पॉईंट टू बी नोटेड:- सुसाईड नोट- वाया गेलेल्या कागदाची....

पॉईंट टू बी नोटेड:

  विद्यापीठ प्रशासनाचे बदलते स्वरूप :- सुसाईड नोट- वाया गेलेल्या कागदाची....

प्रेस मीडिया लाईव्ह :

डॉ तुषार निकाळजे :

आम्ही वाया गेलेले कागद आहोत. सध्या एका कचऱ्याच्या डब्यात पडून आहोत. हा कचऱ्याचा डबा उद्या सकाळी कचऱ्याची गाडी घेऊन जाणार आहे. नंतर ही कचऱ्याची गाडी एका यंत्रात आम्हाला घालून तुकडे तुकडे करून लगगदा करणार आहे. आमचा अंत आम्हाला आमच्या डोळ्यासमोर दिसत आहे. पण याबद्दल कोणी लिहिले नाही तर हे असेच चालत राहणार आहे. किमान आमच्याबद्दल चार शब्द लिहिले तर यातना- वेदना- संवेदनातरी  कळतील म्हणून हा प्रयत्न.  यास कोणी सुसाईड नोट म्हणेन.  

आम्ही कचऱ्याच्या डब्यात कसे आलो ? तर एका कार्यालयातील एका कारकुनाने  आमच्यातील एका कागदावर एक मसुदा टाईप केला.  हा मसुदा अधिकारी क्रमांक एक ने चुका काढून दुरुस्त केला.  नंतर दुरुस्त केलेला मसुदा दुसऱ्या कागदावर टाईप केला व अधिकारी क्रमांक एक मार्फत अधिकारी क्रमांक दोन कडे पाठवला.  अधिकारी क्रमांक दोन ने अधिकारी क्रमांक एक ने पाठवलेल्या मसुद्यावर दुरुस्त्या काढल्या.अशा दुरुस्त्या अधिकारी क्रमांक चार पर्यंत झाल्या.  हा मसुदा चार वेळा पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या पानांवर टाईप केला गेला. या चार अधिकाऱ्यांचे एकमेकांशी कधी पटलेच नव्हते. त्याचा द्वेष आमच्या कागदांवर,  टाईप केलेल्या मसुद्यांवर काढण्यात येत असतो आणि कृत्रिम अनौपचारिक घटक म्हणून आमचा चोळामोळा करून कचऱ्याची टोपली दाखवली जाते. या केराच्या टोपलीत माझे इतर कागद भावंडे- बहिणी देखील असतात.  एक अर्धवट जळालेला चेक होता.  त्याचे चेकचा मालक एक अधिकारी होता. त्या चेकवर त्याने पूर्ण सही केली नाही,  म्हणून बँकेतून चेक स्वीकारला नाही व बाऊन्स झाला होता. हा बाऊंस  झालेला चेक घेऊन हा अधिकारी रागाने परतला. या अधिकाऱ्यास कार्यालयात एका समितीने अपात्र ठरविले होते. म्हणून तो रागात होता.  संध्याकाळी त्याचा एक वरिष्ठ अधिकारी या अपात्र अधिकाऱ्यासोबत एका हॉटेलमध्ये मंद दिव्यांच्या प्रकाशात रंगीत पेय पीत असताना गप्पा मारत होते.  या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या जादा पगाराची कार्यालयाने वसुली काढली होती.  हे दोघेही चौताळले होते. त्या बाउन्स झालेल्या चेकला सिगारेटचे चटके देऊन त्याचे तुकडे करून कचरापेटी टाकले गेले.  हा चेक एका  कचऱ्याच्या पेटीत निष्क्रिय होऊन पडला होता. त्याचबरोबर एका कार्यालयातील हजेरी पत्रकाची दोन पाने घडी करून पडली होती. हजेरी पत्रकावर एकाखाली एक ओळीत पदनिहाय नावे लिहिली होती.  स्वच्छ अक्षरात त्यापुढे महिन्यांच्या तारखांचे चौकोन, परंतु हे हजेरीपत्रक  ज्या कारकुनाने लिहिले होते,  त्याच्याबद्दल इतरांना फार दुस्वास  होता.  त्यामुळे ना करतीचं मीठ आळणी , असाच प्रकार घडला. यापूर्वीचे हजेरीपत्रकावर एका कर्मचाऱ्यास दोन ओळी सहीसाठी होत्या. हजेरी पत्रकावर  एका कर्मचाऱ्यास दोन ओळी सहीसाठी होत्या. हजेरी पत्रकावर फक्त काउंटर सही करायची असते. पण काही महाभाग हजेरी पत्रक म्हणजे ऐसपैस झोपण्याची जागा समजून सह्या करताना दिसतात.  