काल दिवसभरात अनेक घडामोडी घडल्या आहेत.
मुंबई : राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काल शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठका झाल्या. काल दिवसभर राजकीय पटावर भाजपची एन्ट्री झाली नाही. काल दिवसभरात अनेक घडामोडी घडल्या आहेत.
दिवसभरात घडलेल्या दहा घडामोडी .....
1. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या गटातील बंडखोर आमदारांसोबतचा एक व्हिडीओ सकाळी जारी केला. या व्हिडीओमध्ये गुवाहाटीत असलेल्या एकनाथ शिंदेंच्या गटात 49 आमदार होते. त्यापैकी 42 आमदार शिवसेनेचे आणि 7 अपक्ष आमदार उपस्थित होते.
2. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीला 13 आमदारांनी हजेरी लावल्याचं शिवसेनेकडून सांगण्यात आलं. त्यापैकी काही आमदार हे वर्षा बंगल्यावर उपस्थित होते, तर आदित्य ठाकरे हे मातोश्रीवरून उपस्थित होते. तर संजय राऊतांनी शिंदेंच्या गटातील 21 आमदार संपर्कात असल्याची माहिती दिली
3. महाविकास आघाडीकडे बहुमत आहे. त्यांनी (बंडखोर आमदारांनी) शिवसेना सोडलेली नाही. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेचे बहुमत आहे. ते फक्त रुसून तिथे गेले आहे. त्यांचा रुसवा फुगवा निघाला की, ते पुन्हा सोबत येतील'', असा विश्वास मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
4. मुख्यमंत्र्यांनी काल फेसबुक लाईव्हमधून आमदारांना आवाहन केल्यानंतर बंडखोर आमदार संजय शिरसाठ यांनी मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र लिहिलंय. आमदारांना अपमानास्पद वागणूक दिल्याचा आणि मुख्यमंत्र्यांना बडव्यांनी घेरल्याचा आरोप आमदार शिरसाट यांनी केलाय. या आहेत आमदारांच्या भावना असं सांगत एकनाथ शिंदे यांनी हे पत्र ट्विट केलंय.
5. शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे अशी आमदारांची इच्छा असेल तर आमदारांनी 24 तासांत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर उपस्थित राहून चर्चा करावी असे आवाहन शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे. बंडखोर आमदारांच्या मागणीचा विचार होईल. मात्र, त्याआधी तुम्ही मुंबईत येण्याची हिंमत दाखवावी असे आवाहन राऊत यांनी दिले.
6. संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर राज्यात बैठकांचं सत्र सुरु झालं. बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, नितीन राऊत, नाना पटोले यांची एच.के. पाटील यांच्यासोबत काँग्रेसनं तातडीनं वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावली. तर नाना पटोलेंनी आम्ही महाविकासआघाडी सोबत आहे, असे म्हणत काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे.
7. राष्ट्रवादी काँग्रेसची देखील बैठक झाली. या बैठकीत शरद पवार, अजित पवार उपस्थित होते. बैठकीत शरद पवारांनी आपण महाविकास आघाडी सोबत असून ही लढाई शेवटपर्यंत लढणार असल्याचे सांगितले. तर संजय राऊत म्हणाले, का उगाच वण वण भटकताय? घरचे दरवाजे उघडे आहेत.. अशी साद घालत संजय राऊत यांनी बंडखोरांना चर्चेचं आमंत्रण दिलेय. गुलामी पत्करण्यापेक्षा स्वाभिमानाने निर्णय घेऊ! जय महाराष्ट्र!
8. सरकार टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंना पूर्णपणे पाठिंबा आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली. संजय राऊत यांच्या ' ..तर महाविकास आघाडीतून बाहेर' पडण्याच्या वक्तव्यावर अजित पवार यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, कदाचित आमदारांना परत बोलावण्यासाठी सुद्धा तसं वक्तव्य केलेलं असावं.
9. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबतच्या सर्व बंडखोर आमदारांचा व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडीओत शिंदेंनी भाजप पाठीशी असल्याचं स्पष्ट म्हंटलंय भाजप काहीही कमी पडू देणार नाही असं शिंदे आमदारांना सांगत आहेत.कुठेही कमी पडणार नाही,असे सांगितले.
10. राज्य सरकार अल्पमतात आहे की नाही, हे ठरवण्याचा अधिकार विधानसभेला आहे. त्यामळं शिवसेनेचे आमदार कुठेही गेले तरी त्यांना राज्यात यावंच लागेल. तसंच हे सरकार बहुमतात आहे की नाही हे विधानसभेत स्पष्ट होईल, असं शरद पवारांनी ठणकावून सांगितलं. तर बंडखोर आमदार हे सभागृहात येणारच आहेत आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार आहे, त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठिण होईल अशी थेट धमकी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना दिली आहे.