दंत तपासणी शिबिरात २५० नागरिकांची मौखिक आरोग्य तपासणी..
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : जागतिक तंबाखू विरोध दिन (३१ मे )निमित्त एम ए रंगूनवाला दंत महाविद्यालय आणि रोटरी क्लब ऑफ सिनर्जी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित निःशुल्क दंत तपासणी शिबिरात २५० नागरिकांची तपासणी करण्यात आली आणि मौखिक आरोग्याबद्दल जनजागृती करण्यात आली. प्रमुख आयोजक डॉ धृती गार्डे ,दंत महाविद्यालयाच्या प्राचार्य रमणदीप दुग्गल,अधिष्ठाता आर.ए.शेख,डॉ सुवर्णा चव्हाण आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली बिबवेवाडी येथे हे विशेष निःशुल्क तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते .गौरव घुले आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.
सदर शिबिरात सहभागी नागरिकांची मौखिक आरोग्याची तपासणी करण्यात आली. तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत तंबाखूच्या दुष्परिणामांवर दृकश्राव्य माध्यमातून प्रबोधन व मार्गदर्शन करण्यात आले.या शिबिरात तपासणी करण्यात आलेल्या २५० पैकी १६० रुग्ण वेगवेगळ्या प्रकारे तंबाखू सेवन करण्यात येत असल्याचे आढळले. त्यांचे समुपदेशन करण्यात आले.या रुग्णांवर एम ए रंगूनवाला दंत महाविद्यालयात मोफत तपासणी आणि उपचार करण्यात येणार आहेत.
डॉ धृती गार्डे म्हणाल्या,'तंबाखू सेवनामुळे तरुण पिढीवर मोठे दुष्परिणाम होत आहेत. त्या विषयी घरोघरी जनजागृती करणे आवश्यक आहे.त्यांचे समुपदेशन करणे आवश्यक आहे.मौखिक आरोग्य जपणे ,वेळोवेळी तपासणी करणे ,चांगल्या सवयी बाळगणे हिताचे असून दंत आरोग्याकडे दुर्लक्ष करता कामा नये '.
'वेगवेगळ्या प्रकारे होणारे तंबाखू सेवन घातक '
'भारतात तंबाखू सेवन खूप मोठ्या प्रमाणात केले जाते.तंबाखू खाणे,दातांना तंबाखूची मिश्री लावणे,गुटखा सेवन,पान मसाला सेवन ,विडी -सिगारेट ओढणे अशा विविध मार्गे तंबाखू सेवन केले जाते. तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम सर्वांना महित आहेत,तरी त्याकडे दुर्लक्ष केले जाते. तोंडाचा कर्करोग,फुफ्फुसाचा कर्करोग,हृदय विकार.नेत्रदोष,आतड्याचा कर्करोग हे विकार तंबाखू सेवनाने होतात. तरुणांचे अकाली मृत्यूही यामुळे होतात.याविषयी जनजागृती करणे आवश्यक आहे' ,असे डॉ धृती गार्डे यांनी सांगितले .