प्रेस मीडिया लाईव्ह :
अहमदनगर : (जिमाका वृत्तसेवा) - #सामाजिक न्याय विभागाच्या #अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तींचा विकास योजनेत जिल्ह्यात अनेक वस्त्यांना मंजूरी देण्यात आलेली आहे. मंजूरी दिलेल्या वस्त्यांमध्ये कामे होत नाहीत.दुसऱ्याच वस्त्यांमध्ये कामे होत आहेत. सदरची कामे निकृष्ट दर्जाची होत आहेत. ही बाब या वस्त्यांमध्ये वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना निदर्शनास आल्यास ग्रामसेवक, गटविकास अधिकारी किंवा जिल्हा परिषद जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्याकडे तक्रार करावी. असे आवाहन अहमदनगर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांनी केले आहे.
अनुसुचित जाती व #नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास करणे योजनेअंतर्गत पाणी पुरवठयाची कामे, मलनिस्सारण, गटार बांधणे, रस्ते, पोचरस्ते, पर्जन्य पाण्याचा निचरा, वीज पुरवठा, समाजमंदिर, पेव्हिंग ब्लॉक बसविणे इत्यादी कामांना समाज कल्याण विभाग मार्फत घोषित केलेल्या वस्त्यांमध्ये मंजूरी दिली जाते. सदर योजनेंतर्गत मंजूरी देण्यात आलेली कामे ही कामे ज्या वस्त्यांमध्ये मंजूर दिली आहे त्याच वस्त्यांमध्ये न करता सवर्ण वस्तीमध्ये करण्यात येत आहेत. ही कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याचे तक्रारी जिल्हा परिषदेस प्राप्त होत आहेत. सदरची कामे ज्या वस्तीमध्ये मंजूर करणेत आलेली आहेत त्याच वस्तीमध्ये करणेबाबत तसेच कामाचा दर्जा उत्कृष्ट ठेवण्याबाबत यापूर्वीच सूचना देण्यात आल्या आहेत.
याबाबत अशा प्रकारची कामे ज्या ठिकाणी होत असतील तर नागरिकांनी ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी व गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करावी. असे आवाहनही श्री. लांगोरे यांनी केले आहे. याबाबतचे परिपत्रक जिल्हा समाज कल्याण अधिकारी राधाकिसन देवढे यांनी प्रसिध्दीस दिले आहे.