कोविड प्रतिबंधक लसीकरण ‘मिशनमोड’वर पूर्ण करा ---पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर
प्रेस मीडिया लाईव्ह :
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोविडबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कोविड प्रतिबंधक लसीकरण ‘मिशनमोड’वर पूर्ण करावे. त्याचप्रमाणे, पावसाळी संसर्गजन्य आजारांची साथ उद्भवू नये, यासाठीही प्रभावी उपाययोजना करावी, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
गेल्या काही दिवसांत राज्यात कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर लसीकरण पूर्ण करण्यासाठी हर घर दस्तक मोहिम प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. जिल्ह्यात अद्यापपर्यंत सुमारे 36 लाख एकूण लसीकरण झाले आहे. पहिला डोस घेतलेल्या व्यक्तींची संख्या 20 लक्ष 68 हजार आहे. दोन्ही डोस पूर्ण केलेल्या व्यक्ती 14 लक्ष 86 हजारहून अधिक असून, सुमारे 45 हजार व्यक्तींनी प्रिकॉशन डोस घेतला आहे. कोविड प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढणे आवश्यक आहे. विशेषत: 12 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण केवळ 55 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. आता शाळा सुरू होणार असून, हे लसीकरण वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अनेकदा विषाणूजन्य आजारांचा उद्भव होऊ शकतो. लवकरच शाळाही सुरू होणार आहेत. त्यामुळे यादृष्टीने प्रभावी उपाययोजना करावी. दक्षतेबाबत सर्वदूर जनजागृती करावी. आरोग्य व्यवस्थेने पायाभूत सुविधांची तयारी करुन ठेवावी. सर्व रूग्णालये, तेथील वैद्यकीय पथके, सुविधा सुसज्ज ठेवाव्यात. ऑक्सिजन, औषधे यांचा साठा करुन ठेवावा. कोविड प्रतिबंधक नियमांच्या पालनाबाबत सातत्यपूर्ण जागृती करावी. कोविड चाचण्यांचे प्रमाण कमी झाले आहे. हे प्रमाण वाढवावे. मेळघाटसह जिल्ह्यात सर्वदूर लसीकरण मोहिम राबवावी. आरोग्य व संबंधित सर्व विभागांनी समन्वयाने काम करून मोहिम स्तरावर लसीकरण पूर्ण करावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.
नागरिकांनी ताप, सर्दी, घशात दुखत असल्यास तत्काळ कोविड चाचणी करुन घ्यावी. ज्येष्ठ, सहव्याधी नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, बूस्टर लस घ्यावी. कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन व्हावे. कोरोना प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लसीकरण आवश्यक आहे. त्यामुळे आपले व आपल्या कुटुंबियांचे लसीकरण करावे आणि आपल्या कुटुंबाला, राज्याला व देशाला सुरक्षित ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Adv. Yashomati Thakur