महाराष्ट्रातील व्यक्ती देशाचा राष्ट्रपती होत असेल तर महाराष्ट्र काँग्रेसचा पाठींबा ..... नाना पटोले .
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुंबई : राष्ट्रपती पदासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव पुढे येण्याची शक्यता आहे. याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्रातील व्यक्ती देशाचा राष्ट्रपती होत असेल तर महाराष्ट्र काँग्रेसचा पाठींबा असल्याचे स्पष्ट केले. शरद पवारांना जर राष्ट्रपती पदाचा उमेदवार घोषित केले, तर काँग्रेसचा त्यांना पाठिंबा असेल, असे ते म्हणाले.
राष्ट्रपती निवडणुकीपूर्वी विरोधकांची एकजूट करण्याच्या ममता बॅनर्जी यांच्या प्रयत्नांना जबर धक्का बसला आहे. बॅनर्जी यांनी दिल्लीत बोलावलेली विरोधी पक्षांची बैठक एकतर्फी असल्याची टीका माकप नेते सीताराम येचुरी यांनी केली. तर मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसच्या वतीने या बैठकीत सहभागी होऊ शकतात, असे समजते आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच विरोधी पक्षांमध्ये गोंधळ वाढला आहे.
आपला उमेदवार विजयी व्हावा, यासाठी पुन्हा एकदा विरोधी एकजुटीचा आवाज घुमू लागला आहे. या क्रमाने, बॅनर्जी यांनी सर्व विरोधी पक्षांना पत्र लिहून 15 जून रोजी होणाऱ्या प्रस्तावित बैठकीत सहभागी होण्याची विनंती केली आहे, जेणेकरून विरोधी पक्ष राष्ट्रपती निवडणुकीसाठी रणनीती तयार करू शकतील. तथापि, या भूमिकेला तडा गेला आहे. दरम्यान, देश आणि देशातील नागरिकांच्या हितासाठी आता सर्वांनी आपले मतभेदांच्याही पलिकडे जावून विचार करण्याची वेळ आली आहे. यासंदर्भात खुली चर्चा होणे आवश्यक आहे, असे मत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी व्यक्त केले.
बॅनर्जी यांनी बोलावलेली बैठक ही एकतर्फी असल्याची चर्चा सुरू आहे. बैठकीचा दिवस ठरवण्याआधी ममता यांनी चर्चा न करता पत्र पाठवले असल्याचे म्हटले जात आहे. वरिष्ठ नेत्यांना डावलून बॅनर्जी भाजपाविरोधी चेहरा म्हणून स्वत:ला सादर करू इच्छितात, असे विरोधकांचे मत आहे. दुसरीकडे, बॅनर्जींनी उचललेले हे पाऊल विरोधकांमध्ये तेढ निर्माण करून भाजपाला मदत करत असल्याचे काही नेत्यांचे मत आहे.