निधी मिळाला नाही, हा फुटीर आमदारांचा रडीचा डाव - मा. जयंत पाटील
प्रेस मीडिया लाईव्ह :
शिवसेनेचे फुटीर आमदार हे मा. अजितदादा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आता दोष देत असले तरी त्यांच्या मतदारसंघाला किती पैसे मिळाले, याची आकडेवारी पाहिली की सत्य लक्षात येईल. सर्वाधिक निधी एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात दिला असून एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्याला १२ हजार कोटींचा निधी दिला गेला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. जयंत पाटील यांनी सांगितले. भाजप-शिवसेना युतीचे सरकार मागच्या काळात असताना शिवसेनेच्या आमदारांना केवळ सहा टक्के निधी मिळाला होता. ९४ टक्के निधी भाजपने घेतला होता. मात्र महाविकास आघाडी सरकारने शिवसेनेच्या आमदारांना कधीही निधी कमी पडू दिला नाही, हे सांगताना मा. जयंत पाटील यांनी फुटीर आमदारांच्या मतदारसंघांसाठी किती निधी दिला याची यादीच वाचून दाखवली. पण ज्यांना जायचेच आहे, त्यांनी जाताना रडीचा डाव खेळला, हेच यातून दिसून येते, अशी प्रतिक्रिया मा. जयंत पाटील यांनी दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे आपण राजीनामा देत असल्याचे सांगितल्यानंतर सिल्व्हर ओक, मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मा. जयंत पाटील म्हणाले की, सरकार येते आणि जाते. पण सरकार घालविण्याची ही जी पद्धत आहे ती महाराष्ट्राला भूषणावह नाही, अशी टीका त्यांनी केली.
महाराष्ट्राच्या राजकारणात महाविकास आघाडीचा एक अद्भूत प्रयोग आमचे नेते आदरणीय शरद पवार साहेब यांनी केला. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन सरकार स्थापन केले. महाविकास आघाडीने सामान्यांचे हित जपणारे अनेक निर्णय घेतले. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. अनेक चांगल्या योजना दिल्या. लोकांची सेवा केली. महाराष्ट्रात शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांचे सरकार राहिले पाहीजे, हा प्रयत्न पवार साहेबांनी केला. तीनही पक्षांना एकत्र करुन बहुमताची बेरीज केली. पण दुर्दैवाने शिवसेनेचे काही आमदार दुरावले. गेले काही दिवस जरी ते आमदार आम्ही शिवसेनेत असल्याचे सांगत असले तरी मनातून ते सोबत नसल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पदापासून पायउतार होण्याचा निर्णय घेतला असे मा. जयंत पाटील यांनी सांगितले.
आज मुख्यमंत्र्यांनी लोकांशी संवाद साधून पायउतार होण्याचा निर्णय घेतला. एक सरळ, चांगला, लोकांची काळजी घेणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला होता. आज त्यांनी पायउतार होताना घटक पक्षांचे आणि सर्वांचेच आभार मानले. कोरोना काळात एक मुख्यमंत्री किती चांगले काम करु शकतो, याचा आदर्श उद्धव ठाकरे यांनी देशासमोर ठेवला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या दीर्घकाळ लक्षात राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Jayant Patil - जयंत पाटील