पॉईंट टू बी नोटेड :
विद्यापीठ प्रशासनाचे बदलते स्वरूप : मनोगत पुतळ्यांचे....
प्रेस मीडिया लाईव्ह :
डॉ. तुषार निकाळजे :
पुणे : माझ्या एका मित्राचा सेवानिवृत्तीचा काल कार्यक्रम होता. तो एका शैक्षणिक संस्थेत कर्मचारी म्हणून काम करीत होता. त्याच्या सेवानिवृत्तीच्यावेळी त्याच्या बॅचचे सेवानिवृत्त होणारे इतर सतराजण देखील होते. कार्यालयाच्या प्रमुखांनी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले. त्याचबरोबर प्रत्येकास मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली. या १८ सेवकांपैकी १७ सेवकांनी एक कॉमन मनोगत व्यक्त केले. "आम्ही नोकरीला लागलो, आमच्या मुलाबाळांचे शिक्षण झाले. ते नोकरीला लागले. त्यांचे लग्न झाले, त्यांना मुले झाली, आता आम्ही नातवंडांबरोबर खेळत आहोत व आमचा भविष्यातील कालावधी असाच जाणार आहे, त्यामुळे आम्ही समाधानी आहोत ".परंतु १८ वा कर्मचारी असलेला माझा मित्र तळमळीने म्हणाला, "साहेब,आपल्या शैक्षणिक संस्थेचे मानांकन यावेळी १०० क्रमांकाने खाली आले आहे, मी गेली ३५ वर्ष सेवा करत आहे, हे काम करत असताना आज पर्यंत मी जवळजवळ दहा पुस्तके लिहिली आहेत, यातील दोन पुस्तके चार ते पाच विद्यापीठांच्या अभ्यासक्रमासाठी आहेत, २ राज्य व राष्ट्रीय परिसंवाद, आज पर्यंत ४२ लेख लिहिले आहेत, तसेच आपले विद्यापीठ वगळून मला इतर जिल्हे, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील एकूण १४ शैक्षणिक व संशोधनात्मक पुरस्कार मिळाले आहेत. मला विद्यापीठाने पुरस्कार दिला नाही याचे दुःख नाही, परंतु माझ्या कुटुंबाची म्हणजे मी या कार्यालयात नोकरी केली आहे, त्याचे मानांकन जागतिक स्तरावर १०० ने खाली यावे याची मला फार मोठी खंत आहे. गेल्या सत्तर वर्षात प्रथमच घडलेली ही मोठी झिज आहे. परंतु इतरांनीही असे प्रयत्न करावेत, असे मला वाटते, यामुळे आपल्या विद्यापीठाचे व शैक्षणिक संस्थेची पुढील वाटचाल प्रगतिशील असावी. मी कदाचित हा टोमणा दिला असे वाटत असेल, तर कृपया क्षमस्व. परंतु रहावले नाही, म्हणून हे बोलावेसे वाटले, कृपया गैरसमज करून घेऊ नये." माझ्या मित्राने बोललेले हे वाक्य ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. एखादा कर्मचारी एवढ्या पोटतिडकीने का बोलतो? हे मला कळले नाही. कारण माझा फक्त पदवी घेईपर्यंत शैक्षणिक क्षेत्राशी संबंध आला होता. सेवानिवृत्तीचा कार्यक्रम संपला आणि मी घरी निघालो. तत्पूर्वी माझ्या मित्राच्या कार्यालयातील मित्रांसोबत व त्याच्या कुटुंबीयांसोबत आठवण म्हणून एका पुतळ्यापाशी फोटो काढला. मी माझ्या मित्राला शुभेच्छा देऊन, स्कूटरवरून घरी निघालो. पुढे गेल्यानंतर आणखी एक पुतळा मला दिसला. थोडा वळसा घालून पुढच्या रस्त्याने मुख्य प्रवेशद्वाराकडे वळालो, तेथेदेखील मला एक पुतळा दिसला. तदनंतर सरळ मी शहराच्या