प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
( ९८ ५०८ ३० २९० )
Prasad.kulkarni65@gmail.com
भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील थोर नेते म्हणून लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जगभर ओळख आहे. १ ऑगस्ट १९२० रोजी लोकमान्य टिळक कालवश झाले.त्यांचा १०२ रा स्मृतीदिन सोमवार ता.१ ऑगस्ट २०२२ रोजी आहे. २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील चिखली या गावात जन्मलेले टिळक हे एक असामान्य व्यक्तीमत्व होते.त्यांचा काळ ‘टिळक युग’म्हणून ओळखला जातो.लोकमान्यांच्या निधनानंतर २७ वर्षांनी भारत स्वतंत्र झाला.पण स्वातंत्र्याची तयारी लोकमान्यांनी मोठया जनजागरणाने केली होती.म्हणूनच भारतासह जगभरच्या अनेक पारतंत्र्यात खितपत पडलेल्या देशांना त्यांच्या राष्ट्रकार्यातून साम्राज्यवादी शक्तींविरोधी लढण्याची प्रेरणा मिळाली हे ऐतिहासिक सत्य आहे.
टिळकांच्या आईचे नाव पार्वतीबाई तर वडिलांचे नाव गंगाधर होते.टिळकांचे मूळ नाव केशव असे होते पण ते बाळ यानावानेच ओळखले गेले.टिळकांचे वडील शिक्षण खात्यात नोकरीला होते.१८६६ साली त्यांची बदली पुण्याला झाली आणि साहजिकच कुटुंबही तेथे आले.टिळक पुण्यात शिकले,वाढले.केसरी व मराठा या वर्तमानपत्रापासून न्यू इंग्लिश स्कूल,डेक्कन एज्युकेशन सोसायटी अशा शिक्षण संस्थांची तेथे त्यांनी उभारणी केली.देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्वही तेथूनच केले.
लोकमान्य टिळक आणि त्यांचे सहकारी सुधारकाग्रणी गोपाळ गणेश आगरकर यांचे आधी सामाजिक की आधी राजकीय सुधारणा याबाबत मतभेद होते.टिळक आधी राजकीय हक्क मिळाले पाहिजेत याबाबत आग्रही होते.त्यांनी म्हटले आहे की,” सामाजिक सुधारणा हा काही राजकीय स्वातंत्र्याचा मार्ग नाही.ज्या सुधारणांचा आग्रह सुधारक धरत आहेत त्या सर्व अयर्लंडमध्ये झाल्या असूनही ते सात- आठशे वर्षे अन्याय परवशतेच्या स्थितीतून बाहेर पडू शकलेले नाही.’सामाजिक सुधारणांना आपला विरोध नाही हेही त्यांनी म्हटले होते. त्यांच्या मते”राजकीय हक्कांचा सामाजिक सुधारणेशी जो संबंध जोडला जातो तो भ्रांतीमुलक,निराधार असल्यामुळे त्यास आमचा विरोध आहे.राजकीय हक्क मिळवण्याचे मार्ग सामाजिक सुधारणा हे नसून निराळेच आहेत.”टिळक -आगरकर यांनी केसरी व मराठा या वृत्तपत्रातून कोल्हापूर संस्थानचे दिवाण माधवराव बर्वे आणि इंग्रज सरकारच्या छत्रपती शिवाजी यांच्या संदर्भातील वर्तनाबाबत टीका केली होती.या लेखनामुळे आपली बदनामी झाली अशी तक्रार बर्वे यांनी केली होती.या प्रकरणात १९८२ साली टिळक व आगरकर यांना चार महिन्यांची शिक्षा होऊन डोंगरीच्या तुरुंगात ठेवण्यात आले होते.
