जमीन घोटाळ्या प्रकरणी संजय राऊत यांना ईडीचे समन्स
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुंबई - संजय राऊत यांना ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले आहे. 28 जूनला चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स संजय राऊत यांना ईडीकडून पाठवण्यात आले आहे. जमीन घोटाळ्या प्रकरणी संजय राऊत यांना ईडीचे हे समन्स आले आहे.
नेमके प्रकरण काय आहे...
गोरेगावमधील पत्राचाळ जमीन प्रकरणात १ हजार ३४ कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप संजय राऊतांवर आहे. यापैकी काही पैसे संजय राऊत यांना मिळाल्याचा आरोप आहे. याच पैशातून संजय राऊत यांनी अलिबागमध्ये भूखंड खरेदी केल्याचा दावा करण्यात आला होता. या भूखंडांची किंमत साधारण ६० लाखांच्या आसपास असल्याचे सांगितले जात आहे. तसेच स्थानिक लोकांना धमकावून हे भूखंड कमी पैशात खरेदी करण्यात आले होते, असाही आरोप संजय राऊत यांच्यावर करण्यात आला आहे. पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांचे निकटवर्यीय मित्र प्रवीण राऊत यांनाही ईडीने अटक करण्यात आली होती.
संजय राऊत यांची प्रतिक्रिया
ईडीची कोणतीही नोटीस आपल्याला मिळाली नसल्याची प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. तशी नोटीस आली तरी आपण चौकशीला हजर राहण्यासाठी वेळ वाढवून मागू, असंही ते पुढे म्हणाले आहेत. दरम्यान, पत्राचाळ प्रकरणातच ईडीने यापूर्वी संजय राऊत यांच्या मुंबई आणि अलिबागमधल्या मालमत्ता जप्त केल्या होत्या. यामध्ये त्यांच्या मुंबईतल्या राहत्या घराचाही समावेश आहे.