हे बेकायदेशीर बोर्ड काढून टाकण्याचा व झाकण्याचा खर्च नगरसेवकांकडून वसूल करावा अन्यथा निवडणूक खर्चात ग्राह्य धरावा
पुणेकरांच्या कराच्या पैशातून ह्या बोर्डची बिले मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्याची मागणी.
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे महानगरपालिका मुख्य सभेची मुदत संपली आहे. नगरसेवकांचा कार्यकाळ संपून प्रशासक नेमून जवळजवळ तीन महिने होत आले आहेत. पण अद्यापही नगरसेवकांच्या नावे सौजन्य, संकल्पनेचे लाखो बोर्ड अद्यापही पुण्यात झळकत आहेत. ही करदात्या पुणेकरांच्या पैशावर केलेली फुकटची जाहिरात आणि सार्वजनिक जागेवर केलेले अतिक्रमण आहे. हे बोर्ड पुणे महानगरपालिका प्रशासनाने तातडीने काढून टाकावेत. ते बोर्ड लावण्याचा व काढण्याचा खर्च ह्या नगरसेवकांकडून वसूल करावा. ह्या लक्षावधी बेकायदेशीर बोर्डांची बिले मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशा मागण्या आज आप तर्फे आयुक्त व अतिरिक्त आयुक्त यांना निवेदन देऊन केल्या. याबाबत जर प्रशासनाने कारवाई केली नाही तर आम आदमी पक्ष तीव्र आंदोलन करत हे बोर्ड काढण्याची मोहीम हाती घेईल आणि त्याला प्रशासन जबाबदार असेल असा इशारा आम आदमी पक्षाच्या वतीने देण्यात आला. *निवेदन देऊन अतिरिक्त आयुक्त बिनवडे यांच्याशी चर्चा करणाऱ्या शिष्टमंडळात राज्य प्रवक्ते डॉ अभिजित मोरे, पुणे शहर संघटक एकनाथ ढोले, खडकवासला विधानसभा महिला अध्यक्षा ज्योती ताकवले, बिबवेवाडी विभाग समन्वयक घनश्याम मारणे, पियूष हिंगणे, किरण इंगळे, इरफान रोड्डे, शैलेश मोहिते हजर होते.
पुणे महानगरपालिका क्षेत्रात अक्षरशः काही लाखभर बोर्डवर नगरसेवकांच्या नावाचे सौजन्य आणि संकल्पना यांचे बोर्ड लागले आहेत. जनतेच्या कराच्या पैशातून पुणे मनपा प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सार्वजनिक सुविधा, सेवा, बांधकामे, रस्ते, उड्डाणपूल, बगीचे, शौचालये, स्मशानभूमी, समाजमंदिर, मंडई, अग्निशमन केंद्र इत्यादी ठिकाणी याशिवाय खासगी आस्थापना, निवासी इमारतीबाहेर देखील नगरसेवकांच्या नावे सौजन्य / संकल्पना यांचे बोर्ड लागले आहेत. त्यावर कोट्यवधी रुपये उधळले आहेत. पैसे पुणेकरांचे, काम सार्वजनिक यंत्रणेकडून मग संकल्पना, सौजन्य यांचे बोर्ड नगरसेवकांच्या नावाचे का ? अगदी स्मशानभुमी व सार्वजनिक शौचालयावर सुद्धा संकल्पनेचे बोर्ड लागले आहेत.
अशा पद्धतीने नगरसेवकांच्या नावाचे बोर्ड लावणे हे बेकायदा कृत्य आहे. जनतेच्या पैशाची उधळपट्टी आहे. तसेच सार्वजनिक मालकीवर केलेले अतिक्रमण व फुकटची जाहिरात आहे. आता पुणे मनपा निवडणुका आल्यावर आचारसंहिता काळात हे बोर्ड झाकण्यासाठी पुन्हा पालिकेला पुणेकरांचे कोट्यवधी रुपये खर्च करावे लागणार आहेत. ह्यांचे बोर्ड लावण्यासाठी आणि प्रत्येक मनपा, लोकसभा, विधानसभा निवडणुकीत हेच बोर्ड झाकण्यासाठी कोट्यवधी रुपये पुणेकरांचे का खर्च करायचे ? असा सवाल आम आदमी पक्ष विचारत आहे.
सौजन्य व संकल्पना लिहिलेले नगरसेवकांचे बोर्ड बेकायदेशीर असल्यामुळे कायमस्वरूपी काढून टाकावेत आणि हे बोर्ड काढण्याचा खर्च या नगरसेवकांकडून वसूल करावा. दरम्यान मनपा निवडणूक आचारसंहिता काळात हे बोर्ड झाकण्याचा खर्च पुणे मनपाला करावा लागल्यास तो खर्च देखील सदर नगरसेवकांकडून वसूल करावा. जर ह्या वसुलीला नगरसेवक विरोध अथवा टाळाटाळ करत असतील तर सदर खर्च त्यांच्या निवडणूक खर्चात ग्राह्य धरावा यासाठी पुणे मनपा आयुक्तांनी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडे पत्रव्यवहार व पाठपुरावा करावा, अशी मागणी आम आदमी पक्ष करत आहे.