राजकारण हे केवळ सत्ताकारण ठरणे व लोकशाहीतुन लोकच हद्दपार होणे हे योग्य नाही.


प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी ता. २६ राजकारणातून सामाजिक न्यायासह सर्व संवैधानिक मूल्ये बाजूला सारून केवळ सत्ताकारणाचा विचार प्रभावी ठरणे अतिशय घातक आहे.स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांत राज्यघटनेच्या मुल्यांवर पक्षीय राजकारण आकाराला येणे व तसे लोकमानस घडविणे अतिशय गरजेचे आहे.आज महाराष्ट्रात सुरू असलेली सत्तापिपासा ही राज्यघटनेच्या प्रस्ताविकेतील तत्वज्ञानाला 

आव्हान निर्माण करणारी आहे.त्यासाठी लोकशाहीपासून धर्मनिरपेक्षतेपर्यंत आणि संघराज्यीय एकात्मतेपासून समाजवादापर्यन्तच्या सर्व तत्वांचे व्यापक प्रमाणावर  प्रबोधन होणे झाले पाहिजे.लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांनी राजेशाहीतही लोकशाहीचा आदर्श जपणारा राज्यकारभार केला.याचे भान सर्वच राजकिय पक्ष,कार्यकर्ते, नागरिक बंधू - भगिनींनी ठेवले पाहिजे.राजकारण हे केवळ सत्ताकारण ठरणे व लोकशाहीतुन लोकच हद्दपार होणे हे योग्य नाही. देश उभारणीसाठी निकोप व मूल्याधिष्ठित राजकारणाची गरज असते आणि त्यासाठी राज्यघटना व तिचे तत्वज्ञान यांची बांधिलकी मानून सक्रिय राहणे अत्यावश्यक आहे असे मत समाजवादी प्रबोधिनीच्या साप्ताहिक चर्चासत्रात व्यक्त करण्यात आले. 

राजर्षी शाहू जयंतीनिमित्त प्रारंभी ज्येष्ठ पत्रकार रामचंद्र ठिकणे यांच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. 'महाराष्ट्रातील राजकीय पेचप्रसंग ' या विषयावर झालेल्या या चर्चेत प्रसाद कुलकर्णी, प्रा.रमेश लवटे,तुकाराम अपराध,दयानंद लिपारे,राजन मुठाणे,पांडुरंग पिसे,शकिल मुल्ला,मनोहर जोशी, महालिंग कोळेकर,नारायण लोटके आदींनी सहभाग घेतला.महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडींच्या विविध पैलूंवर यावेळी चर्चा झाली.यावेळी इचलकरंजीतील वस्त्रोद्योग, शिक्षण आदी क्षेत्रातील एक तरुण उमदे व्यक्तिमत्त्व व श्रीमंत  ना.बा.एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन हरीश बोहरा यांना आदरांजली वाहण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post