दुचाकी वाहनांसाठी लवकरच नवीन मालिका

 आकर्षक नोंदणी क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन 

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे दि.१६: दुचाकी वाहनांसाठी सुरु होणाऱ्या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक तीनपट शुल्क भरुन चारचाकी वाहनांसाठी राखून ठेवण्याकरिता तसेच उर्वरित क्रमांक दुचाकींसाठी राखून ठेवण्याकरिता आगाऊ अर्ज करण्याचे आवाहन पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे. 

प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे लवकरच दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. हवा असणारा आकर्षक नोंदणी क्रमांक उपलब्ध असल्यास नागरिकांना तो विहित शुल्क भरुन सुलभतेने मिळावा यासाठी विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे. चारचाकी वाहनासाठी दुचाकी मालिकेतील आकर्षक क्रमांक हवा असल्यास अर्ज २० जून २०२२ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २.३० वा. खासगी वाहन शाखेत जमा करावा. अर्जासोबत धनाकर्ष (डीडी), पत्त्याचा पुरावा, ओळखपत्र, पॅनकार्डची साक्षांकित प्रत जोडावी. डीडी 'आर.टी.ओ., पुणे' या नावाने राष्ट्रीयकृत किंवा अनुसूचित बँकेचा पुणे येथील असावा. 

एकाच आकर्षक क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी २१ जून रोजी सकाळी १०.३० वा. कार्यालयीन नोटिसफलकावर लावण्यात येईल. त्या अर्जांसाठी त्याच दिवशी दु. ४.३० वा. सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, नवीन वाहन नोंदणी विभाग यांच्या दालनात लिलाव करण्यात येईल. 

दुचाकी वाहनांना आकर्षक तसेच पसंतीचा क्रमांक हवा असल्यास अर्ज, डीडी आणि अन्य कागदपत्रे २१ जून रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २.३० वा. खासगी वाहन शाखेत जमा करावेत. एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी २३ जून रोजी सकाळी १०.३० वा. कार्यालयीन नोटिसफलकावर लावण्यात येईल. त्या अर्जांसाठी त्याच दिवशी दु. ४.३० वा. सहकार सभागृहामध्ये लिलाव करण्यात येईल. 

एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर केले नाही तर राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व शुल्क शासनाच्या तिजोरीत जमा होईल. कोणताही विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत करण्यात येणार नाही.


Post a Comment

Previous Post Next Post