प्रेस मीडिया लाईव्ह :
हेरवाड ता. २३ ,हेरवाड या गावाने ग्रामसभेमध्ये विधवांबाबतच्या अनिष्ट प्रथा व चालिरीती बंद करण्याचा घेतलेला निर्णय आणि त्याची त्वरित सुरू केलेली अंमलबजावणी अतिशय अभिनंदनीय ,अनुकरणीय व स्वागतार्ह आहे.भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी व लोकराजे शाहू रायांच्या स्मृतिशताब्दी वर्षात घेतलेल्या या निर्णयापासून प्रेरणा घेऊन अनेक ग्रामसभा असा ठराव करत आहेत.तसेच महाराष्ट्र सरकारही त्याचा स्वीकार करत आहे हे समतावादी समाजरचनेच्या दिशेने टाकलेले महत्वाचे पाऊल आहे.त्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याची पुरोगामी परंपरा विकसित करणाऱ्या हेरवाडचे सरपंच,सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी व ग्रामस्थ यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले.ते हेरवाड ग्रामपंचायतीत विविध संस्था - संघटनांच्या वतीने सरपंच व सदस्यांच्या अभिनंदन व सत्कार समारंभात बोलत होते. यावेळी सरपंच सुरगोंडा पाटील ,ग्रामविकास अधिकारी पल्लवी कोळेकर,उपसरपंच विकास माळी,ग्रामपंचायत सदस्य मुक्ताबाई पुजारी,अर्चना अकिवाटे,सुनीता आलासे,सुषमा माने,सीमा बरगाले,अनिता कांबळे,शांताबाई तेरवाडे, मंगल देबाजे,सुभाष शिरढोणे, कृष्णा पुजारी,देवगोंडा आलासे,सुकुमार पाटील,अमोल कांबळे,संभाजी मस्के आदींचा शाल,ग्रंथ व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलतांना सरपंच सुरगोंडा पाटील यांनी या ठरावात व अंमलबजावणीत सहकारी सदस्य व ग्रामस्थांनी केलेल्या सहकार्याचा प्रवास उलगडून दाखविला.माध्यमांनी या घटनेच्या घेतलेल्या नोंदीबद्दल कृतज्ञता व्यक्त करतांना प्रसाद कुलकर्णी यांनी याविषयी त्वरित लिहिलेल्या लेखाचाही आवर्जून उल्लेख केला.तसेच सत्कारासाठी राज्यभरातून येणाऱ्या सर्वांचे आभार मानून यामुळे अधिक काम करण्याची प्रेरणा मिळत आहे असे मत व्यक्त केले. यावेळी नॅशनल इन्स्टिट्यूट रुरल डेव्हलपमेंट अँड पंचायत राज ( हैद्राबाद ) संस्थेचे निखिल भुयार ,विशाल बेदरे ,आम्ही लेखिका ( पुणे )च्या अध्यक्षा प्रा.सुनंदा पाटील,पुष्पा कोल्हे,अंजली दिवेकर यांच्यासह विविध जिल्ह्यातील संस्था - संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. दरम्यान विधवांच्या बाबत ग्रामसभेत पहिला पुरोगामी ठराव करणाऱ्या हेरवाडकरांच्या अभिनंदनासाठी दररोज सर्व स्तरातील मंडळींची रीघ लागत आहे.त्यात महिला वर्गाचा सहभाग लक्षणीय आहे. ग्रामपंचायतीत येणाऱ्या सर्वांचे उत्साहाने व आपुलकीने स्वागतही केले जात आहे.