आपत्ती व्यवस्थापनात संपर्कसातत्य, अचूकता, समन्वय ठेवून कामे करा - प्रधान सचिव आय.ए.कुंदन
प्रेस मीडिया लाईव्ह :
अमरावती : आपत्ती व्यवस्थापनात संपर्कसातत्य व अचूकता राखणे महत्वाचे असते. त्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा साधनांचा वापर करावा. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिकाधिक अद्ययावत व सज्ज ठेवावी, असे निर्देश महिला व बाल विकास विभागाच्या प्रधान सचिव तथा अमरावतीच्या पालक सचिव आय.ए. कुंदन यांनी आज येथे केले.
प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन तसेच मान्सून काळातील उपाययोजनांबाबत बैठक महसूलभवनात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. प्र. विभागीय आयुक्त तथा जिल्हाधिकारी पवनीत कौर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा, पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ, महापालिकेचे आयुक्त प्रवीण आष्टीकर, प्र. निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रेवती साबळे यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.
पालक सचिवांनी यावेळी मेळघाट परिसरातील पाचडोंगरी आणि कोयलारी येथील दूषित पाणी बाधा प्रकरणी केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. मृतांच्या कुटुंबियांना शासनाकडून पाच लक्ष रू. मदत देण्यात आली आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एन.डी.आर.एफ.) अंतर्गत सहाय्य निधी उपलब्ध करुन देण्यासाठीही प्रयत्न करावा. उपचार सुरू असलेल्या बाधितांना आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सुविधा पुरविण्यात याव्यात. आरोग्य व स्थानिक यंत्रणेशी सातत्याने संपर्क ठेवावा, असे निर्देश त्यांनी दिले.
आपत्ती व्यवस्थापनात गती व नियोजनात अचूकता महत्त्वाची आहे. एखादी चूक झाल्यास त्यामुळे अडचणी वाढू शकतात. हे टाळण्यासाठी अचूक नियोजन व टीमवर्क आवश्यक आहे. त्यासाठी यंत्रणा अद्ययावत असावी. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व्हावा. जिल्हा नियंत्रण कक्षाने सर्वदूर संपर्कसातत्य राखावे. नियंत्रण कक्षात स्क्रिन डिस्प्ले असावा जेणेकरुन आपत्ती निवारणाचे नियोजन करताना मदत होईल. आपत्ती व्यवस्थापन कक्षासाठी आवश्यक साधनसामुग्री घेताना दीर्घकालीन नियोजन करावे. एकही बाधित व्यक्ती मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी मदतकार्य जलदगतीने व्हावे. त्यासाठी आवश्यक सर्व साधनांची सुसज्जता ठेवा. हवामानाचा अंदाज दुर्लक्षित करु नका, अशा सूचना पालक सचिवांनी यावेळी केल्या.
मेळघाटात वैद्यकीय अधिकाऱ्यांची संख्या कमी असल्याने कंत्राटी तत्त्वावर नेमणूका करण्याबाबतही चर्चा झाली.पावसाळ्यात साथरोग वेगाने पसरतात. त्यामुळे अंगणवाडी सेविका, तसेच आशा सेविकांमार्फत गावांत स्वच्छतेबाबत जनजागृती करावी. सरपंच, तसेच ग्रामपंचायत सदस्य यांनीही सतर्कता बाळगण्याविषयी ग्रामस्थांना आवाहन करावे. त्यासाठी त्यांनी दर आठवड्याला बैठक घ्यावी. ग्रामीण भागात रुग्णावर अंधश्रध्दा बाळगून चुकीचे उपचार होत नाही ना, याबाबत सरपंच, ग्रामसेवक, वैद्यक यंत्रणा यांनी जातीने लक्ष द्यावे. साथरोगाची संभाव्यता लक्षात घेता प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, ग्रामीण रूग्णालये याठिकाणी औषधांचा मुबलक प्रमाणात साठा ठेवावा, असे आदेश श्रीमती कुंदन यांनी दिले.
कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक त्रिसूत्री पालनाबाबत जागृती, तसेच लसीकरणाचा वेग वाढविण्याचे निर्देश त्यांनी दिले. खरीप पीके, पशुधन, पावसामुळे झालेले नुकसान आदींबाबतही त्यांनी आढावा घेतला.
Collector Office Amravati -जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती