पुणे दर्शनमध्ये फुले वाड्याचा समावेश करा : आम आदमी पक्षाची मागणी

  पुणे दर्शन बस मार्गा मधून फुले वाडा वगळल्याबद्दल आपची तीव्र नाराजी..

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे दर्शनमधून महात्मा फुले वाडा वगळण्याच्या पीएमपीएलच्या कृतीचा आम आदमी पक्ष तीव्र निषेध व्यक्त करत असून तातडीने पुणे दर्शन बस मार्गामध्ये महात्मा फुले वाड्यांचा समावेश करण्यात यावा अशी आम आदमी पक्षाची मागणी आहे. शिक्षणाची गंगा महिलांसह समाजातल्या वंचित व दुर्लक्षित घटकांपर्यंत पोहोचावी, बहुजनांनी जातीयवादी मानसिक गुलामगिरीतून मुक्त व्हावे यासाठी सबंध आयुष्य वेचणारे महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची अशा पद्धतीने उपेक्षा केल्याबद्दल आम आदमी पक्ष तीव्र नाराजी व्यक्त करत आहे. महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य समजून घेतल्याशिवाय पुण्याचा क्रांतिकारी, ऐतेहासिक, सामाजिक, सांस्कृतिक इतिहास समजून येणार नाही. फुले वाड्याशिवाय पुणे दर्शन अपुरे आहे. 

महात्मा फुले वाडा हे राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित झाले असून सध्या फुले वाडा पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहे. या वाड्याला समता भूमी असे देखील म्हणतात.  महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याने प्रेरित होऊन केवळ महाराष्ट्रच नव्हे तर भारत भरातील अनेक लोक फुले वाड्याला भेट द्यायला येत असतात. फुले वाडा हा पुण्याचा सांस्कृतिक, शैक्षणिक ठेवा आहेच, शिवाय संपूर्ण राष्ट्राला अभिमान वाटावा असे प्रेरणास्थळ आहे. पुणे शहरामध्ये असलेल्या अनेक ऐतिहासिक सांस्कृतिक वास्तूंपैकी फुले वाडा ही एक प्रमुख ऐतिहासिक, सांस्कृतिक वास्तू आहे असे असताना देखील सध्या पुणे दर्शन या बस सेवेमधून फुले वाड्याला वगळण्यात आले आहे. हे करताना पीएमपीएलने दिलेली कारणे ही न पटण्यासारखी आहेत. फुले वाड्याच्या नजीकच अग्निशामन केंद्राचे पुणे शहरातील मुख्य कार्यालय आहे. त्या ठिकाणी अग्निशमन वाहने मोठ्या प्रमाणावर ये-जा करत असतात. अशा वेळी फुले वाड्याजवळ जायला अपुरा रस्ता आहे, ही सबब योग्य नाही. फुले वाड्याच्या रस्त्यावर जर काही अतिक्रमणे असतील तर त्याबाबत महानगरपालिकेने कारवाई करून फुले वाडा पर्यंतचा रस्ता प्रशस्त केला पाहिजे. तरी पुणे दर्शन मध्ये फुलेवाडा याचा समावेश झालाच पाहिजे या महात्मा फुले मंडळाच्या आणि महात्मा फुले प्रतिष्ठानच्या मागण्यांना आम आदमी पक्षाचा पाठिंबा असून याबाबत माननीय मनपा आयुक्त, पीएमपीएल व्यवस्थापकीय संचालक यांनी तातडीने कारवाई करत फुले वाड्यांचा समावेश पुणे दर्शनमध्ये करावा अशी मागणी पक्ष करत आहे. 



Post a Comment

Previous Post Next Post