प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
( ९८ ५०८ ३० २९० )
Prasad.kulkarni65@gmail.com
आज सोमवार ता. १ ऑगस्ट २०२२ रोजी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा १०२ वा जन्मदिन .विलक्षण प्रतिभावंत असलेल्या अण्णा भाऊ साठे यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी झाला.वयाची पन्नाशी पूर्ण होण्यापूर्वीच १८ जुलै १९६९ रोजी ते कालवश झाले.पण आपल्या अल्प आयुष्यात त्यांनी फार मोठी स्तिमित करणारी कामगिरी केली.
अण्णा भाऊ हे एक कलंदर व्यक्तिमत्व होते.सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे एका कमालीच्या दरिद्री अशा मातंग समाजाच्या कुटुंबात जन्मले.गरिबीमुळे अण्णा भाऊंना शाळेचा उंबरठाही बघता आला नाही.पण वाट्याला आलेले जीवन समरसून जगण्याचा कैफ त्यांच्यात होता.बालपणापासूनच त्यांची फिरस्ती सुरू झाली.दररोज पंधरा वीस मैल फिरणे,सुरपारंब्या खेळणे,पोहणे,कबुतरे पाळणे,दांडपट्टा फिरवणे आदिंमध्ये ते वाकबगार होते.तसेच यात्रा,जत्रा करण्याचीही त्यांना आवड होती.पोवाडे,लावण्या,लोकगीते ते खड्या आवाजात म्हणत असत.अखेर आपल्या मावसभावाच्या तमाशात ते काम करू लागले.१९३६ साली तमाशासह ते रेठऱ्याला गेले होते.तेथे अण्णा भाऊंनी एका सभेत क्रांतिसिंह नाना पाटील यांचे भाषण ऐकले.त्या भाषणाने प्रभावित होऊन अवघ्या सोळा वर्षाच्या अण्णा भाऊंनी परिस्थितीची हाक ओळखून स्वातंत्र्य आंदोलनात स्वतःला झोकून दिले.
याच दरम्यान पोटाची आग विझवण्यासाठी अण्णा भाऊंचे वडील कुटुंबासह मुंबईला आले.अर्थात पायीच.मुंबईत त्यांना प्रथम तारेच्या कुंपणात डांबण्यात आले.पण तेथून सुटका करून घेऊन ते भायखळ्याला आले.तेथे वडील बागकाम करू लागले तर अण्णा भाऊही घरगडी,हॉटेलबॉय,हमाल,बूटपॉलिश,खाण कामगार,सिनेमाची पोस्टर्स चिकटविणे अशी पडेल ती कामे करू लागले.मुंबईत आल्यावर अण्णा भाऊ हळू हळू वाचायला शिकले.त्याचवेळी मुंबईच्या कामगार चळवळीत कॉ.श्रीपाद अमृत डांगे यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या कम्युनिस्ट चळवळीच्या आकर्षणाने अण्णा भाऊ कम्युनिस्ट बनले.बंद,मोर्चे,टाळेबंदी,संप,हरताळ आदित सक्रिय सहभागी होऊ लागले.महात्मा गांधी,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,जिना,सेनापती बापट अशा अनेक दिग्गजांची भाषणे अण्णा भाऊ मुंबईत ऐकत होते.चित्रपट पाहत होते.यासाऱ्यातून त्यांना लेखनाची प्रेरणाही मिळाली.स्टालिनग्राडचा पोवाडा,स्पेनचा पोवाडा याच दरम्यान त्यांनी लिहिला.
