प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापूर, दि. 8 (जिमाका): बँक ग्राहकांनी कर्ज घेतलेल्या कारणासाठीच या रकमेचा वापर करावा. तसेच कर्जाची वेळेत परतफेड करुन आर्थिक शिस्त पाळावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांनी केले
'आझादी का अमृत महोत्सव' कार्यक्रमाच्या ग्राहक जनसंपर्क अभियानांतर्गत 'क्रेडिट आऊटरीच कॅम्प' जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात घेण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात लाभार्थ्यांना कर्ज मंजुरीचे पत्र व विमा लाभाचा धनादेश देण्यात आला. तसेच शासकीय योजना, आर्थिक साक्षरता समुपदेशन, जनसुरक्षा योजनांतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या बँक शाखांचे व्यवस्थापक, कर्मचारी व बँक मित्रांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी बँक ऑफ इंडिया कोल्हापुरचे विभागीय व्यवस्थापक हेमंत खेर, स्टेट बँक ऑफ इंडिया कोल्हापुरचे क्षेत्रीय व्यवस्थापक विवेक कुमार सिन्हा, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतीश शेळके, जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे, यूनियन बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय व्यवस्थापक रामानंद टी.वी., नाबार्ड कोल्हापुरचे जिल्हा विकास व्यवस्थापक आशुतोष जाधव, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक महादेव राणे, बँक ऑफ बडोदाचे उपक्षेत्रीय व्यवस्थापक किशोर बाबू व अग्रणी जिल्हा व्यवस्थापक गणेश गोडसे उपस्थित होते.
निवासी उपजिल्हाधिकारी श्री. जाधव म्हणाले, पूर्वी बँकांची सेवा घेण्यासाठी ग्राहकांना बँकेमध्ये जावे लागत होते, परंतु आता ऑनलाइन सेवेमुळे बँका घरोघरी पोहोचल्या आहेत. शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार यांच्यासह सर्व घटकांसाठी शासनाच्या विविध योजना असून या योजनांचा लाभ सर्व बँकांनी ग्राहकांना मिळवून द्यावा. कर्जाची वेळेत परतफेड करणे हे बँक ग्राहकांचे कर्तव्य आहे. उद्योग व्यवसाय सुरु करण्यापूर्वी त्या उद्योगाची चौकस बुद्धीने सखोल माहिती घेऊन कर्ज प्रकरणासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करुनच प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. ज्या कारणासाठी कर्ज घेतले आहे, त्याच कारणासाठी कर्ज रकमेचा वापर करुन स्वतःची आणि कुटुंबाची उन्नती साधावी, असे आवाहनही श्री. जाधव यांनी केले.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात कोल्हापूर जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर-
जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक शेळके म्हणाले, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात कोल्हापूर जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर तर प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात जिल्हा देशात पहिल्या तीन क्रमांकामध्ये आहे, ही आनंदाची बाब आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी या दोन्ही योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करुन श्री. शेळके म्हणाले, सन 2008 मध्ये 11 हजार, सन 2015 मध्ये 25 हजार तर सन 2021 मध्ये 40 हजारांहून अधिक उद्योग जिल्ह्यात निर्माण झाले आहेत. बँकांनी ग्राहकांना उद्योगधंद्यांसाठी कर्ज मंजूर करुन उद्योग व्यवसायाला चालना द्यावी.
बँक ग्राहकांनी बँकेकडे कर्ज घेऊन त्याची वेळेत परत फेड करून आर्थिक पत निर्माण करावी. मागील आर्थिक वर्षाप्रमाणेच यावर्षी देखील सर्व योजनांमध्ये लिड बँकेच्या समन्वयाने कोल्हापूर जिल्हा उद्दिष्ट पूर्ण करेल, असा विश्वास बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक हेमंत खेर यांनी व्यक्त केला.
खत व औषध फवारणी करण्यासाठी ड्रोन फवारणी यंत्रासाठी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कर्ज पुरवठा करण्यास बँकांमार्फत सुरु केल्याचे नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक आशुतोष जाधव यांनी सांगितले.
जिल्ह्यातील सर्व बँका ग्राहकांना शासनाच्या व विविध महामंडळाच्या योजनांचा लाभ मिळवून देत आहेत. कोरोना परिस्थिती, पूर परिस्थिती आणि आपत्कालीन परिस्थितीत देखील बँकांनी शासन, बँकर्स आणि ग्राहकांच्या समन्वयाने चांगल्याप्रकारे सेवा उपलब्ध करुन दिल्या आहेत. यापुढे देखील जिल्हा, राज्य व देशाच्या विकासासाठी बँका योगदान देतील, असा विश्वास लीड बँक व अन्य बँकांच्या विभागीय व्यवस्थापकांनी व्यक्त केला.
मेळाव्याला बँकांचे जिल्हा समन्वयक, शासकीय विभाग व आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक उपस्थित होते.