेक कार्यक्रमांना अनेक वेळा आबासाहेब येत असत. प्रबोधिनीच्या उपक्रमांची सातत्याने चौकशी करत असत. लोकप्रबोधनाचे काम हे अतिशय महत्त्वाचे आहे व ते सातत्यपूर्ण चालले पाहिजे याची जाण, भान,तळमळ असणारे ते नेते होते. आबासाहेबांच्या एक्याऐंशीव्या वाढदिवसाच्या निमित्त २००७ साली " झेपावणारा ग्रामीण महाराष्ट्र " या नावाचा एक ग्रंथ पन्नालाल सुराणा व प्रा. नानासाहेब लिगाडे यांनी संपादित केलेला होता. त्या गौरव ग्रंथात मी " सहकार काल आज उद्या "हा लेख मी लिहिला होता. सहकार हा आबासाहेबांच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याने गौरव ग्रंथ प्रकाशित झाल्यावर माझा तो आबासाहेबांनी बारकाईने वाचला होता.तो आवडल्याचा आवर्जून फोनही केला होता .अर्थात गेली अनेक वर्षे प्रबोधिनीच्या सातत्यपूर्ण कामाबद्दल कौतुक करणारा आबासाहेबांचा अनेकदा येणारा फोन ही मोठी ऊर्जा होती.
समाजवादी प्रबोधिनीच्या "प्रबोधन प्रकाशन ज्योती " मासिकाची वार्षिक वर्गणी दरवर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आठवणीने आबासाहेब पाठवत असत. एक लोकनेता, आमदार बारकाईने वर्गणी भरण्याकडे लक्ष देतो, अंकातील लेख आवडल्यावर अभिप्राय देतो, संपादकीयाचे कौतुक करतो , काही ठिकाणी भाषणात संदर्भ देतो ही दुर्मिळ गोष्ट होती. याचे मला नेहमीच कौतुकाश्चर्य वाटत आले आहे. प्रबोधनाचे आणि परिवर्तनाचे कोणतेही नियतकालिक समविचारी सहकाऱ्यांच्या वैचारिक बांधिलकी मांडणाऱ्या हितचिंतकांच्या स्वतः वर्गणीदार होण्यातूनच चालत असते याचे भान आबासाहेबांसारख्या दिगज नेत्यालाही होते.आपण प्रत्येकाने त्यांच्याकडून ही बाब जरी आत्मसात केली तरी ती प्रबोधनाचा विचार पुढे नेण्यात आपली मोठी कृतिशील भागीदारी ठरू शकते. असामान्य असूनही सामान्य राहणाऱ्या परिवर्तन चळवळीतील मार्गदर्शक लोकनेत्याला पहिल्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन..!
(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे 'सरचिटणीस' आहेत.!आणि प्रबोधिनीच्या वतीने गेली तेहत्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत.)