१९४२ च्या चलेजाव आंदोलनावेळी अण्णा भाऊ कम्युनिस्ट पक्षाचे पूर्णवेळ कार्यकर्ते होते.ते पक्षाच्या कार्यालयात असायचे.पण परिस्थितीच्या मागणीमुळे ते भूमिगत झाले.भूमिगत चळवळीत ब्रिटिशांविरोधी त्यांनी मोठी कामगिरी केली.१९४४ साली अण्णा भाऊंनी लालबावटा कलापथक काढले.याच काळात ते लेखनही करू लागले.लोकांच्या वेदना,संवेदना,मानवी मनोव्यापाराची विविध रूपे त्यांच्या लेखणीतून बाहेर पडू लागली.अण्णा भाऊ कथा,कादंबरी,नाटक,लोकनाट्य,लेख,कविता,प्रवासवर्णने आदी माध्यमातून प्रकट होऊ लागले.त्यांना लोकमान्यता मिळू लागली.त्यांच्या पुस्तकांच्या आवृत्यांवर आवृत्या निघू लागल्या.त्यांच्या कादंबऱ्यांवर चित्रपट येऊ लागले.अण्णा चित्रपट दिग्दर्शक बनले . फकिरा मध्ये त्यांनी सावळानानाची भूमिका केली.राजकपूर पासून बलराज सहानी पर्यंत अनेकांशी त्यांचे मैत्र जाळले.अर्थात अण्णा भाऊ ‘स्टार ‘झाले.
डॉ.आंबेडकरांच्या कार्य कर्तृत्वाचा मोठा परिणाम अण्णा भाऊंवर पडला. ‘ जग बदल घालुनी घाव,सांगुनी गेले मला भीमराव ‘ हे त्यांचे गीत प्रचंड गाजले.संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अण्णा भाऊंनी शाहीर अमरशेख आणि शाहीर गव्हाणकर यांच्या साथीने रान पेटविले.१९५८ साली मुंबईत झालेल्या महाराष्ट्र दलित संमेलनाचे उद्घाटक अण्णा भाऊ होते.१९६१ साली रशियाच्या इंडो सोविएत कल्चरल सोसायटीच्या निमंत्रणावरून अण्णा भाऊ रशियाला गेले.तेथे अनेक शहरांना त्यांनी भेटी दिल्या.त्यावर प्रवासवर्णनही लिहिले.
अण्णा भाऊंनी ‘वाट्टेल ते लिहितो ‘ या नावाचे एक सदर साप्ताहिक युगांतर मध्ये लिहिले होते.त्यातील एका लेखात ते म्हणतात ,” मी हवं ते लिहितो याचा अर्थ मला जे सत्य वाटतं,जे माझ्या ध्येयाशी जुळतं ते लिहितो.दुसरं मी लिहुच शकत नाही.कारण माझं ध्येय निश्चित झालं आहे.मी आणि माझा पिंड मुंबईच्या झुंझार कामगार वर्गाने घडवला आहे.मी माझ्या वर्गाशी,ध्येयाशी जे जुळेल तेच लिहिणार हे क्रमप्राप्त आहे.जनतेच्या विराट आंदोलनात शिरून तिचा सर्वव्यापी संघर्ष मी अगदी जवळून पाहिला आहे.कामगारवर्गाच्या खांद्याला खांदा लावून लढण्याचे ,एका फळीत उभे राहण्याचे थोर भाग्य मला लाभलं आहे.याबद्दल मी स्वतःला धन्य समजतोआणि हवं ते लिहितो.लिहिणं हा माझा धर्म आहे आणि आता ते कर्मही झाले आहे.” लेखनविषयक अशी स्पष्ट भूमिका अण्णा भाऊ मांडतात.
आभाळाच्या उंचीच्या अण्णा भाऊंचे अखेरचे दिवस मात्र फार हलाखीत गेले.त्यांना महाराष्ट्र शासनाने दिलेले घरही विकावे लागले. पण अण्णा भाऊंनी संघर्षातून वाटचालीचा दिलेला संदेश आणि विषमता पसरवणाऱ्या भांडवलशाहीला विरोध आजच्या अस्वस्थ वर्तमानात फार महत्त्वाचा आहे. फकिरा,वारणेचा वाघ,वैजयंता,आवडी,माकडीचा माळ यासारख्या ३५ कादंबऱ्या, बरबाद्या कंजारी,चिरानगरची भूतं,गजाआड,कृष्णाकाठच्या कथा यासारखे तेरा कथासंग्रह,पेंग्याचं लगीन,इनामदार,सुलतान ही नाटके, अकलेची गोष्ट,कलंत्री,पुढारी मिळाला,लोकमंत्र्याचा दौरा यासारखी चौदा लोकनाट्ये,एक प्रवासवर्णन,पोवाडे – लावण्या – गीते अशी मोठी काव्यनिर्मिती त्यांनी केली.तसेच युगांतर,लोकयुग,लोकयुद्ध,युद्धानेतृत्व अशा काही नियतकालिकात प्रासंगिक लेखही लिहिले. अण्णा भाऊ आत्मचरित्रही लिहिणार होते.त्याचे नावही ‘मृत्यूकडून जीवनाकडे ‘असे त्यांनी नक्की केले होते.पण ते लिहिन्यापूर्वीच ते कालवश झाले.