१८८५ साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली.टिळक १८८९ पासून त्याच्याशी जोडले गेले.पुढे पाच सहा वर्षात टिळक पुणे नगरपरिषद व मुंबई विधानपरिषदेत लोकप्रतिनिधी म्हणून निवडले गेले.तसेच मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्यही झाले. १८९८ साली पुण्यात चाफेकर बंधूनी जुलमी ब्रिटिश अधिकारी रँडला मारले.त्यावर ब्रिटिशांनी भारतीय जनतेवर दडपशाही सुरू केली.त्यावर टिळकांनी ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ?’ हा अग्रलेख लिहिला.केसरीतील हे लेखन प्रक्षोभक आहे असे सांगत ब्रिटिशांनी त्यांच्यावर ‘राजद्रोहाचा खटला ‘दाखल केला व त्यांना तुरुंगात डांबले.त्यांना दीड वर्षाची शिक्षा झाली.१९०८ साली त्यांच्यावर दुसरा राजद्रोहाचा खटला दाखल केला व त्यांना सहा वर्षे शिक्षा झाली.ब्रम्हदेशातील मंडाले येथे त्यांना ठेवले गेले.तेथेच त्यांनी ‘गीतारहस्य ‘ हा ग्रंथ लिहिला.
१९१४ साली मंडाले हुन सुटका झाल्यावर टिळक काँग्रेसमधील जहाल व मवाळ यांच्यातील दुफळीला सांधणे,काँग्रेस व मुस्लिम लीग यांच्यात ‘लखनौ करार ‘घडवून आणणे या कामात व्यग्र होते.१९१७ साली त्यांनी ‘होमरूल लीग ‘हा एक नवा राजकीय मंच श्रीमती अँनी बेझंट यांच्या साथीने उभारला.तसेच ‘हिंदी स्वराज्य संघ ‘ही स्थापन केला.त्याबाबतही त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरला गेला पण ते निर्दोष सुटले.१९१९ साली चिरोल या ब्रिटिश पत्रकाराच्या विरोधातील खटल्यासाठी टिळक इंग्लंडला गेले.तेथेही ते भारतीय स्वातंत्र्यासाठी कार्यरत होते. याच चिरोलने त्यांना उपहासाने ‘हिंदी असंतोषाचे जनक ‘असे म्हटले,पण येथील जनतेने ते गौरवास्पद मानून अधिक उल्लेखित केले .१९२० च्या प्रारंभी टिळकांनी ‘काँग्रेस डेमोक्रॅटिक स्वराज्य पक्ष ‘ या पक्षाची स्थापना होमरूल लीगच्या पुणे परिषदेतील ठरावानुसार केली होती.त्या पक्षाची राजकीय भूमिका व जाहिरनामाही २० एप्रिल १९२० रोजी प्रकाशित केला होता.काँग्रेसशी एकनिष्ठ राहणे आणि लोकशाहीवर श्रद्धा ठेवणे ही या पक्षाची मुख्य तत्वे होती.
राष्ट्रीय शिक्षण,स्वदेशी,बहिष्कार आणि असहकार ही शस्त्रेच स्वराज्य मिळवून देतील हे जनतेच्या मनावर टिळक बिंबवत राहिले.
खऱ्या अर्थाने राष्ट्र म्हणून घडण्यासाठी राष्ट्रीय भूमिकेतून शिक्षण दिले पाहिजे याचा आग्रह त्यांनी धरला.शिक्षणातून कर्तव्यदक्ष व बहुश्रुत नागरिक निर्माण करण्याबरोबरच उच्चतम ज्ञानाची उपासना करणारे अभ्यासक,संशोधकही तयार झाले पाहिजेत हा त्यांचा आग्रह होता.इंग्रजी भाषेचे महत्व त्यांनी जाणले होते.मात्र राष्ट्र म्हणून भारताने देवनागरी लिपीतील हिंदी भाषेचा राष्ट्रभाषा म्हणून स्वीकार करावा आणि मातृभाषेच्या माध्यमातून शिक्षण घेण्यासाठी अधिकाधिक प्रयत्नशील रहावे असे त्यांनी सांगितले.राष्ट्रीय शिक्षणाने लोकांची मने तयार होतील,स्वदेशीमुळे ब्रिटिशांच्या नाड्या आवळतील आणि बहिष्कार व असहकाराने त्यांना येथील राज्यकारभार करणे अवघड होईल असे टिळकांचे मत होते.
सुस्पष्ट राजकीय मते असणाऱ्या टिळकांनी इंग्रजी राजवटीबरोबर भारतात अनेक नव्या गोष्टी आल्या आहेत आणि त्याचा आपण डोळसपणे स्वीकार केला पाहिजे हे जाणले होते.म्हणूनच त्यांनी राष्ट्रीयत्व,स्वातंत्र्य,लोकशाही या संकल्पना जाणीवपूर्वक उल्लेखित केल्या.इंग्रजी राजवट ही परकीय सत्ता आहे आणि कोणतीही परकीय सत्ता पारतंत्र्यातील जनतेचे कल्याण करू शकत नाही ही त्यांची ठाम धारणा होती.म्हणूनच ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळणारच ‘ अशी सिंहगर्जना त्यांनी केली.ब्रिटिश साम्राज्यशाही भारताची फक्त आणि फक्त पिळवणूकच करते या भूमिकेबाबत ते कमालीचे आग्रही होते.
