माथेरान शिवसेनेचे संपर्क प्रमुख प्रसाद सावंत यांच्यावर हल्ला; गाडीचे प्रचंड नुकसान

मारहाणीत जखमी झालेले प्रसाद सावंत यांना कलंबोळी येथील एमजीएम रुग्णालयात हलविण्यात आले आहे.


प्रेस मीडिया लाईव्ह

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील

शिवसेना पक्षमधील फुटीनंतर त्या वादाचा परिणाम कर्जत विधानसभा मतदारसंघात देखील दिसून आला.बंडखोरीला सुरुवात झाल्यापासून आपण शिवसेना पक्षप्रमुख यांच्यासोबत अशी टिप्पणी करणारे माथेरान शिवसेनेचे शहर संपर्क प्रमुख प्रसाद सावंत यांच्या गाडीवर आणि नंतर त्यांच्यावर १५ जणांच्या जमावाने हल्ला केला.

दरम्यान, या हल्ल्यात प्रसाद सावंत यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले असून त्यावेळी झालेल्या मारहाणीत जखमी झालेले प्रसाद सावंत यांना कलंबोळी येथील एमजीएम रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

माथेरान मध्ये २४ जूनच्या रात्री झालेल्या भांडणाबद्दल कर्जत पोलीस उपअधीक्षक विजय लगारे यांनी त्यासर्वांना कर्जत येथील कार्यालयात बोलावून घेतले होते. त्यावेळी शिवसेनेमधील दोन्ही गट हजर होते आणि त्यावेळी त्या ठिकाणी बैठक उरकून प्रसाद सावंत हे त्यांच्या पत्नी माथेरान नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांना आणण्यासाठी मुंबईला जाण्यासाठी निघाले होते.

कर्जत उपाधिक्षक कार्यालयातून निघालेली त्यांची इनोव्हा क्रेस्टा ही गाडी कर्जत शहरातून बाहेर पडत असताना मुद्रे नानामास्तर नगरच्या समोरील रस्त्यावर स्वागत कमानीचे काम सुरू असल्याने त्या रस्त्यावर एकेरी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे एकेरी रस्ता सुरू होण्याचे ठिकाणी सावंत यांची एम एच ४६ ए झेड ४५०० ही गाडी आली असता समोरून एक इनोवा गाडी आडवी आली आणि त्या गाडीमधून तरुण लाठी काठ्या घेवून खाली उतरले. त्या ठिकाणी तोंडावर मास्क लावलेल्या १५ हून अधिक तरुणांच्या जमावाने प्रसाद सावंत यांच्या गाडीवर आणि त्यांच्यावर हल्ला केला. त्यावेळी प्रसाद सावंत यांना प्रचंड मारहाण केल्यानंतर समोरून पोलिसांची गाडी येत असल्याचे पाहून ते सर्व तरुण तेथून पळून गेले. त्यावेळी त्या तरुणांपैकी काहींनी तू जास्त बोलतो, जास्त पोस्ट पाठवतो असे सांगून कसा विरोधात काम करतो तेच बघतो असे सांगून मारहाण केली.

घटना घडल्यानंतर मोठ्या संख्येने शिवसैनिक कर्जत उपजिल्हा रुग्णालयात जमले. तेथे प्रसाद सावंत यांच्यावर प्राथमिक उपचार करून नवी मुंबई मधील महात्मा गांधी रुग्णालयात त्यांना हलविले आहे. प्रसाद सावंत यांच्यावर हल्ला झाला त्यावेळी त्यांचे भाचे श्रेयस गायकवाड आणि चालक शिवाजी हे सोबत होते. पोलिसांनी सावंत यांचे वाहन कर्जत पोलीस ठाणे येथे आणून लावले असून त्यांना नवी मुंबईत उपचार करण्यासाठी नेले जात असताना कर्जतचे पोलीस उपाधिक्षक यांनी दोन पोलिसांचा बंदोबस्त दिला आहे

Post a Comment

Previous Post Next Post