आंदोलनात कार्यकर्ते, त्रस्त नागरिक प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुण्यातील पाणीटंचाई कृत्रिमरीत्या वाढवून तिचे रूपांतर पाणीबाणीमध्ये केलेले आहे. पुणे मनपा प्रशासनाला पाणीचोरीला पायबंद घालण्यात अपयश आले आहे. टँकर लॉबीला प्रस्थापित नगरसेवकांचे आणि भ्रष्ट प्रशासकीय अधिकाऱ्यांचे संरक्षण असून या पाणीबाणी विरोधात आज सोमवारी दिनांक २० जून रोजी सकाळी ११ वाजता आम आदमी पक्षातर्फे हंडा मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या आंदोलनात कार्यकर्ते, त्रस्त नागरिक प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
पुणे महानगरपालिके मध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या 23 गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई आहेच. त्याशिवाय पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील परिघावरील भागांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाई जाणवत आहे. याबाबत वारंवार पुणे महानगरपालिकेला निवेदने देऊन सुद्धा परिस्थितीमध्ये कोणताच फरक न पडल्याने आज या हंडा मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते असे मनोगत
आप पुणे शहर जल हक्क आंदोलन समितीचे आबासाहेब कांबळे (8390906656) यांनी मांडले.
पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील अनेक परिसरांमध्ये मनपाद्वारे पाणी पोहोचत नाही आणि त्याच्यामुळे नाइलाजास्तव शेकडो सोसायट्यांना दरमहा लाखो रुपयांचा भुर्दंड सहन करून पाणी विकत घ्यावं लागतं. पाणीपट्टी भरणाऱ्या नागरिकांना टँकरचे पैसे सुद्धा द्यावे लागतात हा दुहेरी कर नागरिकांवर अन्याय कारक आहे. पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये ४०% पाण्याची गळती होत आहे. मोठ्या प्रमाणावर पाणी चोरी देखील होत आहे. टॅंकर लॉबीचे शहरावर वर्चस्व असून त्यांना नगरसेवक आणि भ्रष्ट प्रशासकीय अधिकाऱ्यांचे संरक्षण लाभलेले आहे आणि त्याचा भुर्दंड पुणेकरांना सहन करावा लागत आहे, असे मत आप पुणे जल हक्क आंदोलन समितीचे सुदर्शन जगदाळे (9527911911) यांनी केले आहे.
पुणे मनपातर्फे अनेक बिल्डिंगना बेकायदेशीरित्या पाणी प्रतिज्ञापत्र घेऊन बांधकामाला परवानगी दिली जाते. नंतर बिल्डर पाणीपुरवठा करत नाही. मनपा देखील पाणीपुरवठा करत नाही आणि नागरिक पाण्याअभावी वाऱ्यावर सोडले जातात. हा बेकायेशीर प्रकार थांबला पाहिजे असे मत विद्यानंद नायक यांनी मांडले.
यावेळी सुदर्शन जगदाळे, आबासाहेब कांबळे, अमोल काळे, निलेश वांजळे, विद्यानंद नायक, अन्वर बाबा शेख, उमेश बागडे, फेबियन आण्णा सॅमसन, यशवंत बनसोडे, आरती करंजावणे, ज्योती ताकवले, सुनंदा जाधव, वैशाली डोंगरे, सीमा गुट्टे, सचिन कोतवाल, शहर संघटक एकनाथ ढोले यांच्यासह अनेक कार्यकर्ते, नागरिक सहभागी झाले होते.
टँकर लॉबीच्या दबावाखाली पुणे शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण केली गेली असून त्यामूळे टँकर लॉबीचे उखळ पांढरे झाले आहे. या टँकर लॉबीला प्रस्थापित नगरसेवक आणि प्रशासनाचे संरक्षण आहे. पुण्यातील विशेषत: बाणेर, बालेवाडी, हडपसर, फुरसुंगी, काळे पडळ, साडे सतरा नळी, मोहम्मदवाडी, खडी मशीन चौक, उंद्री, पिसोली, वडकी नाला, येवलेवाडी, कोंढवा बू. वानवडी, कात्रज, आंबेगाव पठार,आंबेगाव बू. , नऱ्हे, वडगाव बू. सिंहगड रोड, धायरी, नांदेड फाटा, किरकटवाडी, कोल्हेवाडी, खडकवासला, वारजे_ माळवाडी गणपती माथा, कोंढावे- धावडे, NDA गेट, बावधान, ससरोड, सुसगाव, बाणेर, बालेवाडी, म्हाळुंगे, दापोडी, बोपोडी, मुळा रोड, विश्रांतवाडी, कळस, धानोरी, लोहगाव, विमान नगर, खराडी, चंदन नगर बायपास, मांजरी, वाघोली या भागांमध्ये तीव्र पाणटंचाई निर्माण केली गेल्याने या परिसरातील हजारो गृह सोसायट्यांना पिण्यासाठी पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्यासाठी अक्षरशः लाखो रुपये प्रत्येक महिन्याला एका सोसायटीला मोजावे लागत आहे. महागाईच्या जमान्यात तुटपुंज्या पैशात घर चालवणारे वस्तीत राहणाऱ्या लोकांना सुद्धा पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.
माननीय उच्च न्यायालयाने आदेश देऊन सुद्धा पुणे मनपाने शहराच्या परीघावरील नवीन समाविष्ट गावांना आणि पूणे मनपा हद्दीतील जुन्या भागांना पुरेसा पाणी पुरवठा केलेला नाही. नको त्या योजनांवर, भ्रष्ट कंत्राटावर, फुटकळ खरेदीवर, वायफळ बांधकामांवर कोट्यावधी रुपये खर्च करणारी पुणे मनपा नागरिकांना पाणी देण्यासाठी मात्र हात वर करत आहे.
मनपाला तिच्या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी डॉ अभिजीत मोरे, आबासाहेब कांबळे, विद्यानंद नायक, सीमा गुट्टे, ज्योती ताकवले यांच्या शिष्ट मंडळाने आयुक्त विक्रम कुमार आणि पाणीपुरवठा विभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांच्या सोबत चर्चा केली. यावेळी पाणी टंचाई बाधित सोसायट्यांची यादी आम आदमी पक्षाने दिली. संबंधित सोसायट्यांना पाणीपुरवठा केला जाईल असे आश्वासन यावेळी आयुक्तांनी दिले. तसेच टँकर पुरवठा वाढविण्याबाबत उद्याच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल असे आश्वासन अनिरुद्ध पावसकर यांनी दिले. तसेच आपच्या शिष्टमंडळासोबत पुढील आठवड्यात आढावा बैठक आयोजित करण्याचे पावसकर यांनी मान्य केले. यावेळी पाणी प्रतिज्ञा पत्र लिहून घेण्याचा भोंगळपणा बंद करण्याची मागणी आम आदमी पक्षातर्फे करण्यात आली.