आम आदमी पक्षाचे सरकार पुणे महापालिकेमध्ये निवडून आल्यानंतर पुणेकर जनतेला 6 सेवा हमी पूर्वक देण्यात येतील.
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : "अरविंद केजरीवाल यांची काम की राजनीति पुण्यातील प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवा. जे दिल्लीत झालं, तो बदल पुण्यात ही शक्य आहे आणि त्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे", असे मत आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्ली सरकारचे सामाजिक कल्याण मंत्री राजेंद्र गौतम यांनी आम आदमी पक्षाच्या बालगंधर्व रंगमंदिर येथील निवडणूक मेळाव्यामध्ये व्यक्त केले. त्यांच्या हस्ते आज पुणे महानगरपालिकेतील आम आदमी पक्षाच्या प्रचाराचा आरंभ करून गॅरंटी कार्डचे अनावरण करण्यात आले.
आम आदमी पक्षाचे सरकार पुणे महापालिकेमध्ये निवडून आल्यानंतर पुणेकर जनतेला 6 सेवा हमी पूर्वक देण्यात येतील. मोफत व दर्जेदार शिक्षण, मोफत व दर्जेदार आरोग्य सेवा, महिलांसाठी मोफत बस सेवा, टँकर मुक्त पुणे, कचरामुक्त पुणे आणि घरपोच सरकारी कागदपत्रे या सहा हमीपत्रांचे यावेळी अनावरण करण्यात आले. आम आदमी पक्ष जनतेला आश्वासन देत नाही तर गॅरंटी देतो आणि निश्चित पूर्ण करतो असा संदेश या हमी पत्राच्या माध्यमातून आम आदमी पक्ष पुणेकरांना देत आहे.
गुरुवार दि. २ जून रोजी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात मोठ्या जल्लोषात पार पडला. दिल्ली सरकारचे समाज कल्याण मंत्री राजेंद्र पाल गौतम, राष्ट्रीय प्रवक्त्या प्रीती शर्मा मेनन, महाराष्ट्र राज्य निवडणूक प्रमुख महादेव नाईक, राज्य अध्यक्ष रंगा राचुरे, राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार, राज्य सचिव धनंजय शिंदे, आप वाहतूक विंग महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्रीकांत आचार्य, पुणे जिल्हा अध्यक्ष मुकुंद किर्दत हे यावेळी मंचावर उपस्थित होते या सोबतच सिनेकलाकार गौरी करणी रवी वाल्याच्या चाहत खन्ना शेफाली सेठी हे देखील मंचावर उपस्थित होते. यावेळी मोठ्या संख्येने आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते आलेले होते.
कार्यक्रमाची सुरूवात राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून आप पुणे टीमकडून पुणे मनपा निवडणुकीचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदेश प्रवक्ते डॉ. अभिजीत मोरे यांनी केले, आपल्या प्रास्ताविकपर मनोगतात त्यांनी आम आदमी पक्ष पुणे टीमकडून गेल्या १ वर्षांत केलेल्या कामाचे सादरीकरण केले. जवळपास ८५ वेगवेगळ्या टीमच्या माध्यमातून पक्षाचा प्रभावी प्रचार करण्यात येत आहे.आप वाहतूक संघटनेचे प्रदेश अध्यक्ष श्रीकांत आचार्य, पुणे जिल्हाध्यक्ष मुकुंद किर्दत, प्रदेश सचिव धनंजय शिंदे यांनी आपल्या भाषणात आप पुणे टीमच्या कामाने प्रभावित होत पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले.
आपल्या कुटुंबाच्या उज्वल भवितव्यासाठी जनतेने आम आदमी पक्षाला सत्तेवर आणावे असे आवाहन यावेळी निवडणूक प्रमुख महादेव नाईक यांनी केले तर राष्ट्रीय प्रवक्ता प्रीती शर्मा मेनन यांनी बूथ बांधणीवर भर देण्याची गरज यावेळी मेळाव्यामध्ये व्यक्त केली. सिनेकलाकार गौरी कर्णिक, रवी वालेचा, चाहत खन्ना, शेफाली सेठी यांनी यावेळी आम आदमी पक्षाच्या काम की राजनीतिला जाहीर पाठिंबा दिला आणि अशा पद्धतीच्या सकारात्मक राजकारणाला सर्वच नागरिकांनी सहकार्य केलं पाहिजे अशी भावना यावेळी व्यक्त केली.
किरण कद्रे, विद्या यंदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर आनंद अंकुश यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी मोठ्या संख्येने अनेक लोकांनी आम आदमी पक्षामध्ये प्रवेश केला.