रस्त्याने मार्गस्थ झालो. शहरातील एका ठिकाणी एका मैदानाचे उद्घाटन होते. तेथे गेलो, तो उद्घाटनाचा कार्यक्रम पाहिला . तेथून पुढे जात असताना एका रस्त्याचे बांधकामाचे उद्घाटन चालू होते, तेथे थांबून तो कार्यक्रम मी पाहिला. पुढे गेलो, रस्त्यामध्ये फूट पाथच्या शेजारी वृद्धांसाठी बसण्यासाठी बाकडे लावण्याचा कार्यक्रम व उद्घाटनाचा कार्यक्रम चालू होता. तेथे पुढारी मंडळी जमली होती. त्याच बरोबर व्हिडिओ शूटिंग , फोटो काढणे चालु होते. मी तिथेच थांबलो. सर्व कार्यक्रमाचे स्वरूप न्याहाळले. एका बाकाच्या शेजारी मोठा बोर्ड लावला होता. त्या बोर्डवर " अमुक-तमुक पुढा-याच्या निधीमधून" असे लिहिले होते. माझ्या लक्षात आले, सध्या निवडणुका आलेल्या आहेत, त्यामुळे पुढाऱ्यांची बजेट वापरण्याची शेवटची संधी असावी. मी घरी गेलो, आंघोळ वगैरे केली. सायंकाळचे पाच वाजले होते. थोडा चहा घेतला, त्याबरोबर फरसाण खाल्ले. सायंकाळी पत्नी ऑफिस वरून आल्यानंतर मी तिला आज लवकर जेवण तयार कर असे सांगितले. मला आज दमल्यासारखे वाटते आहे, म्हणून लवकर झोपणार आहे. माझ्या पत्नीने नेहमीपेक्षा एक तास लवकर जेवण तयार केले. मी जेवलो. मुले बाहेर मित्रांकडे गेली होती. पत्नी टीव्ही पाहत होती. मीदेखील थोडावेळ टीव्ही पाहिला. मला थोडी झोप आल्यासारखे झाले. मी बेडरूममध्ये जाऊन झोपलो. अतिशय गाढ झोप लागली. मुले व पत्नी बेडरूम मध्ये येऊन केव्हा झोपली, ते मला कळलेदेखील नाही. मी सध्या रिकामटेकडा असल्याने दिवसभर भटकंती केली. पण मला आज फार दमल्यासारखे जाणवल्याने अतिशय गाढ झोप लागली.
कालांतराने मला स्वप्न पडल्यासारखे झाले नव्हे स्वप्न पडले होते. मी एका कार्यालयातून रात्री बारा वाजता स्कूटरवरून चाललो आहे, असे स्वप्न मला पडले. रात्री बारा वाजता त्या कार्यालयाच्या काही ठिकाणी लाईट लावून बांधकाम चालू होते, तसेच लोखंडी दरवाजे,खिडक्या, कंपाऊंड इत्यादींच्या वेल्डिंगच्या स्पार्किंगच्या ठिणग्यांचा उजेड दिसत होता. थोडे पुढे गेलो तर एका इमारतीच्या शेजारील मोकळ्या जागेत मोठमोठे लाईटचे दिवे लावले होते. एकदम लख्ख प्रकाश. मी थोडा जवळ गेलो. पाहिले तर तेथे कुठलेतरी वेब सिरीजचे शूटिंग चालू होते. त्यावेळी त्या शूटिंगच्या दरम्यान दोन कलाकारांचे संभाषण चालू होते. या संभाषणामध्ये काही अश्लील शब्दांचा उच्चारही झाला होता. मी विचार केला, " अरे हे कार्यालय सुशिक्षित आहे. पण या शूटिंगमध्ये अश्लील शब्दांचा उच्चार कसा? या कार्यालयाच्या प्रमुखांनी किंवा अधिकार मंडळांनी किंवा तज्ञांनी या कार्यालयाची जागा वेब सिरीजच्या शूटिंग करिता भाड्याने देताना या वेबसाईटचे स्क्रिप्ट किंवा कन्टेन्ट वाचला होता की नाही? की नुसत्याच भाड्यापोटी पैसे मिळवण्यासाठी ही जागा भाड्याने दिली आहे. थोड्यावेळाने मी स्कूटरवरून थोडा पुढे गेलो. तेथे एक मोठी बाग होती.