अण्णा भाऊंच्या कथांबद्द्ल आचार्य अत्रे म्हणतात,”या जगण्यासाठी लढणाऱ्या माणसांच्या कथा आहेत.आपल्या कथांमध्ये त्यांनी निराळी माणसे रंगवली आहेत.पण सर्वांच्या रक्तातुन एकच लढाऊ ईर्षा वाहत आहे.त्या सर्वांना मानाने जगायचे आहे.अंगात असेल नसेल तेवढे बळ एकवटून त्यांना आक्रमक वृतींशी सामना द्यायचा आहे आणि त्यांत त्यांना जिंकायचेही आहे…..अण्णा भाऊंच्या कथांमध्ये नाट्य आहे.जीवनाचे वास्तव नाटक त्यांच्या कथेत अगदी संघर्षाच्या वातावरणात खेळते आहे.त्यांतले संवाद बोलके आणि झणझणीत वाटतात.क्रोध ,असूया,सूड,हिम्मत इत्यादी प्रखर भावनांचे लखलखते पाणी त्यांच्या संवादांना आगळीच घाट आणते.त्यांच्या कथेतील माणसे ढोंग जाणत नाहीत.ती आपल्या भावना रोखठोकपणे बोलून दाखवतात.जे कृतीने करायचे आहे त्याचाच उच्चार त्यांच्या बोलण्यातून होत असतो.”
अण्णा भाऊंनी शाहीर अमर शेख यांच्याबरोबर मोठे जनजागरण केले होते.आपल्या या मित्राचे वैशिष्ट्य सांगताना शाहीर अमर शेख म्हणतात ,” पोवाड्यातून नुसती वर्णन करन वडवडिलांनी केलेल्या कहाण्या पद्यरूप ऐकवणे हे शाहिराचे काम नाही तर,शाहिरान जनमन:सागरात सर्वभर संचारून नव्हे तर त्याच्या तळाचा ठाव घेऊन ,त्यात चाललेल्या भावनोद्रेकांचा आविष्कार आपल्या लेखणीच्या लालित्यपूर्ण ढंगाने व्यक्त करून अथवा जनमानस हेलाऊनच नव्हे तर त्या सागराच्या कानाकणाला ऊब देऊन त्याच्या लाटांवर आरूढ होऊन गगनालाही गवसणी घालावी तो मोठा शाहीर. ही उक्ती सार्थ करणारे अण्णा भाऊ हे एकमेव शाहीर होते.”
अण्णा भाऊंच्या विचारधारेबाबत शाहीर अमर शेख म्हणतात ,”अण्णा भाऊंच्या मानवतावादाला समाजवादाची शास्त्रशुद्ध धार होती.म्हणूनच जन्माला येताच डोळे किलकिले करून जगाकडे बघताच ,स्पेनमधील फ्रॅंकोच्या फॅसिझमविरोधी स्पॅनिश जनतेचा लढा,हा मानवी न्याय्य हक्कासाठी सनातन गुलामगिरीच्या विरुद्ध चाललेला लढा असा त्या काळच्या नवतरुण अण्णा भाऊ नामे कामगाराला वाटला व त्याने ‘स्पेनच्या स्वातंत्र्यलढ्याचा पोवाडा ‘लिहिला.अण्णा भाऊ हे हाडाचे कम्युनिस्ट.अन कम्युनिस्ट कवी म्हटला की ,त्याची कला सर्वथैव प्रचारकी,त्यात खरे काव्य नसलेली असा शिक्का त्या काव्याच वाचन,परिशीलन न करताही दिला जातो.पण उत्तम कला प्रचारकी असतेच नी उत्तम प्रचार हा कालात्मकच असतो हे सत्य आहे.”