अगोदर चेकच्या प्रसंगात उद्भवलेली  परिस्थितीच्या विरुद्ध त्या अधिकाऱ्याने चेकवर पूर्ण स्वाक्षरी करण्याऐवजी काउंटर सही केली,  तर हजेरी  पत्रकावरून काउंटर सही करण्याऐवजी पूर्ण स्वाक्षरी करणारे कर्मचारी.  या एका कर्मचाऱ्यांने कागद वाचविण्यासाठी वापरलेली  शक्कल हजेरी पत्रकाची पाने फाडून कचऱ्याच्या पेटीत जमा केली.  एका टोपलीत एक बंद पाकीट पडले होते. त्यामध्ये कागदांचा गठ्ठा होता. त्या पाकिटावर एका समितीचा गोपनीय अहवाल लिहिले होते.  त्या पाकिटातून," अहो मला वाचवा"  असा आवाज येत होता. त्या पाकिटाचे चिकटवलेले तोंड फाडले असता आतील कागदामधून हुश्य असा आवाज आला.  ही कागदपत्रे बोलू लागली," माझ्यावर एका चौकशी समितीचा गोपनीय अहवाल लिहिला आहे",  ही समिती दोन वर्षांपूर्वी झाली. या समितीच्या सदस्यांना मानधनापोटी लाखो रुपये दिले गेले. अहवाल गुलदस्त्यातच राहिला.  ज्याच्यावर चौकशी समिती नेमली होती, त्याला कार्यालय प्रमुखांनी क्लीन चीट दिली होती. आणखी काही चौकशी समित्यांचे अहवाल असेच कचरापेटीत गेले असावे.  कारण त्यांचे नंतर कुठे वाच्यता झाली  नसेल. आमच्या टोपलीत आमचा एक भाऊ टिशू पेपर होता. तो म्हणाला,"  मी एका डायनिंग हॉलमध्ये टेबलवर होतो.  त्या डायनिंग हॉलमध्ये अधिकार मंडळाच्या सभेनंतरचे जेवण आयोजित केले होते. या जेवणाचे मेनू म्हणजे पंचतारांकित हॉटेलमधली मेजवानीच होती. त्यावेळी दुष्काळ पडला होता. एका अधिकाऱ्याने बाहेरच्या हॉटेलमधून मागवलेले ग्रील सँडविच व बटर सँडविच खाऊन माझ्यासोबतच्या एका टिशू पेपरला हात व तोंड पुसले तोंड पुसताना त्याने करपट ढेकर दिला. ढेकर देण्यासोबत त्याने इतर दुसऱ्या अधिकाऱ्यांशी गप्पा मारत होता. त्या गप्पांमध्ये तो काहीतरी विद्यार्थीहित, समाजहित, शुल्क वाढ स्टेशनरी अशा गप्पा व शब्द उच्चार होते.  दुसऱ्या अधिकाऱ्याने मच्छी फ्राय खाऊन आमच्यातील एका टिशू पेपरला तेलकट हात पुसला. आमच्या कचऱ्याच्या टोकलीतील दोन तीन लोकल कन्व्हेनिअंस  व टी ए डी ए चे चुरगळलेले फॉर्म होते.तो टी ए डी ए चा फॉर्म म्हणाला,"  काय राव हे अधिकारी एकाच कारमध्ये तिघे  येतात व स्वतःच्या वेगवेगळ्या कारची स्वतंत्र बिले लावून वाहन भत्ता घेतात.  दुसरा कचऱ्याच्या टोपलीतील फॉर्म म्हणाला," अरे हे तर काहीच नाही ,एका अधिकाऱ्याने स्वतःच्या पत्नीच्या नावे असलेल्या कार मध्ये प्रवास करून वाहन भत्ता घेताना त्यावर "ट्रॅव्हल बाय ओंन कार " असा शेरा लिहून स्वाक्षरी देखील केली. या कचऱ्याच्या टोपली शेजारी बाहेर पडलेल्या कागदांमध्ये एक नोटीशीचा कागद होता. त्यामध्ये पर जिल्ह्यामध्ये आयोजित केलेल्या कार्यालयाच्या सभेची सूचना होती. ही सभा तीन आठवड्यांनी होणार होती. परंतु पंधरा दिवसांनी ती रद्द करण्यात आली व कार्यालयातील मूळ ठिकाणीच ही सभा घेण्याची नोटीस जारी केली. या सर्व वाईट घटना आमच्या कागदांच्या नशिबी आल्या असल्या तरी एका कवीने आमच्यावर एक कविता लिहून आमचा उद्धार केला आहे. ते कवी म्हणतात ,"मै एक कागज का तुकडा हू,  जंगल से आता हू, कारखानो मे बनता हू, बाजारो मे बिकता  हू". त्या कवीचे आम्ही ऋणी आहोत. पण या सुसाईड नोटचा  शेवट करताना एकच सांगू इच्छितो कागद तयार करण्यासाठी एका झाडाला बळी जावे लागते. किमान त्या झाडाच्या त्यागाचा विचार तरी करा.

Post a Comment

Previous Post Next Post