सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या अन्नधान्याची बेकायदेशीर खरेदी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल


प्रेस मीडिया लाईव्ह : 

कोल्हापूर, दि. 29 (जिमाका): कसबा बावडा येथील पाटील गल्लीतील एका इमारतीमध्ये संदिप सिताराम रणदिवे व राजू सिताराम रणदिवे या दोघांनी काही लाभार्थ्यांकडून सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत शासनाकडून प्राप्त झालेले धान्य बेकायदेशीरपणे खरेदी करून एकूण १ हजार २८२ किलो तांदूळ व १ हजार ९९८ किलो गहू एवढे धान्य जमा केल्याचे दिसून आले. या बेकायदेशीर कृत्याबद्दल दोन्ही इसमांविरुध्द शाहूपुरी पोलीस ठाणे, कोल्हापूर येथे जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ कलम ३ व ७अन्वये रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अशा प्रकारे कोणत्याही लाभार्थ्यांनी त्यांना मिळालेले शासकीय धान्य कोणालाही बेकायदेशीरपणे विक्री करु नये अथवा कोणीही ते खरेदी करू नये. लाभार्थ्यांना धान्याची आवश्यकता नसल्यास त्यांनी हा लाभ सोडून देण्याबाबत अर्ज सादर करावा. शासकीय अनुदानित अन्नधान्याची बेकायदेशीर खरेदी- विक्री केल्याचे आढळल्यास संबंधितांविरूध्द फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांनी दिला आहे.


Post a Comment

Previous Post Next Post