प्रभारी अधिकारी तथा प्रशासक सुधाकर देशमुख यांची माहिती
प्रेस मीडिया लाईव्ह :
वस्ञनगरीला भूषणावह असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा सभोवती पहिल्या टप्प्यात शिवतीर्थ साकारण्यात आले आहे. आता शिवतीर्थ परिसराच्या चारही बाजूला विस्तारी करणाचा दुसरा टप्पा साकारण्यासाठी लवकरच कामाची सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे प्रभारी अधिकारी तथा प्रशासक सुधाकर देशमुख यांनी आज मंगळवारी आयोजित केलेल्या अधिका-यांच्या बैठकीत बोलताना दिली.यावेळी महापालिकेचे उपायुक्त डॉ.प्रदीप ठेंगल ,शहर वाहतूक नियंत्रण कक्षाचे प्रमुख विकास अडसूळ ,इचलकरंजी एस.टी, आगार व्यवस्थापक संतोष बोगरे ,शिवतीर्थ समितीचे अध्यक्ष पुंडलिक जाधव यांच्यासह समिती सदस्य ,अधिका-यांची प्रमुख उपस्थिती होती.
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे पिढ्यान पिढ्या आपल्या देशातील प्रत्येकासाठी प्रेरणास्त्रोत्र आहेत.त्यामुळे त्यांच्या कार्याची ज्योत कायमस्वरुपी प्रत्येकाच्या मनामनात तेवत राहण्यासाठी पूर्वीच्या नगरपालिकेच्या माध्यमातून वस्ञनगरीला भूषणावह असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या सभोवती पहिल्या टप्प्यात भव्य दिव्य असे शिवतीर्थ साकारण्यात आले आहे.आता शिवतीर्थ परिसराच्या चारही बाजूला शिवतीर्थ विस्तारीकरणाचा दुसरा टप्पा साकारण्याच्या दृष्टीने कामाला सुरुवात करण्यात संदर्भात विचार विनिमय करुन निर्णय घेण्यासाठी महापालिकेचे प्रभारी अधिकारी तथा प्रशासक सुधाकर देशमुख यांनी आज मंगळवारी महापालिकेत बैठकीचे आयोजन केले होते.
या बैठकीत इचलकरंजी एस.टी, आगार व्यवस्थापक संतोष वोगरे,वाहतूक शाखा पोलिस निरिक्षक विकास अडसूळ, शिवतीर्थ समितीचे अध्यक्ष पुंडलिक जाधव, महानगरपालिकेच्या संबंधित विभागाचे अधिकारी आणि शिवतीर्थ पहिला टप्प्यातील कामाचे मक्तेदार यांच्या समवेत दुसऱ्या टप्प्याच्या कामाच्या नियोजनाची सविस्तर चर्चा करण्यात आली.
यामध्ये प्रामुख्याने शिवतीर्थ परिसरातील राजाराम स्टेडियम बाजूकडील सद्यस्थितीत असलेले वाहतूक नियंत्रण शाखेचे कार्यालय अन्य ठिकाणी स्थलांतर करण्यासाठी महानगरपालिकेच्या विविध ठिकाणच्या जागांची पोलिस प्रशासन आणि संबंधित महानगरपालिका अधिका-यांनी संयुक्तरित्या पाहणी करण्याची सूचना करण्यात आली.
शिवतीर्थ परिसरातील एस.टी. महामंडळाच्या ताब्यात असलेल्या जागे संदर्भात शासन स्तरावरून सदर जागा उपलब्ध करून घेण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात आला.
तसेच सद्यस्थितीत सदर परिसरातील हॉटेल आणि दुकाने असलेली खाजगी जागा संबंधित जागा मालकांसमवेत खाजगी वाटाघाटीने ताब्यात घेण्याच्या अनुषंगाने संबंधितांशी बैठक घेण्याचे नियोजन ठरले.याशिवाय सविस्तर चर्चेअंती श्री शिवतीर्थ दुसऱ्या टप्प्या साकारण्याच्या कामाची सुरुवात लवकरात लवकर करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीस शहर अभियंता संजय बागडे,नगररचनाकार रणजित कोरे, सहा.आयुक्त सी.झोन राधिका हावळ, मिळकत पर्यवेक्षक सचिन पाटील, अतिक्रमण विभाग प्रमुख एम.एस. चाबुकस्वार तसेच श्री शिवतीर्थ समितीचे सदस्य व अन्य अधिकारी उपस्थित होते.