सक्षमपणे राबवण्यात आलेल्या उपक्रमास शासनाच्या कौतुकाची पोचपावती..
प्रेस मीडिया लाईव्ह :
महाराष्ट्र शासनाच्या वतीनेजागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून माझी वसुंधरा अभियानाचे निकाल जाहिर करण्यात आले.यामध्ये इचलकरंजी नगरपरिषदेने ४०४८ गुण मिळवत अमृत गटामध्ये ११ वा क्रमांक पटकावला. यानिमित्ताने नगरपरिषदेने शहरात विविध ठिकाणी सक्षमपणे राबवण्यात आलेल्या उपक्रमास शासनाच्या कौतुकाची पोच पावती मिळाली आहे.याबद्दल नगरपरिषद प्रशासनाबरोबरच यासाठी प्रयत्नशील राहिलेल्या सर्व घटकांचे शहरवासियांतून कौतुक होत आहे.
महाराष्ट्र शासनाद्वारे पर्यावरण समृध्दीसाठी माझी वसुंधरा अभियान राबविले जात आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी अभियानाच्या अंमलबजावणीसाठी विशेष लक्ष देऊन अभियानाला महत्त्व दिले आहे. इचलकरंजी शहर अमृत गटामध्ये सहभागी झाली आहे. या अभियानामध्ये पृथ्वी, जल, वायु, अग्नि आणि आकाश या पंचतत्त्वांवर लक्ष केंद्रीत करुन पर्यावरण रक्षणासंदर्भात अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. सन २०२२-२३ या कालावधीमध्ये महाराष्ट्र शासनाद्वारे माझी वसुंधरा अभियान २.० स्पर्धेची घोषणा करण्यात आली.त्या अंतर्गत इचलकरंजी नगरपरिषदेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात आले.यामध्ये शहरात पृथ्वी घटकातंर्गत वृक्षारोपण, घनकचरा व्यवस्थापन, नर्सरी निर्मिती, पुरातन वृक्षगणना, हरितक्षेत्र निर्मिती, जैवविविधता नोंदणी, प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन, ई-कचरा व्यवस्थापन, हागणदारी मुक्त शहर मानांकन, वायु घटका अंतर्गत हवा गुणवता निरीक्षण, फटाके बंदी कार्यवाही, बांधकाम कचरा व्यवस्थापन, सायकल ट्रॅक निर्मिती व ईलेक्ट्रीक वाहन धोरण जल घटका अंतर्गत जलसंधारण उपक्रम, प्रशासकीय इमारतींचे चॉटर ऑडिट, रेन वॉटर हार्वेस्टींग प्रकल्प, जलस्त्रोतांची स्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन, जलप्रदुषण मुक्त उत्सव तसेच अग्नी घटका अंतर्गत अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांच्या वापरास प्रोत्साहन, एलईडी दिव्यांची स्थापना, सौर दिव्यांची स्थापना, सौर पॅनलची स्थापना, प्रशासकीय इमारतींचे एनर्जी ऑडिट तसेच आकाश या घटका अंतर्गत नागरीकांकडुन ई-प्लेज घेणे व वचनपुर्ती करणे, विविध शालेय स्पर्धा, नियुक्त केलेले पर्यावरणदूत यांचेमार्फत विविध पर्यावरण जनजागृती उपक्रम, यशोगाथा तयार करणे व सार्वजनिक भागात माझी वसुंधरा तत्त्वे दर्शविणारे भित्तीचित्रे, सेल्फी पॉईट व नक्षत्रवन तयार करणे आदी कामांचा समावेश करण्यात आला.
महाराष्ट्र शासनाद्वारे नुकताच जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून माझी वसुंधरा अभियान स्पर्धेचे निकाल जाहिर करण्यात आले. यामध्ये इचलकरंजी नगरपरिषदेने ४०४८ गुण मिळवूनअमृत गटामध्ये ११ स्थानांवर झेप घेतली. मागील अभियानामध्ये इचलकरंजी १७ स्थानांवर होती.यानिमित्ताने शहरात विविध ठिकाणी सक्षमपणे राबविलेल्या उपक्रमास शासनाची कौतुकाची पोचपावती मिळाली आहे. सदर अभियानामध्ये नागरीकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
या अभियानासाठी तत्कालीन नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार ,सर्व समिती सभापती व सर्व नगरसेवकांचा हातभार लागला आहे. प्रशासकीय कारकिर्दीत मुख्यअधिकारी तथा प्रशासक डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पंचतत्त्वातील कामे हाताळण्यासाठी पाच नोडल ऑफीसर गटाची नेमणुक करण्या आली. यामध्ये पृथ्वी घटकासाठी बी. सांगोलकर व डॉ.सुनिलदत्त संगेवार, जल घटकासाठी सौ. अंकिता मोहिते व अभय शिरोलीकर, वायु घटकासाठी नितीन देसाई, अग्नी घटकासाठी संदिप जाधव व आकाश घटकासाठी प्रताप पवार, सौ. सिमा धुमाळ व सौ. प्रियांका बनसोडे यांची नेमणुक करण्यात आली होती. यांचेवर नियंत्रण व समन्वय राखणेसाठी अभियान नोडल अधिकारी व उपमुख्यअधिकारी केतन गुजर यांचे अंतर्गत सचिन पाटील, प्रविण बॉगाळे, सौ. शुभांगी जोशी यांची समिती नियुक्त होती.
अभियानामध्ये पर्यावरणदूत गजानन महाजन गुरुजी, चित्तकला कुलकर्णी, डॉ.ज्योती बडे, डॉ. विजया पोतदार, राजु नदाफ, संजय खुळ, सुनिल बावडेकर, संतोष हत्तीकर, अंकुश गरगटे ,विश्वजीत पाटील त्याचबरोबर शहरातील स्वयंसेवी संस्थांचे विशेष सहकार्य लाभले.