पेट्रोल पंपावर मिळणारी पावती पूर्णपणे पारदर्शकरित्या मिळावी हा जनतेचा अधिकार आहे.
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : सध्या सर्वत्र ग्राहकांना आपल्या खरेदीची किंवा घेतलेल्या सेवेची पावती देताना त्यावर कर, अधिभार यांचा उल्लेख असतो. पेट्रोल,डिझेल किंवा सीएनजी भरल्यानंतर मिळणा-या पावत्या मात्र त्याला अपवाद आहेत. त्यावर केंद्र सरकारचा कर, राज्य सरकारचा कर, अधिभार, पंप चालकाचे कमिशन याचा कोणताही उल्लेख नसतो. यासंदर्भात पंप चालकांकडे चौकशी केली असता त्यांच्याकडूनही समाधानकारक उत्तर मिळत नाही. त्यामूळे *पेट्रोल, डिझेल, सीएनजी पंपावर मिळणारी पावती ही इंधनाची मूळ किंमत, स्थानिक व इतर कर, केंद्र व राज्य सरकारचे कर, अधिभार, पंप चालकाचे कमिशन यांच्या नोंदीसह मिळावी अशी मागणी आम आदमी पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
पेट्रोल, डिझेल ,सीएनजी ही इंधने आणि त्यांचे दर प्रत्यक्ष – अप्रत्यक्षपणे सर्वच उत्पादनांच्या किमतींवर परिणाम करतात. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती ही यामुळे प्रभावित होतात. सततच्या अभूतपूर्व इंधन दरवाढीमुळे महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. हे इंधन व त्यावरील कर, अधिभार हे सरकारच्या उत्पन्नाच्या प्रमुख स्त्रोतापैकी एक आहे. पेट्रोल, डिझेल, सीएनजी पंपावर मिळणारी पावती मध्ये फक्त माप आणि त्याचा दर याचाच उल्लेख असतो. त्या पावतीवर इंधनावर कोण कोणते कर किंवा अधिभार लावले आहेत याची नोंद नसते. पेट्रोल, डिझेल, सीएनजी पंपाव्यतिरिक्त इतर ठिकाणी वस्तूची मूळ किंमत त्यावर आकारण्यात आलेली जीएस टी , सेवा कर आदीची नोंद असते. अशाच प्रकारे पेट्रोल पंपावर ही सर्व कर व अधिभार, पेट्रोल पंप चालकाचे कमिशन यांच्या पारदर्शक नोंदीसह पावती मिळालीच पाहिजे, अशी भूमिका *आपचे राज्य संघटक व पुणे कार्याध्यक्ष विजय कुंभार यांनी मांडली आहे.
याबाबतची मागणी निवेदनाद्वारे *आप पुणे शहर इंधन दर समायोजन समितीचे चेंथील अय्यर व पुणे शहर जनसंपर्क प्रमुख प्रभाकर कोंढाळकर* यांनी धनंजय आखाडे, *अतिरिक्त आयुक्त , राज्य कर विभाग* यांच्याकडे केली आहे. तसेच *केंद्रीय अर्थ सचिव आणि महाराष्ट्र राज्य अर्थ सचिव* यांच्याकडे देखील निवेदनाद्वारे मागणी केली आहे असे प्रभाकर कोंढाळकर आणि चेंथील अय्यर यांनी सांगितले.
पेट्रोल पंपावर मिळणारी पावती पूर्णपणे पारदर्शकरित्या मिळावी हा जनतेचा अधिकार आहे. इंधनाची मूळ किंमत, त्यावर लावले जाणारे स्थानिक व इतर कर, राज्य आणि केंद्र सरकारने लावलेला अधिभार,पंप चालकाचे कमिशन या सर्वांच्या पारदर्शक नोंदी पेट्रोल, डिझेल, सीएनजी पंपावर मिळणाऱ्या पावतीवर असल्याच पाहिजे अशी आम आदमी पक्षाची भूमिका आहे. आम आदमी पक्षाच्या या मागणीची पूर्तता लवकरात लवकर न झाल्यास आपच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.