माझ्या स्कूटरच्या हेडलाईट समोर मला एक पुतळा बागेत उभा असलेला दिसला. त्या पुतळ्याच्या आजूबाजूने इतर पुतळे चालत येताना दिसत होते. मी क्षणभर स्कूटरचा हेडलाईट बंद केला. स्कूटर बंद करून स्टँडला लावली व त्या बागेच्या आत डोकावले. खरोखरच ते पुतळे बागेमध्ये चर्चा करत उभे होते. एका पुतळ्याने म्हटले," काय दिवस आलेत. आपण काय पाहतो ? आपण जे दिवस पाहिले, ज्यांच्यासाठी सगळं केलं, त्यांनी फक्त आपले पुतळे उभे केलेत, परंतु आपल्या संस्कारांचे अध्ययनास पूर्ण पाण्यात सोडून दिले की काय? असे वाटते". दुसरा सुटाबुटात, चष्मा घातलेला व एका हातात पुस्तक घेतलेला पुतळा म्हणाला, " मी परदेशात जाऊन पदव्या घेतल्या, माझ्या देशासाठी व भावी पिढीसाठी काहीतरी चांगले करावे, म्हणून येथेच आयुष्य घालविले. परदेशात मला यापेक्षा उच्च पदाच्या नोकऱ्या किंवा पदे मिळू शकत होती, परंतु मी तसे केले नाही, आज मी जे पाहतो की आपल्या सर्वांच्या वाढदिवस, जयंत्या साज-या करताना ढोल, लेझीम, कर्कश्श डीजे यांच्या तालावर मद्यधुंद होऊन नाचणारी ही पिढी पाहिली की वाईट वाटते". डोक्यावर पगडी, अंगात गुडघ्यापर्यंतचा शर्ट, धोतर, उपरणे घातलेला व लांब सडक मिशा असलेला पुतळा म्हणाला," अहो तुम्ही तर आत्ताची गोष्ट सांगितली, मी तर स्वातंत्र्य पूर्वीचा आपला देश पारतंत्र्यात असताना वर्तमानपत्र, लेख लिहून देशास स्वातंत्र्य मिळण्याचे विचार व्यक्त केल्यामुळे मला जेलमध्ये जावे लागले होते, तरीही मी खचलो नाही, जेलमधून बाहेर आल्यानंतर मी परदेशातून छपाईचे यंत्र आणून वर्तमान पत्र, पुस्तके, भित्तीपत्रके छापण्यास सुरुवात केली,. यास त्यावेळच्या जनतेने माझी साथ दिली. इतरही समाजसेवकांची मला साथ मिळाली. कालांतराने आपला देश स्वतंत्र झाला. परंतु आता मी पाहत आहे, माझ्या मृत्यूनंतर मी परदेशातून आणलेल्या छपाई मशीनचे अवशेष या कार्यालयाच्या तलावाशेजारी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. मला असे वाटले होते की या कार्यालयातील छपाई विभागाबाहेर स्वातंत्र्याची आठवण म्हणून मी परदेशातून आणलेले छपाई यंत्र लावले असते, तर मला थोडेसे समाधान वाटले असते. छपाई या विषयातील हा एक ऐतिहासिक दागिना समजला गेला असता". शेजारी बसलेला एका सैनिकाचा पुतळा बोलू लागला ," माझे बरे आहे. मी युद्धामध्ये वापरलेली बंदुके, पिस्तुले, तोफ, रणगाडे एकदम चकाचक करून त्याचे म्युझियम तयार केले.".दुसरा एक खेळाडू पुतळा म्हणाला, "मी कालच एक बातमी वर्तमान पत्रात वाचली, एका कार्यालयातील एका कार्यालय प्रमुखाने स्वतःची वेतन वाढ करून घेतली, त्याची चौकशी समिती नेमली. मला या गोष्टीचे आश्चर्य वाटते. कारण मी जेव्हा तरुणपणी नामांकित खेळाडू होतो, त्यावेळी महाविद्यालयात शिकत असताना मला माझ्या खेळातील नैपुण्य मिळाल्यामुळे परदेशात आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळण्याची संधी मिळाली. परंतु माझी परिस्थिती फार चांगली नव्हती. त्यामुळे ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळण्याची संधी जाते की काय? याची मला भीती वाटत होती. मी सहजच ही