स्वतःचा शोध समाजालाही उन्नत करत असतो

 उज्वला परांजपे यांचे प्रतिपादन

प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी ता. १६, स्वतःचा शोध हा नेहमीच स्वतःसह समाजाला उन्नत करत असतो. आपल्यातील कमतरता दूर करून पुढे जायचे असेल तर शरीर ,मन व बुद्धी एकाच वेळी चालणे अतिशय महत्त्वाचे आहे. आपल्या कृतीत सौंदर्य शोधणे ही स्वतःचा शोध घेण्याची एक महत्वाची पायरी आहे. सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे या स्पर्धेला निरोगी स्पर्धेचे रूप देऊन पुढे जाणे ही अत्यावश्यक बाब आहे.तणावरहित जीवनासाठी व्यायाम, आहार व झोप यांचे संतुलन राखणे महत्वाचे आहे. त्यामुळे विद्यार्थिनींनी स्व - भानाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे,असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या उज्ज्वला परांजपे यांनी व्यक्त केले.त्या समाजवादी प्रबोधिनीच्या हितचिंतक  उषाताई यशवंतराव पत्की यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ' स्वतःला शोधताना ' या विषयावर बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. त्रिशला कदम होत्या. यावेळी ज्येष्ठ लेखिका डॉ.तारा भवाळकर, माजी नगराध्यक्षा मेघा चाळके,सौदामिनी कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. स्वागत प्रा.संगीता पाटील यांनी केले. प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख प्रसाद कुलकर्णी यांनी करून दिली.तसेच उषाताईंच्या आठवणींना उजाळा दिला.

प्रारंभी शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.तसेच रोपाला पाणी घालून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले आणि कालवश उषाताई पत्की यांच्या प्रतिमेलाही पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी डॉ.त्रिशला कदम यांची प्रभारी प्राचार्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल व  प्रोफेसर श्रेणी मिळाल्याबद्दल त्यांचा डॉ.तारा भवाळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच समाजवादी प्रबोधिनीच्या ' प्रबोधन प्रकाशन ज्योती ' या मासिकाच्या जूनच्या अंकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.उज्वला परांजपे यांनी या विषयाची सखोल मांडणी करत विद्यार्थीनीना बोलते केले.

यावेळी बोलताना डॉ.तारा भवाळकर म्हणाल्या, स्वतःचा शोध घेणे ही आपल्या व्यक्तिमत्त्व विकासाची पूर्वअट आहे .ज्याला स्वतःचा शोध घेता येतो त्याचे जीवन सर्वार्थाने यशस्वी होते. व्यक्ती समृद्ध झाली की समष्टीची समृद्धता आकार घेत असते. त्यामुळे ' शोध स्वतःचा 'अतिशय महत्त्वाचा आहे. अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. त्रिशला कदम यांनी विद्यार्थिनींना स्व -भानाचे महत्व सांगितले.आणि अनेक उदाहरणे देत त्याची उपयुक्तता विषद केली.

या कार्यक्रमाचे आयोजन समाजवादी प्रबोधिनी आणि श्रीमती आ.रा.पाटील कन्या महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने केले होते. कन्या महाविद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमास कन्या महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आभार प्रा.वर्षा पोतदार यांनी मानले.प्रा.संपदा टिपकुर्ले यांनी सूत्रसंचालन केले

Post a Comment

Previous Post Next Post