लोकमान्य हे अतिशय झुंझार नेते होते.प्रखर राष्ट्रवादी देशभक्त होते. भारतीय तत्वज्ञानाचे ख्यातनाम भाष्यकार होते.श्रेष्ठ दर्जाचे ग्रंथकार ,संपादक होते.असामान्य बुद्धिमत्ता लाभलेल्या टिळकांना गणित,तत्वज्ञान,इतिहास,संशोधन इत्यादींत गती होती.पण त्यांनी परिस्थितीची गरज ओळखून देशकार्यात वाहून घेतले.तरीही त्यांचे गीतारहस्य,द ओरायन,आर्टिक्ट होम इन दि वेदाज यासारखे ग्रंथ प्रचंड गाजले.त्यांचे अग्रलेख भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील जनजागृतीचे एक मौलिक साधन ठरले.
हे सारे एका बाजूला असतांना टिळक सामाजिक बाबतीत अनेकदा कर्मठ भूमिका घेताना दिसले म्हणून त्यांच्यावर त्यांच्या हयातीत आणि आजही अनेकदा टीका केली जाते.हिंदू धर्मात महान तत्वज्ञान व नितीविचार आहे याविषयी ते अभिमानी होते.म्हणून तर ब्रिटिश शासनाने कांही समाजसुधारणा सुचवल्या तर त्याला ते विरोध करत.ख्रिस्ती मिशनऱ्यांनी केलेली टीकाही त्यांना आवडत नसे.प्रचंड लोकप्रिय व्यक्तिमत्व असूनही त्यांनी सामाजिक सुधारणांचा विषय कधी स्वतःहूनकाढला नाही.विज्ञान विषयांची आवड असूनही ते उलट परंपरागत धर्मविचाराला अनेकदा चिकटून बसले.राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापूर संस्थानात त्यांनी वेदोक्त प्रकरणात घेतलेली भूमिका , परदेशी जातांना व येतांना केलेल्या समुद्रप्रवासाबाबत घेतलेले प्रायश्चित्त,’पंचहौद मिशन ‘मध्ये ख्रिश्चन मंडळींसोबत चहा प्याला म्हणून घेतलेले प्रायश्चित्त,महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी आयोजित केलेल्या अस्पृश्यता निर्मूलन परिषदेत टिळकांनी मोठे भाषण केले पण ‘मी व्यक्तिगत जीवनात अस्पृश्यता पाळणार नाही ‘अशा प्रतिज्ञापत्रावर त्यांनी सही करायला नकार दिला.शिवाय या परिषदेतील आपले भाषण लंडन मधील वृत्तपत्रात येण्याची व्यवस्था केली पण आपल्या केसरीत त्यावर एक ओळही येणार नाही याची दक्षता घेतली.महात्मा जोतीराव फुले व टिळक मित्र होते.पुरोगामी चळवळीचे जनक महात्मा जोतिबा फुले यांनी टिळकांना एका खटल्यात जामीन मिळवून दिला होता तसेच त्यांचे सत्कारही घडवून आणले होते,पण महात्मा फुले कालवश झाल्यावर त्याविषयीची बातमीही केसरीत आलेली नव्हती.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘मूकनायक ‘वृत्तपत्राची जाहिरात छापण्यासही केसरीने नकार दिला होता अशी अनेक उदाहरणे टिळकांच्या कर्मठपणाची व समाजसुधारणेच्या चळवळीपासून फटकून वागण्याची साक्ष देणारी आहेत.फुले – आंबेडकरच नव्हे तर सुधारकाग्रणी गोपाळ गणेश आगरकर,न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे,लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख,नामदार गोपाळ कृष्ण गोखले आदीं अनेक समाजसुधारकानाही टिळकांनी विरोधच केला असे दिसते.