गोष्ट माझ्या कॉलेजच्या प्राचार्यांशी बोललो. त्यांनी मला सांगितले, "काळजी करू नकोस, तू फक्त व्यायाम कर, स्पर्धेची तयारी कर, तुझ्या जाण्या- येण्याच्या खर्चाची सोय कशी होईल, ते मी पाहतो". त्या प्राचार्यांनी स्वतःचे राहते घर गहाण ठेवले, तसेच बँकेमधून कर्ज घेऊन मला परदेशी पाठविण्याची जबाबदारी उचलली. मी त्यावेळी आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवून आलो. त्यावेळी माझी १०० बैलगाड्या यांची ढोल-लेझीम सहित वरात काढली. पण आज एक दुःख होत आहे, या कार्यालयातील एक कर्मचारी ज्याने राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर या शैक्षणिक संस्थेचे नाव कोरले आहे, त्याचा पुरस्कार तर राहू दे, परंतु एक फुल देऊन सत्कारही केला नाही. सगळ्यात शरमेची बाब आहे की कोणत्याही अधिकार मंडळाने या कर्मचाऱ्याच्या अभिनंदनाचा ठराव सभेमध्ये मांडला नाही. हे एवढ्यावरच संपत नाही या शैक्षणिक संकुलातील NAAC मूल्यांकनासाठी येणाऱ्या समितीसमोर दिखाऊपणा करण्यासाठी अकरा मोठे टेलिव्हिजन व विद्यार्थ्यांच्यासाठी ऑटोमॅटिक झेरॉक्स मशीन व प्रिंटर आणले होते . हे प्रिंटर व झेरॉक्स मशीन सध्या कुठेच दिसत नाही. माझ्या प्राचार्यांनी माझ्या आयुष्यातील दिलेल्या योगदानाचे मी आजही कर्ज फेडू शकलो नाही". त्यांच्या शेजारी हाताची घडी घालून बसलेला, डोक्यावर फेटा असलेला, एक विचारवंत म्हणाला, " अहो माझीतर गोष्टच निराळी माझ्यावेळी मला परदेशातील कॉन्फरन्सकरिता पाठवणारे शेकडो हात मी आजही विसरू शकलो नाही. मी आज जागतिक स्तरावरचा विचारवंत म्हणून ओळखला जातो, ते त्या शेकडो हातांनीच. मी माझ्या भाषणांतून व पुस्तकांच्या लिखाणामधून व्यक्त केलेले विचार आज समाजास उपयुक्त ठरले आहे. परंतु या शैक्षणिक संकुलातील एका संशोधक कर्मचाऱ्याने लिहिलेल्या आर्टिकल्सची प्रोसेसिंग फी ची रक्कम रुपये १० हजार त्यास दिली गेली नाही.कर्मचार् याने विचार व्यक्त करणे ही संकल्पना बहुधा या व्यवस्थेला पचनी पडली नसावी.. आज आपण सर्वजण पाहत आहोत कोट्यावधींची बांधकामे करताना सर्वच नियम धाब्यावर बसवलेले दिसतात. यापेक्षा वेगळी गोष्ट माझ्या निदर्शनास आली, मी एक विचारवंत, माझ्या शेजारी बसलेल्या खेळाडू व स्वातंत्र्यासाठी झगडणारे हे समोरचे पत्रकार व लेखक ज्यांनी परदेशातून छपाईयंत्र आणले होते, या सर्व आम्हा तिघांच्या आसपासच्या शंभर- दोनशे मीटरच्या अंतरावरच आमचे पुतळे बसविलेआहे. कालांतराने हे राजकारणी आमच्या भोवती वेगवेगळे गट तयार करतील व या गटांमध्ये आपापसात भांडणे लावतील. त्यामुळे आम्ही आपोआपच बदनाम होऊ", या सर्वांमध्ये बसलेला चौथा पुतळा म्हणाला, " अहो मी लढाई केली, अहोरात्र झोप न घेता माझी तलवार चालवित होतो, ज्यामुळे माझी गरीब जनता पारतंत्र्यातून बाहेर येईल व चार घास सुखाने खाईल. मी गोरगरीब जनतेसाठी वेळ पडल्यास दुश्मनांची गोदामे रिकामी केली व आपल्या जनतेला अन्नधान्याचा पुरवठा केला. पण आज मला एक फार मोठी खंत वाटते, ज्यावेळी माझा वाढदिवस असतो किंवा दिवाळी दसरा असे काही उत्सव असतात त्यावेळी माझ्या भोवती हजारो पणत्या, दिवे