प्रेस मीडिया लाईव्ह :
डॉ. तुषार निकाळजे :
सध्याच्या तांत्रिक युगात सॅटॅलाइट हा प्रकार सर्वांनाच माहित आहे. थोडक्यात अवकाशातील तांत्रिक यंत्रणेद्वारे पृथ्वी, पाणी व जमिनीखालील तसेच अवकाशातील गोष्टींचे टीपण करणे. त्यावर माहिती संकलित करून व संशोधन करणे हा होय. परंतु काहीवेळा या सर्वांचे व्यवहार देखील केले जातात. यातील व्यवहारांवर अनेक व्यवस्था अवलंबून आहेत. तसेच त्यांचे फायदे- तोटेदेखील होत आहेत. हे आपणास माहीत आहे. अवकाशातील सॅटलाईटद्वारे अगदी मातीच्या कणापासून ते अणुबॉम्बसारखी वस्तूदेखील कॅच होत असतात.
परंतु आज एक तारा या सॅटॅलाइट यंत्रणेला दिसलेला नाही. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जनसंपर्क कार्यालयात जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करणारे श्री. मधुकर चव्हाण यांचा येथे महत्त्वपूर्ण उल्लेख करावासा वाटतो. या व्यक्तीच्या वेगळेपणाबद्दल सांगू इच्छितो. श्री. मधुकर चव्हाण हे वर्ष १९८७ मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये टंकलेखक म्हणून नोकरीस लागले. त्या पदातील पुढील पदोन्नति त्यांना मिळाली. त्यांचे मूळ शिक्षण एम. ए. इतिहास झालेले आहे. परंतु त्यांनी नंतर वृत्तपत्रकारिता हा अभ्यासक्रम पूर्ण करून त्यामध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. यादरम्यान गेले आठ-दहा वर्ष ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील जनसंपर्क अधिकारी कार्यालयात टंकलेखक म्हणून कार्य करीत होते. या सर्व अनुभवाची दखल घेऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, प्रशासन विभाग यांनी श्री. मधुकर चव्हाण यांना रिक्त असलेल्या जनसंपर्क अधिकारी पदाचा कार्यभार सोपविला. गेले दोन वर्ष ते जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत होते. ते दिनांक ३१ मे २०२२ रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. ही झाली त्यांची खाजगी माहिती. परंतु त्यांनी त्यांच्या आयुष्यात अशी काही एक गोष्ट करून ठेवली आहे, तिचे समाजापुढे एक वेगळे उदाहरण आहे. त्यांनी १९८८ साले एका विधवा महिलेची विवाह केला. ते स्वतः अविवाहित होते. या विधवा महिलेस पहिल्या पतीची एक मुलगी देखील आहे. परंतु श्री. मधुकर चव्हाण यांनी या सर्वाचा स्वीकार केला. या मुलीचे शिक्षण केले. तिचे लग्न देखील करून दिले. त्यांचे सगेसोयरे सांभाळत आहे. श्री.मधुकर चव्हाण यांच्या विवाहानंतर श्री. मधुकर चव्हाण व पत्नी यांना दोन मुले देखील झाली. त्या मुला- मुलींचे शिक्षणही दोघा उभयतांनी पूर्ण केले. या बहीण भावांमध्ये कोणताही परकेपणा अथवा सावत्रपणा जाणवू दिला नाही. ही मुले-मुली देखील सख्खे असलेल्या भावनेने एकत्र राहत आहेत. श्री. मधुकर चव्हाण यांनी १९८८ साली त्यावेळी केलेले हे धाडस म्हणावे लागेल. परंतु आजपर्यंत त्यांनी सर्व नातेवाईक, मित्रमंडळी यांच्याशीदेखील योग्य ती नाती जुळवून ठेवली आहेत. मला आश्चर्य वाटत आहे की जनसंपर्क कार्यालयात दहा-बारा वर्ष काम करीत असताना जगातल्या कोणत्याही सॅटेलाईट यंत्रणेलाला हा तारा कसा दिसला नाही किंवा या ताऱ्यापासून आपणास काही आमदनी किंवा उपयोग होणार नाही अशी धारणा असावी? आजपर्यंत कोणीही या ताऱ्याचा साधा पुष्पगुच्छ देऊन क्रृतज्ञता, सत्कारही केला नसल्याची खंत आहे. पण हे काही असलं तरी मला एका गोष्टीचा समाधान आहे कि मी हा तारा शोधून स्वतःला संशोधक म्हणून घ्यावे की हॅकर?