ठगाने महिलेच्या बँक खात्याची माहिती घेऊन खात्यातून सवादोन लाख रुपये काढले
या प्रकरणी मालवणी पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.
प्रेस मीडिया लाईव्ह :
ऑनलाइन ऑर्डर केलेल्या कपडय़ाची डिलिव्हरी आली नाही म्हणून चौकशी करणे महिलेला महागात पडले आहे. ठगाने महिलेच्या बँक खात्याची माहिती घेऊन खात्यातून सवादोन लाख रुपये काढले आहेत या प्रकरणी मालवणी पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.
मालवणी येथे राहणाऱया महिलेने दहा दिवसांपूर्वी दिल्लीतील एका कुरिअर कंपनीतून कपडय़ांची ऑर्डर केली होती. ठरलेल्या वेळेत कपडे न आल्याने महिलेने गुगलवर कंपनीच्या कस्टमर केअरला फोन करण्यासाठी नंबर सर्च केला. तिला तेथे दोन नंबर दिसले. एका नंबरवर महिलेने फोन करून कपडय़ाच्या डिलिव्हरीबाबत विचारणा केली. ठगाने तक्रार नोंद केली असून ऑनलाइन पाच रुपये पाठवण्यास सांगितले. त्यावर विश्वास ठेवून महिलेने पाच रुपये पाठवले. त्यानंतर ठगाने पुन्हा महिलेला लिंक पाठवून पुन्हा पाच रुपये पाठवण्यास सांगितले. महिलेला बोलण्यात गुंतवून बँक खात्याची माहिती घेऊन खात्यातून सवादोन लाख रुपये काढले. पैसे गेल्याचे लक्षात आल्यावर महिलेने मालवणी पोलीस ठाण्यात धाव घेतली. महिलेच्या तक्रारीवरून मालवणी पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे