प्रेस मीडिया लाईव्ह :
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेशी बुधवारी ऑनलाईन संवाद साधला आणि रात्री 'वर्षा' बंगला सोडून ते 'मातोश्री' मुक्कामी पोहोचले.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रथमच राज्यभरातील शिवसैनिकांशी आणि जनतेशीही संवाद साधला. भाजपसोबत सरकार स्थापन करा, ही शिंदे यांची मुख्य मागणी आहे. मात्र, या मागणीवर कोणतेही उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिले नाही. उलट समोर येऊन राजीनामा मागा; मुख्यमंत्रिपदच काय, शिवसेना पक्षप्रमुख पद देखील सोडण्यास आपण तयार आहोत, असे जाहीर करत उद्धव यांनी या संघर्षाचा चेंडू शिंदेंकडे टोलवला.
मुख्यमंत्रिपद किंवा पक्षप्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारण्यास मी नालायक आहे, असे कोणाला वाटत असेल, तर त्याने इकडून तिकडून नव्हे; तर मला समोर येऊन सांगावे. मी दोन्ही पदे सोडायला तयार आहे. मला पदांचा मोह नाही. मी मुख्यमंत्रिपद सोडल्यानंतर पुन्हा शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असेल, तर ते मला आनंदाने मान्य असेल; पण त्याहीपलीकडे जाऊन केवळ मी मुख्यमंत्री नको, दुसरा कुणीही असला तरी चालेल, तर तेही मला मान्य आहे. फक्त एकदा मला समोर येऊन सांगा किंवा तिकडून फोन करून सांगा, तुमचे आम्ही फेसबुक लाईव्ह पाहिले. आम्हाला तुमच्यासमोर येण्यास संकोच वाटतो; पण तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे आम्हाला तुम्ही नकोत. मी या क्षणाला मुख्यमंत्रिपद सोडायला तयार आहे. कोणत्याही पदाचा मोह मला अडवू शकणार नाही, माझा राजीनामा तयार ठेवला असून, आजपासूनच मी 'वर्षा' बंगला सोडून माझा मुक्काम 'मातोश्री'वर हलवत आहे. जोपर्यंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी जोडून दिलेला शिवसैनिक माझ्या पाठीशी आहे, तोपर्यंत मी कोणत्याही आव्हानाला सामोरे जायला तयार आहे, असे उद्धव म्हणाले.
शिवसेनेकडे किती आणि शिंदेंकडे किती आमदार, यावर बोलणेही उद्धव यांनी टाळले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी, तर काँग्रेसचे नेते कमलनाथ यांनी बुधवारी सकाळी फोन करून आम्ही तुमच्या सोबत आहोत, असा विश्वास दिला; पण माझ्याच लोकांना मी नको असेन, तर मी मुख्यमंत्रिपद सोडायला तयार आहे. त्यांनी समोर येऊन सांगावे, सुरतला जाऊन बोलण्याची गरज नाही. त्यांनी स्टेटमेंट दिले, तर मी तत्काळ राजीनामा देईन.