लावतात. या पणत्यांकडे बघून मला थोडे वाईट वाटले . कारण आजही काही गरीब लोक असे आहेत की ज्यांना दोन वेळेच्या जेवनाची चिंता आहे. सणासुदीला माझ्या भोवती हजारो मेणबत्या, दिवे, पणत्या लावल्या नाही तरी चालेल परंतु या दिव्यातील तेलाचा वापर जर गोरगरिबांच्या दोन वेळेच्या जेवणासाठी केला तर मला फार आनंद होईल किंवा एखाद्याच्या झोपडीत या मेणबत्त्या लावल्या तर किमान एक रात्र त्याला जो आनंद मिळेल, त्यात माझं समाधान असेल", आणखी एक पुतळा म्हणाला, " या लोकांची कमालच आहे, आपला वाढदिवस किंवा पुण्यतिथी असेल, त्याच्या आदल्या दिवशी फायर ब्रिगेडची गाडी बोलवायची आणि आपल्याला स्वच्छ करायचं. दुसऱ्या दिवशी शामियाना घालून, आपल्याला हार- फुले, भाषणबाजी करून पुढच्याच वर्षी आपल्याकडे प्रस्थान करायचे". या सर्वांमध्ये बसलेला एक महिलेचा पुतळा म्हणाला, " अहो मंडळी, माझ्या लेकींची कहाणी कर वेगळीच. महिला सबलीकरण हा कागदावरच विषय. एक उदाहरण सांगते. वर्ष २००९ मध्ये शासनाने महिलांना कार्यालयीन वेळेव्यतिरिक्त जादा वेळेत काम करण्यास मनाई करणारा आदेश काढूनही रात्री नऊ ते दहा वाजेपर्यंत महिला कर्मचाऱ्यांना काम करावे लागते. एवढेच नव्हे तर कार्यालयाकडे दहा-बारा चार चाकी असताना या महिलांना रात्री घरी सोडण्याकरता या गाड्यांचा वापर केला जात नाही. एका संशोधन करणाऱ्या महिलेची बदली दुसऱ्या विभागात केली जाते, जो विभाग तिसऱ्या मजल्यावर आहे, तेथे लिफ्ट नाही, विद्यार्थ्यांचा कायम वावर,कामातून वर डोके काढण्यास वेळच नाही. या महिलेचा पाठदुखी, गुडघेदुखी, मणक्याचा त्रास असताना व त्या महिलेने इतर ठिकाणी बदली करण्याची विनंती केलेली असताना, तिची बदलीच केलीली नाही. कारण त्या महिलेचे संशोधन पूर्ण होऊ नये, हा त्यामागचा हेतू. दुसरी एक महिला याच प्रकारची. तीदेखील संशोधन करणारी. हुशार, परंतु तिची बदली अशा ठिकाणी केली की तेथे महाविद्यालयांच्या, शैक्षणिक संस्थांच्या प्राध्यापकांचा, प्राचार्यांचा, संस्थाचालकांचा, कर्मचाऱ्यांचा कायम वावर व कामाची संख्यादेखील जास्त. या प्रकरणातही या महिलेचे संशोधन पूर्ण होऊ नये हाच उद्देश असावा. याला महिलांचे सबलीकरण म्हणावे का?" मला झोपेतून अचानक जाग आली. डोळे चोळत उठलो. घड्याळाकडे पाहिले. पहाटेचे चार वाजले होते. मला क्षणभर कळेना मी हे स्वप्न पाहत होतो की आणखी काय होते? मी चक्रावून गेलो. माझ्या अंगातील टी-शर्ट घामाने पूर्ण चिंब झाला होता. मी उठलो, घरातील स्वच्छतागृहात गेलो , तेथून बाहेर येऊन स्वच्छ हात व तोंड धुतले , ग्लासभर पाणी प्यायलो , मला थोडेसे बरे वाटले. अंगातील टी-शर्ट काढले, कपाटातून दुसरे टी शर्ट काढून घातले. मला काही झोप येईना.
मी या सर्व गोष्टींचा विचार करत होतो, आज हे काय झाले? मला आज असले काय विचित्र स्वप्न पडले? पण हे स्वप्न विचित्र नव्हते. मला या गोष्टीचा आनंद झाला, किमान या पुतळयांनी स्वतःचे मनोगत मला माझ्या स्वप्नात येऊन तरी सांगितल. त्यामुळे त्यांची मने तरी हलकी झाली असतील, जसे माझ्या मित्राने सेवानिवृत्तीच्या वेळी त्याचे व्यक्त केलेले मनोगत.