अभियान यशस्वीपणे राबविल्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे केले कौतुक
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे, दि. :- 'जलशक्ती अभियान' अंतर्गत जिल्ह्यात झालेल्या कामांची केंद्रीय पथकाने क्षेत्रीय भेटी देवून पाहणी केली. यावेळी अभियान यशस्वीपणे राबविल्याबद्दल समाधान व्यक्त करत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे कौतुक केले.
केंद्रीय पथकाने 'कॅच द रेन' अंतर्गत जिल्ह्यातील झालेल्या कामांबाबत आढावा बैठक घेतली. यावेळी केंद्रीय उच्च शिक्षण मंत्रालयाच्या संचालिका स्मिता श्रीवास्तव, केंद्रीय जल, उर्जा व संशोधन संस्थेचे वैज्ञानिक सरबजीत सिंग, जिल्हा जलसंधारण अधिकारी सुजाता हांडे, रोहयो उपजिल्हाधिकारी वनश्री लाभशेटवार तसेच विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
केंद्रीय पथकाने शिरूर व खेड तालुक्यातील मृद व जलसंधारण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या कोल्हापुरी पद्धतीचा बंधारे, सिमेंट नाला बंधारे तसेच मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या दुरुस्तीच्या कामांची पाहणी केली. खेड येथील वनविभागाच्या नर्सरीला भेट देवून येथील कामांची पाहणी केली. शिरूर नगर परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीला भेट देऊन ही संपूर्ण इमारत सौर उर्जेवर कार्यान्वित असल्याबद्दल तसेच येथील रेन वॉटर हार्वेस्टिंगचे काम प्रशंसनीय असल्याबाबत पथकाने समाधान व्यक्त केले.
रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी श्रीमती लाभशेटवार यांनी जलशक्ती अभियानांतर्गत जिल्ह्यात झालेली कामे तसेच अमृत सरोवर अभियानांतर्गत होत असलेल्या कामांबाबत माहिती दिली. या अभियानात सामाजिक संस्थेच्या मदतीने सरोवरातील गाळ काढण्याची कामे करण्यात येत आहेत. तसेच जलसंवर्धनासंबंधी नव्याने हाती घेण्यात येत असलेली कामे, रिचार्ज शाफ्ट व अस्तित्वातील कामांना दुरुस्ती करुन पुनर्वापर करण्याबाबत विविध यंत्रणांमार्फत माहिती देण्यात आली. अमृत सरोवरातील काढलेला गाळ पुन्हा शेतीसाठी वापर होत असल्यामुळे पथकाने कामाचे कौतुक केले.
पथकाने अभियानात समाविष्ट यंत्रणांकडून जलशक्तीसंदर्भात राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती घेत जिल्ह्यात झालेल्या कामांचे जिओ टॅगिंग पोर्टलवर अपलोड करण्याकरीता प्रभावी नियोजन करुन कामे पूर्णत्वास नेण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी जिल्हा जलसंधारण अधिकारी कार्यालय, येरवडा येथील जलशक्ती केंद्रास पथकाने भेट देवून केंद्राच्या कामाविषयी माहिती घेतली असल्याचे जिल्हास्तरीय नोडल अधिकारी जलशक्ती अभियान तथा जिल्हा जलसंधारण अधिकारी यांनी कळविले आहे.