प्रेस मीडिया लाईव्ह :
मुंबई : शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारला सुरुंग लावत शिवसेनेशी बंड पुकारले. त्यानंतर अनेकांनी त्यांना समजावून परत येण्याचे आवाहन केले.परंतु शिंदे गट कोणतीच तडजोड करायला तयार नाही. सोबतच सर्व पक्षांकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. तर शरद पवार यांनी या बंडामागे भाजप असल्याचे म्हटले आहे.
बंडा अगोदर उद्धव ठाकरे आणि शिंदे यांच्यात बैठक झाली होती. त्या बैठकीचा उल्लेख ठाकरे यांनी करत मोठा गौप्यस्फोट केला. ठाकरे म्हणाले, शिंदे यांना भाजपसोबत जायचे आहे. असे त्यांनी मला सांगितले होते. या बंडा मागे भाजप आहे, असेही ते म्हणाले. ठाकरे महाराष्ट्रातील सर्व नगरसेवकांच्या बैठकीत बोलत होते.
मेलो तरी सेना सोडणार नाही, असे म्हणणारेच पळूून गेले. ठाकरे नावातच शिवसेनेची नांदी आहे. ठाकरे नाव न वापरता शिवसेना चालवून दाखवा, असे थेट आव्हानच उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांना केले. बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो न वापरता शिवसेना चालवून दाखवा, लोकांमध्ये वावरून दाखवा, असा घाणाघात उद्धव ठाकरेंनी केला. एकनाथ शिंदे यांना मी महत्वाचे नगरविकास खाते दिले. वास्तविक हे खातं मुख्यमंत्र्यांकडे असतं पण मी मोह केला नाही. ते शिवसेना फोडण्याचे पाप करत आहेत, असंही ठाकरे पुढे बोलताना म्हणाले.