प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे दि.२३: महाराष्ट्र राज्य महिला आयोगातर्फे महिलांना त्यांच्या तक्रारीबाबत स्थानिक स्तरावर आपले म्हणणे मांडता यावे यासाठी ‘महिला आयोग तुमच्या दारी’ हा उपक्रम राबवित असून त्याअंतर्गत पुणे येथे २८ ते ३० जून या कालावधीत आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत जनसुनावणी घेण्यात येणार आहे.
जनसुनावणीच्या दिवशी प्रथम सत्रात जनसुनावणी व द्वितीय सत्रात जिल्ह्यातील बाल विवाह, विधवा एकल महिलांचे प्रश्न व महिला अत्याचार विषयक सद्यस्थिती या विषयाच्या अनुषंगाने आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
पुणे शहर व ग्रामीणसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अनुक्रमे २८ जून आणि २९ जून रोजी सकाळी ११.३० वाजता जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील जनसुनावणीचे ३० जून रोजी सकाळी ११.३० वाजता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेजवळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी पुणे येथे आयोजन करण्यात आले आहे, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मोनिका रंधवे यांनी कळविले आहे.