पावसाळ्यापूर्वी काळ्या ओढ्याची स्वच्छता करा , अन्यथा तीव्र आंदोलन !

इचलकरंजी युवक काँग्रेसचा नगरपरिषद प्रशासनास निवेदनाव्दारे इशारा..


प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या महासत्ता चौक ते आमराई रोड या परिसरातील काळया ओढ्यात मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे.या कच-यामुळे नागरी वस्तीमध्ये दुर्गंधी सुटून नागरिकांच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण झाला आहे.तरी पावसाळ्यापूर्वी या ओढ्याची तातडीने स्वच्छता करावी ,अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा इचलकरंजी शहर युवक काँग्रेसच्या वतीने नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ.प्रदीप ठेंगल यांना निवेदनाव्दारे देण्यात आला आहे.युवक काॅंग्रेसचे शहराध्यक्ष प्रमोद खुडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने सदरचे निवेदन सादर केले.


इचलकरंजी शहरातील पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न सातत्याने चर्चेत येत असतो.या प्रदूषणासाठी काळ्या ओढ्यातून दूषित सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळून प्रदूषणाचा प्रश्न अधिक गंभीर बनत चालला आहे.त्यामुळे प्रदूषणास जबाबदार असणाऱ्या संबंधित घटकांवर कारवाईची मागणी जनतेतून होवून देखील याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळ सोयीस्करपणे दुर्लक्ष करत असल्याचे आता लपून राहिलेले नाही.त्यातच महासत्ता चौक ते आमराई रोड या परिसरात असणाऱ्या काळ्या ओढ्यात प्लास्टिक व इतर कचरा साचून त्याला दुर्गंधी सुटली आहे.त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढून नागरी वस्तीत साथीचे आजार पसरुन नागरिकांच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण झाला आहे.तसेच काळ्या ओढा परिसरात कचरा साचत राहिल्याने भटक्या कुञ्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.या सर्व बाबींचा नगरपरिषद प्रशासनाने विचार करुन पावसाळ्यापूर्वी काळ्या ओढ्याची स्वच्छता करावी ,अन्यथा इचलकरंजी शहर युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आज शुक्रवारी प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ.प्रदीप ठेंगल यांना एका निवेदनाद्वारे देण्यात आला.यावेळी शिष्टमंडळात इचलकरंजी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रमोद खुडे , राष्ट्रीय काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस समीर जमादार ,संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीचे सदस्य हारुण खलिफा ,शेखर पाटील ,राज शेख , फिरोज जमादार , संतोष माळी ,प्रशांत लोले ,विलास निर्मळ , युवराज शिंगाडे ,नासिर गवंडी ,अमीर सपसागर ,दत्तात्रय बरगे ,विजय सावंत यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post