अण्णा भाऊंवर ‘पीएचडी ‘करणारे आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाचे सखोल अभ्यासक प्रा.डॉ.बाबुराव गुरव यांनी अण्णा भाऊंच्यावर विविध अंगांनी लिहिलेले आहे.त्यांच्या साहित्याबाबत डॉ.बाबुराव गुरव म्हणतात ,” अण्णा भाऊंनी आपल्या साहित्य लेखनातून मराठी मातीचे उर उन्नत व्हावे अशा स्वरूपाचे मानवतेच्या महामंत्राचे उद्घोष केले.मराठी साहित्याला आजवर अपरिचित असलेले विषय ,आशय,मांडणी,शैली आणि संघर्षाचे मराठी साहित्याच्या प्रांतात प्रथमच मळे फुलवले.संघर्षाला रसाचे स्वरूप प्राप्त करून देऊन साहित्यातील त्यांच्या धगधगत्या रूपाचे उग्र,मंगल,दाहक दर्शन घडविले.मराठी साहित्यात आशावादाची ,चैतन्याची,परिवर्तनशील महत्वाकांक्षेची नव्याने पेरणी केली.गावकुसाबाहेरील डोंगरदऱ्यातील रणभेदी मराठी माणूस त्यांनी प्रथमच मराठी साहित्यात रेखाटला. “
समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक सदस्य व ज्येष्ठ विचारवंत नेते शहीद कॉ.गोविंद पानसरे यांनी अण्णा भाऊंचे समग्र साहित्य अल्पदरात उपलब्ध करून देण्यात आणि अण्णा भाऊंच्या नावाने दरवर्षी साहित्य संमेलन सुरू करण्यात मोठा पुढाकार घेतला होता.शहीद कॉ.गोविंद पानसरे म्हणतात,”वर्गीय विषमता आणि वर्णजातीय विषमतेविरुद्ध बंडाची हाक देणारे अण्णा भाऊ आमचे थोर साथीदार,सच्चे कम्युनिस्ट होते.गाणी लिहीत होते.गात होते.संघर्ष करीत होते.आणि आमच्याबरोबर तुरुंगाच्या वाऱ्याही करत होते.नुसतेच लिहीत व गात नव्हते .स्वतः लढत होते आणि इतरांना लढायची प्रेरणा देत होते….ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नसून दलितांच्या तळहातावर तरलेली हे त्यांच्या समग्र लेखनाचे अंत:सूत्र होते…अण्णा भाऊ मार्क्सवादी होते व त्यांचे इतिहासाचे सामाजिक आकलन मार्क्सवादी होते.याचबरोबर त्यांनी भारतीय समाजातील जातीचा प्रश्न लक्षात घेतलेला होता. भारतीय क्रांतीत जात्यंताचा प्रश्न महत्वाचा आहे.जातीव्यवस्था ,वर्णव्यवस्था व वर्गव्यवस्था याविरुद्धचे लढे समग्र दृष्टीकोनातून लढवले पाहिजेत.ते वेगवेगळे लढवले तर ते परिणामकारक होत नाहीत याची त्यांना जाण होती.आज भांडवलशाही व साम्राज्यशाही यांच्याविरुद्धचे संघर्ष जगभर तीव्र असताना अण्णा भाऊंच्या साहित्याचे वाचन आपल्या समाजाची व समाजातील अंतरविरोधाची नीट ओळख करून देण्यासाठी आवश्यक आहे.” तर अशा या अण्णा भाऊंचे साहित्य म्हणजे समाजातील शेवटच्या माणसाच्या शृंखला तोडण्याचा घाव आहे.थोर प्रतिभावंत आणि झंझावात असलेल्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना त्यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन.
(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीच्या वतीने गेली तेहतीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ”प्रबोधन प्रकाशन ज्योती “मासिकाचे ‘संपादक ‘आहेत.)