दुसरीकडे महाभारतासारख्या ग्रंथाचा आधुनिक ऐतिहासिक दृष्टिकोनातून अभ्यास केला पाहिजे,वेद हे अपौरुषेय नाहीत तर पौरुषेय म्हणजे मनुष्य निर्मित आहेत हेही त्यांनी ठामपणे सांगितले.बालविवाह,केशवपन याला त्यांनी विरोध केला.विधवा विवाहाचा पुरस्कार केला.विधुराने विधवेशीच लग्न करावे असे त्यांनी सांगितले.एका भाषणात तर ते,जर ईश्वराला अस्पृश्यता मान्य असेल तर मी तो ईश्वरच मानत नाही असेही म्हणाले होते.
भारतीय समाजविज्ञान कोशामध्ये लोकमान्यांबाबत सदाशिव आठवले म्हणतात,”… सामाजिक सुधारणांच्या बाबतीत आपण काही चूक करीत आहोत किंवा कर्तव्यात कमी पडत आहोत असे टिळकांना कधीच वाटले नाही.उलट सुधारकांचा उपहास करण्यात ,त्यांना नामोहरम करण्यात ते सहभागी होत व कधी कधी पुढाकारही घेत….आपल्यासाठी आपण स्वतःचे कायदे करू शकू अशी परिस्थिती निर्माण झाल्याखेरीज म्हणजेच स्वराज्य असल्याखेरीज समाजसुधारणा घडवून आणता येणार नाहीत अशी माझी खात्री असल्यामुळे मी आधी स्वराज्याचाच लढा लढणार अशी स्पष्ट भूमिका घेऊन ते कार्यरत होते.जे आपण करणार नाही असे टिळक स्पष्ट म्हणत ते त्यांनी का केले नाही असा प्रश्न उपस्थित करणे त्यांच्यावर अन्याय आहे…..असे असले तरी टिळकांची राष्ट्रीयत्वाची जी कल्पना होती ती मात्र हिंदू राष्ट्राची नव्हती.हिंदू आणि मुसलमान दोघांनाही धार्मिक स्वातंत्र्य मिळाले पाहिजे असे त्यांचे म्हणणे असे.मशिदीवरून जातांना हिंदुनी आपल्या देवतेच्या पालखीपुढे वाद्यांचा गजर केला तर त्याला हरकत घेण्याचा मुसलमानांना काही अधिकार नाही,त्याचप्रमाणे मुसलमान आपल्या वस्तीत गाय कापत असेल तर ती सोडवून आणण्याचा आडदांडपणा कुणा हिंदूनेही करता कामा नये असे त्यांनी स्पष्ट म्हटले आहे….हिंदू आणि मुसलमान या दोन जमाती आहेत पण दोन राष्ट्रे आहेत असे टिळकांनी कधीच मानले नाही .” टिळकांचे चिरंजीव श्रीधर हे डॉ.आंबेडकर यांचे अनुयायी होते.नंतर त्यांनी आत्महत्या केली.डॉ.आंबेडकर त्यांनाच लोकमान्य म्हणत असत.
आपल्या आवडीचे विषय बाजूला ठेवून भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात सहभाग घेत त्याचे नेतृत्व टिळकांनी केले.त्यासाठी तुरुंगवास,हालअपेष्ठा सोसल्या ,मोठा त्याग केला हे नाकारून चालणार नाही.लोकमान्यांच्या निधनानंतर भारतीय स्वातंत्र्य लढ्याची सूत्रे महात्मा गांधी यांच्या कडे आली.दोहोंच्या व्यक्तिमत्वात,विचारप्रक्रियेत मोठा फरक होता.पण गांधीजींनी व्यापक प्रमाणावर केलेल्या सत्याग्रहाच्या आंदोलनाला लोकमान्यांच्या चतुसूत्रीची मोठी मदत झाली हे नाकारता येत नाही.म्हणून भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाबाबत ‘ १८५७ ने रणशिंग फुंकले,टिळक युगाने हवा भरली आणि गांधी युगाने स्वातंत्र्य मिळवून दिले ‘असे म्हटले जाते. भारतीय वातंत्र्याच्या रणशिंगात हवा भरणाऱ्या अशा या थोर नेत्याला एकशे दुसऱ्या स्मृतिदीना निमित्ताने विनम्र अभिवादन.
(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीच्या वतीने गेली तेहतीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत.)