दिल्ली सरकारचे सामाजिक कल्याण मंत्री राजेंद्र पाल गौतम व आपच्या अनेक राष्ट्रीय, राज्य नेतृत्वाच्या उपस्थितीत मेळावा होणार : आप नेते विजय कुंभार.
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुण्यामध्ये बालगंधर्व रंगमंदिर येथे आम आदमी पक्षाचा निवडणूक मेळावा येत्या 2 जूनला संपन्न होणार आहे. आपच्या पुणे मनपा निवडणुक प्रचाराचा आरंभ करणाऱ्या या मेळाव्यामध्ये आम आदमी पक्षाच्या दिल्ली सरकारचे सामाजिक कल्याणमंत्री राजेंद्र पाल गौतम, राष्ट्रीय प्रवक्त्या प्रीती शर्मा मेनन, महाराष्ट्र प्रभारी दीपक सिंगला, महाराष्ट्र निवडणूक प्रमुख व माजी मंत्री (गोवा) महादेव नाईक, राज्याध्यक्ष रंगा राचुरे, राज्य संघटक विजय कुंभार, राज्य सचिव धनंजय शिंदे यांच्या उपस्थितीत सदर मेळावा होणार असल्याची माहिती आज आप महाराष्ट्र राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना दिली.
दिल्ली मॉडेलच्या कामाच्या जोरावर आम आदमी पक्षाने पंजाब राज्यात ३/४ बहुमत मिळवत सरकार स्थापन केले. परंपरागत राजकीय कार्यपद्धतीला छेद देत अरविंद केजरीवाल प्रणित दिल्ली मॉडेलकडे सामान्य नागरिक अत्यंत अपेक्षेने बघत आहे. आपले पुणे शहर देखील त्यास अपवाद नाही. आम आदमी पक्षात पुणे शहरात रोज अनेक नवीन सामान्य नागरिक, प्रतिष्ठित व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते, व्यावसायिक, इतर राजकीय पक्षातून भ्रमनिरास होऊन आपकडे आलेले कार्यकर्ते प्रवेश घेत आहेत. नुकत्याच येऊ घातलेल्या पुणे मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आप पुणे शाखेच्या वतीने निवडणूक मेळाव्याचे आयोजन २ जून रोजी संध्याकाळी ५ वाजता शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बालगंधर्व रंगमंदिरात केले आहे. यावेळी पुणे मनपा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ आम आदमी पक्षाकडून करण्यात येणार आहे. पुणेकरांच्या समस्यांना वाचा फोडत प्रस्थापित राजकीय पक्षांच्या विरोधात आप रणशिंग पुकारणार आहे.
आप राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार यांच्या नेतृत्वात पुणे शहरात आम आदमी पक्षाचा जोमाने विस्तार होत आहे. शहरातील अनेक महत्वाच्या प्रश्नांना आपकडून वाचा फोडण्यात आली आहे. शहरातील पाण्याचा प्रश्न, रखडलेली आरोग्य भरती, बोगस अभियंता घोटाळा, अमेनिटी स्पेसचा मुद्दा, बेदरकार टँकर चालकांची समस्या, बालगंधर्व रंगमंदिर जतन करण्याचा मुद्दा, छोट्या व्यावसायिकांची समस्या, टेकड्यांची तोडफोड, PMPML बस सेवा तसेच कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडलेली आहे. पुणे महानगरपालिकेतील भ्रष्टाचार साफ करण्यासाठी आता सामान्य पुणेकरांनीच मैदानात उतरून निवडणूक लढवली पाहिजे या भूमिकेतून आम आदमी पक्षाने गेल्या काही दिवसांपासून 'आपणच होऊन नगरसेवक' ही मोहीम राबवली आहे. पुणे शहराच्या विविध भागांमध्ये जनसंपर्क कार्यालय स्थापन केलेली आहेत. सदस्य नोंदणी अभियान राबवले आहे. तसेच प्रभाग पातळीवर डोअर टू डोअर संपर्क अभियान, कोपरा सभा, तिरंगा यात्रा यांचे आयोजन करून जनसंपर्क अभियानास जोरदार सुरुवात केली आहे.
या मेळाव्याचे उदघाट्न दिल्ली राज्य सरकारमधील सामाजिक न्यायमंत्री राजेंद्र पाल गौतम यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी राष्ट्रीय प्रवक्त्या व राष्ट्रीय कार्यकारणी सदस्या प्रिती शर्मा मेनन, राज्य प्रभारी दीपक सिंघला, राज्य निवडणूक प्रभारी व माजी मंत्री (गोवा) महादेव नाईक, प्रदेश संयोजक रंगा राचूरे, प्रदेश संघटक विजय कुंभार, प्रदेश सचिव धनंजय शिंदे हे उपस्थितांना मार्गदर्शन करतील.
या मेळाव्यात मोठ्या संख्येने नवीन लोक आम आदमी पक्षात प्रवेश करणार आहेत. यामध्ये शहरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, विविध पक्षातून आलेले कार्यकर्ते यांचा समावेश असणार आहे.
आजच्या पत्रकार परिषदेमध्ये विजय कुंभार यांच्यासोबत डॉ अभिजित मोरे, कनिष्क जाधव, घनश्याम मारणे, किशोर मुजुमदार, नरेंद्र देसाई, रामभाऊ इंगळे, आबासाहेब कांबळे हे उपस्थित होते.