प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : बेदरकार पाणी टँकर चालकांच्या सुरक्षा नियम न पाळता धोकादायक गाडी चालवण्यामुळे पुणे शहरात अनेक ठिकाणी जीवघेणे अपघात घडले. अशा प्रकारच्या अपघातांत ४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अशा प्रकारच्या जीवघेण्या घटना रोखण्यासाठी आम आदमी पक्षाचे राज्य संघटक विजय कुंभार, श्रीकांत आचार्य (आप वाहतूक विंग राज्य अध्यक्ष), एकनाथ ढोले(आप पुणे शहर संघटक), आनंद अंकुश (आप कसबा समन्वयक) यांचेकडून पुणे शहर प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती.
यावेळी आपने मागणी केली होती की अशा प्रकारच्या जीवघेण्या दुर्घटना रोखण्यासाठी गळके टँकर, टँकरमध्ये अंतर्गत कप्पे व अंतर्गत द्रव्य गतीरोधक नसणाऱ्या टँकर वर कारवाई करावी तसेच अशा दुर्घटनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा.
या आठवड्यात सहाय्यक आयुक्त प्रादेशिक परिवहन विभाग यांच्याकडून आपला प्राप्त झालेल्या पत्रानुसार आरटीओ कडून सांगण्यात आले आहे की वायुवेग पथकास अशा मोटर वाहनंवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आत्तापर्यंत 17 टँकर वर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे आणि इतर दोषींवर कारवाई केली जाईल.
पुण्यात सर्वप्रथम आम आदमी पक्षाने या प्रश्नाला वाचा फोडल्यानंतर आता वाहतूक प्रशासन विभाग सक्रीय झाला आहे.
"बेदरकार टँकर चालकांवर आणि दुर्लक्ष करणाऱ्या वाहतूक अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आम आदमी पक्षाकडून पुणे आरटीओकडे करण्यात आली होती. त्यानुसार आरटीओ ऑफिसकडून घेण्यात आलेली दखल सकारात्मक बाब. आम आदमी पक्ष या प्रकरणातील दोषी व्यक्तींवर कारवाई होण्यासाठी सतत पाठपुरावा करत राहील. परिवहन विभागास देखील आपच्या वतीने गरज पडल्यास सहकार्य करण्यात येईल. ", *विजय कुंभार (आप राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष)*