प्रेस मीडिया लाईव्ह :
मुंबई, दि. 8- उच्च माध्यमिक शालांत (बारावी) परीक्षेत यश मिळविलेले विद्यार्थी, त्यांचे पालक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी अभिनंदन केले आहे. त्याचबरोबर देशाचे भविष्य असलेल्या या विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
प्रा.गायकवाड म्हणाल्या, बारावीची परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील एक महत्वाचा टप्पा आहे. या परीक्षेतील यशानंतर त्यांना आपल्या आवडीनुसार विविध क्षेत्रांमध्ये वाटचाल करण्याचा मार्ग खुला झाला आहे. या माध्यमातून स्वत:ची आणि पर्यायाने देशाची प्रगती साधण्याची संधी मिळणार असल्याने ते या संधीचे सोने करतील, असा विश्वास आहे. तथापि, ही परीक्षा हे अंतिम ध्येय नाही, यामुळे ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळाले नाही त्यांनी नव्या उमेदीने अभ्यासाला लागावे आणि यश संपादन करावे, असेही त्यांनी म्हटले आहे.
यावर्षी पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ मंडळांमधून एकूण 13 लाख 56 हजार 604 विद्यार्थी (94.22 टक्के) उत्तीर्ण झाले आहेत. विशेषत: यंदाचा निकाल हा फेब्रुवारी-मार्च 2020 च्या तुलनेत 3.56 टक्क्यांनी वाढला आहे. कोरोनामुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीतही अनेक आव्हानांना सामोरे जात या परीक्षा आणि त्यांचे निकाल वेळेवर आणि यशस्वीपणे लावल्याबद्दल राज्य मंडळाचे आणि विभागातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे प्रा.वर्षा गायकवाड यांनी विशेष आभार मानले आहेत.