अहमदनगर : (जि.मा.का) वृत्तसेवाः कार्यालयात समस्या घेऊन येणा-या सर्व सामान्य माणसांचे दुःख समजावून घेऊन त्याला केंद्र बिंदु मानून अधिकारी कर्मचा-यांनी काम करावे. प्रशासनात काम करतांना सर्जनशीलतेचा अधिक वापर केला पाहिजे. असे प्रतिपादन 95 व्या अखिल भारतीय #मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा माजी सनदी अधिकारी भारत सासणे यांनी केले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा मराठी भाषा समितीच्या वतीने 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांच्या सत्कार समारंभाचे व संवाद कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात आज करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील, महाराष्ट्र साहित्य परिषद नगर शाखेचे अध्यक्ष किशोर मरकड, ज्येष्ठ साहित्यिक जयंत कळमकर, उपनिवासी जिल्हाधिकारी संदिप निचित आणि सर्व कार्यालयांचे विभाग प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला जिल्हा प्रशासनातर्फे श्री. भारत सासणे यांचा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सत्कार केला.
ज्येष्ठ साहित्यिक श्री. सासणे यावेळी म्हणाले, लेखक वेगळा आणि अधिकारी वेगळा असतो असा समज समाजामध्ये पहावयास मिळतो. जो अधिकारी आहे तो लेखक होऊ शकतो व जो लेखक आहेत अधिकारी होऊ शकतो. मी सुध्दा प्रशासनात काम केले असून साहित्य क्षेत्र, लेखक म्हणून काम करत आहे. कामाच्या ठिकाणी परिसर व वातावरण चांगले असल्यास अधिक कल्पकतेने काम करता येते. असे काम केल्याने निश्चितच समाधान प्राप्त होतो. सर्व सामान्यांचे शासकीय काम जर वेळेत पूर्ण झाले तर त्याच्या चेह-यावरचे हावभाव बघुन सुध्दा आपणांस समाधान मिळते. आपल्या प्रत्येकात सर्जनशीलता आहे त्याचा वापर कार्यालयातील कामात प्रभावीपणे केल्यास समाधानाबरोबर आनंदही मिळतो असे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी डॉ. #राजेंद्र भोसले आपल्या मनोगतात म्हणाले, नागरीकांकडून येणारे प्रत्येक निवेदन वाचली पाहिजेत व त्या निवेदनात असलेल्या त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रत्येक अधिकारी व कर्मचा-यांनी प्रयत्न करावा.
अधिकारी व कर्मचारी यांनी वेळात वेळ काढुन विविध साहित्याचे वाचन सुध्दा केले पाहिजे. जिल्हाधिकारी कार्यालयात यापुढे कोणत्याही कार्यक्रमात पुष्पगुच्छे देण्याऐवजी पुस्तके देऊन सन्मान करण्याची प्रथा सुरू करण्याचा संकल्प करुया. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सुसज्ज ग्रंथालय सुरू करू या ग्रंथालयासाठी पुस्तके खरेदी केली जातील, असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र साहित्य परिषद नगर शाखेचे अध्यक्ष किशोर मरकड यांनी ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांचा परिचय करून दिला. संदीप कळमकर यांनी सुध्दा आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी केले.