जिल्ह्यात केवळ 1 हजार 596 फेरफार प्रलंबित..
प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापूर : (जिमाका): जिल्ह्यात 2004 पासून सातबारा संगणकीकरणाचे कामकाज सुरु आहे. संगणकीकरणाचे कामकाज अंतिम टप्प्यात आले असून हे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. ऑनलाईन सातबारा नागरिकांना कोठेही उपलब्ध होत असल्याने लोकांची सोय झाली आहे. या संगणकीकरणा अंतर्गत पक्षकारांचे फेरफार ऑनलाईन पध्दतीने मंजूर केले जात आहेत. यापूर्वी जिल्ह्यात फेर फार मंजूर करुन निर्गतीची गती सरासरी 58 दिवस इतकी होती मात्र सध्या ती 33 दिवसापर्यंत खाली आली आहे. यामुळे फेरफार दाखल झाल्यापासून 33 दिवसात ती मंजूर करण्याची कार्यवाही होत आहे. हा कालावधी आणखी कमी करण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाकडून सुरु आहे.
सध्या जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यातील प्रलंबित फेरफारची संख्या अवघी 1 हजार 596 इतकी आहे. दरमहा सरासरी 7 हजार फेरफार नोंदीसाठी दाखल होत असतात त्या तुलनेत निर्गतीचे प्रमाण पाहता जिल्ह्यात फेरफार नोंदी गतीने होत असल्याचे आकडेवारी नुसार स्पष्ट होत आहे. प्रलंबित 1 हजार 596 फेरफार हे त्यामध्ये आलेल्या तक्रारी तसेच अन्य त्रुटीमुळे प्रलंबित आहेत. त्यावर सुनावणी तसेच त्रुटीची पूर्तता झाल्यानंतर तात्काळ कार्यवाही केली जात असल्याने प्रलंबित फेरफारच्या नोंदीची कार्यवाही लवकरच पूर्ण होईल. दर महिन्याला दाखल होणा-या फेरफारांची संख्या पाहता प्रलंबित फेरफारची संख्या एक महिन्याच्या कालावधीनंतर 1 हजार ते 1 हजार 500 च्या दरम्यान राहू शकते. प्रलंबित फेरफार शक्य तितक्या लवकर निर्गत करण्याच्या जिल्हा प्रशासनाच्या सूचना असून त्यानुसार तलाठी, मंडळ अधिकारी यांच्याकडून कार्यवाही सुरु आहे. या कार्यवाहीचा दरमहिन्याला आढावा घेतला जात असून जिल्ह्यात फेरफार निर्गतीचा वेग चांगला आहे.
ऑनलाईन फेरफार सुविधा चालू झाल्यापासून जिल्ह्यामध्ये आजतागायत 6 लाख 56 हजार 32 एवढे फेरफार संगणकीकृत नोंदविले गेले आहेत. याचप्रमाणे नोंदविल्या गेलेल्या 6 लाख 56 हजार 32 फेरफारामधील 6 लाख 37 हजार 343 फेरफार निर्गतीची प्रक्रिया पूर्ण झालेली असून उर्वरित 18 हजार 689 फेरफारावर निर्गतीची प्रक्रिया अविरत सुरु आहे. त्यामधील 15 हजार 947 फेरफार हे चालू महिन्यातील असून 1 हजार 38 फेरफारावर हरकतीची प्रक्रिया सुरु आहे. एकंदर पाहता जिल्ह्याची फेरफाराबाबतची पेडन्सी ही 12 हजार 797 वरून 1 हजार 596 पर्यंत खाली आलेली आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांनी दिली आहे.